Akola Police: पोलिसांची अशीही प्रामाणिकता; सापडलेला महागडा मोबाईल आणि पाकीट केले परत



भारतीय अलंकार

अकोला:  कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी  परत एकदा माणुसकीचे दर्शन घडविले. एका तरुणाचे महत्त्वाचे कागदपत्रे आणि पैसे असलेले हरवलेले पाकीट आणि महागडा मोबाईल सापडला असता, त्याला अवघ्या काही वेळात शोधून,पाकीट आणि मोबाईल परत केला. हा प्रसंग आज सिटी कोतवाली चौकात घडला.  


शहर वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर हे सिटी कोतवाली चौकात कर्तव्यावर हजर असतांना, त्यांना रस्त्यावर एक मोबाईल व पाकीट पडलेले दिसले. त्यांनी हा मोबाईल व पाकीट ताब्यात घेऊन पाकिटात शोध घेतला असता, त्यामध्ये वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र व वाहन चालविण्याचा परवाना मिळून आला. त्यावरील पत्ता उमरी येथील असल्याने व वाहतूक कर्मचारी सुद्धा त्याच परिसरात राहत असल्याने त्यांनी आणखी शोध घेतला असता, त्यांना हा मोबाईल व महत्वाचे मूळ कागदपत्रे असलेले पाकीट उमरी येथील चंदू गवारे यांचे असल्याचे समजले. 



गंगाखेडकर यांनी लगेच त्यांचे ओळखीचे त्या परिसरात राहत असलेल्या मित्रा कडून चंदू गवारे यांना निरोप पाठविला. महागडा मोबाईल व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट हरविल्याने तणावात असलेल्या गवारे यांना आनंद झाला. ते त्वरित कोतवाली चौकात पोहचले. नारायण गंगाखेडकर यांनी खात्री करून महागडा २० हजार रुपये किंमत असलेला मोबाईल व पाकीट परत केले. वाहतूक पोलीस अमलदाराच्या प्रामाणिक पणा बद्दल चंदू गवारे यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

टिप्पण्या