Akola Police: बुलेट द्वारा फटाके फोडण्याची तरुणाईत क्रेज...शहर वाहतूक पोलिसांनी यावर लावला ब्रेक…

Youth craze to firecrackers by bullets.City traffic police put a action




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:शहरात सध्या मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट चालविण्याची तरुणांमध्ये क्रेज आली आहे. चौकात अथवा रस्त्याने भरघाव वाहन चालवत टारगट मुले मोठया आवाजात बुलेट द्वारा फटाके फोडतात. मात्र, अश्या बुलेट धारकांवर आता पोलिसांची करडी नजर असून, कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखा पोलिसांनी धडक मोहीम आरंभ केली असून,आज पाच बुलेट ताब्यात घेण्यात आल्या आहेत.




बुलेटच्या सायलेन्सर मध्ये काही बदल करून गाडी रेस केली की, फटाका फुटल्या सारखा आवाज येतो. बऱ्याच वेळेस रात्री अश्या बुलेट मुळे आजारी माणसे व जेष्ठ नागरिकांना त्रास होतो. याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना काही जेष्ठ नागरिकांनी फोन द्वारे तोंडी तक्रार केली. पोलिसांनी देखील तक्रारीची गंभीर दखल घेतली. 



पहिल्याच दिवशी पाच बुलेट ताब्यात


मोठ्या आवाजात बुलेट द्वारा फटाके फोडणाऱ्या बेजबाबदार तरुणांच्या विरुद्ध  वाहतूक शाखेने मोहीमच आरंभ केली. गजानन शेळके आणि त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी  या मोहीमेत पहिल्याच दिवशी पाच बुलेट ताब्यात घेत ट्राफिक ऑफिस मध्ये लावल्या. या बुलेट मालक व चालक यांच्यावर पुढील कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



शहरातील भौगोलिक परिस्थिती व रस्त्याचे कामकाज सुरू असल्याने अपुऱ्या मनुष्यबळात वाहतूक सुरळीत ठेवण्यातच वाहतूक पोलिसांची धावपळ होत आहे. तरुणांनी जबाबदार नागरिकांचे कर्तव्य म्हणून तरी सर्व सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही, याची जाणीव ठेवून वाहन वापरावे, यापुढे फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध कडक कारवाई करणार आहोत, असे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.

टिप्पण्या