Akola crime: मलकापूर परिसरातील कोट्यवधींची शेती हडप करून विकली; सहा धनाढ्य विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Akola crime: Billions of farms in Malkapur area seized and sold;  Fraud charges filed against six rich



भारतीय अलंकार

अकोला: मलकापूर परिसरात असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट दस्तावेजद्वारे हडप करून, त्यावर हाउसिंग सोसायटी निर्माण करीत प्लॉट पाडून त्याची खरेदी विक्री करणाऱ्या सहा  धनाढ्यविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी रात्री फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.



या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, शहरालगत असलेल्या येवता रोडवरील मलकापूर परिसरातील शेत सर्व्हे नं.५५/२ मधील दोन एकर १८ गुंठे शेती ही लक्ष्मी नगर येथील रहिवासी असलेले अलोक खंडेलवाल हे अल्पवयीन असताना त्यांना रजिस्टर्ड बक्षीस पत्राद्वारे मिळाली होती.



मात्र, त्यानंतर वसंतकुमार हिरालाल खंडेलवाल, शारदा वसंतकुमार खंडेलवाल (रा. खंडेलवाल हाऊस जठारपेठ),अर्चना संदीप गुप्ता (रा. मुंबई) व संजय शंकरलाल बियाणी, पंकज शंकरलाल बियाणी, शैलेश कमलकिशोर बियाणी (सर्व रा. राधाकिसन प्लॉट, अकोला) यांनी या शेतीचे बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर हाउसिंग सोसायटी निर्माण केली. 




यामधील पहिल्या तीन आरोपींनी बनावट दस्तावेजाच्या आधारे हाऊसिंग सोसायटी निर्माण करून विक्री सुरू केली. नंतरच्या तीन आरोपींनी दोन हजार ९४८ चौरस फुटांचा प्लॉट शहानिशा न करता खरेदी करून फसवणूक केली. यासह आरोपींनी संगनमताने कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून त्या जमिनी वरील प्लॉट परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांनी फिर्यादी अलोक खंडेलवाल यांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला.


या प्रकरणी अलोक खंडेलवाल यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौकशी करून सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी रात्री दाखल केला आहे. सहा आरोपींच्या विरुध्द भारतीय दंड विधान कलम ४६७, ४६८, ४७१,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे करीत आहेत.


टिप्पण्या