Sport news: बोगस खेळाडूंवर बसणार चाप; क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार- सुनील केदार

 New rules for issuing sports      certificates will be introduced- Sunil Kedar




भारतीय अलंकार

मुंबई : राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार भविष्यात होणार नाहीत यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.


राज्यातील क्रीडा विभागाच्या विभागनिहाय आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.


केदार म्हणाले, राज्यात यापुढे बोगस प्रमाणपत्र देण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. कोणी मागण्याची हिंमतही करणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे. नोकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे.


राज्यात उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी जो निधी वितरित करण्यात आला. त्याची कामे तातडीने सुरु करावीत. जागेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित विभागाशी संपर्क करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढे निधी वितरण झाल्यानंतर निधी खर्च करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत, यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. काही ठिकाणी निधी कमी पडत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना  केदार यांनी केल्या.


क्रीडा राज्यमंत्री तटकरे यांनी, क्रीडा संकुलाकरिता सपाट असेल अशीच जागा निवडावी जेणेकरुन येणारा निधी सपाटीकरणासाठी खर्च न होता तो  इमारत उभारणीकरिता आणि क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणता येईल, असे सांगितले.


नवीन नियमावलीमुळे बोगस खेळाडू, बोगस प्रमाणपत्र घेणारे आणि देणाऱ्यांवर चाप बसणार आहे,एवढे मात्र निश्चित.


टिप्पण्या