Political News: 'मी पुन्हा येईल' असे म्हणणारे पुन्हा येत नसतात! जयंत पाटील यांचा भाजपाला टोला

Those who say 'I will come again' do not come! -Jayant Patil


 

भारतीय अलंकार

अकोला: 'मी पुन्हा येईल' 'मी पुन्हा येईल' असे  म्हणणारे नेते आज विरोधात बसले आहेत, पराभव त्यांच्या अद्यापही पचनी पडलेला नाही. यासाठी विविध प्रलोभने दाखवून या ना त्या मार्गाने सत्तेत येण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, मी पुन्हा येणार' म्हणणारे कधीच पुन्हा येत नसतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी  हाणला.




अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी अकोल्यात आयोजित सभा व कार्यकर्ता मेळावा नंतर ना जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


पाटील पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना सध्या अटोक्यात आहे. कोरोनाचा पुन्हा उद्रेक होवू नये, यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. मात्र,अशा परिस्थितीत भाजपा आघाडी सरकार पाडण्याचे रोज मुहूर्त शोधत आहेत.परंतु मुहूर्तामध्येच आम्ही वर्षपूर्तीत वाटचाल केली आहे.



सत्ता गेल्याचे दुःख त्यांना आजही आहे. त्यामुळे सरकारवर रोज नवे आरोप करीत आहेत. त्यांची ही सारी उठाठेव केवळ चर्चेत राहण्यासाठी आहे.विरोधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा त्यांना अनुभव नाही. म्हणून त्यांनी अजून चार वर्ष तो अनुभव घ्यावा, अश्या शब्दात पाटील यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्यावर यावेळी टीका केली.




महाविकास आघाडी सरकार यशस्वी व सक्षम कामगिरी करीत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर नित्यनवे आरोप करत सुटले आहेत. फडणवीसांना विरोधी पक्ष नेते पदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा तळपळाट सुरू आहे. तर नारायण राणे हे जंगलेली तोफ आहे. जंगलेल्या तोफेतून  आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही, अश्या स्पष्ट शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीस आणि राणेंचा समाचार घेतला. 




विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच एमएससीईटीला मुदतवाढ देण्याचा शासन आदेश काढण्यात आला. हा गंभीर प्रकार असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, एमएससीईटी मुदतवाढीला स्थगिती दिली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. कामगार संघटनांच्या मागणीनुसार एमएससीईटीला मुदतवाढ देण्याचा आदेश निवडणूक काळात काढण्याचा प्रयत्न झाला. हा आदेश स्थगित केला आहे. मात्र, सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारचा आदेश सहीसाठी ठेवणाऱ्या झारीतील शुक्राचार्याचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते कुणाच्या सांगण्यावरून हे काम करीत आहेत, याचा सुध्दा शोध घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.




याप्रसंगी ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमोल मिटकरी, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार विप्लव बाजोरिया,आमदार नितीन देशमुख,माजी मंत्री अजहर हुसेन,माजी मंत्री गुलाबराव गावंडे आदी उपस्थित होते.












टिप्पण्या