Kartikpurnima: कार्तिक पौर्णिमेचे महत्व; मूर्तिजापुरात कार्तिक स्वामी दर्शनासाठी भाविकांचे आगमन

          भारतीय सण-उत्सव

   ✍️ॲड. नीलिमा शिंगणे-जगड



भारतीय अलंकार

अकोला: कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामी जन्मोत्सव निम्मित देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. यात्रा काढल्या जातात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. देशात कार्तिक स्वामींचे मोजकेच मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी मंदिरे आहेत, तेथे दरवर्षी महोत्सव साजरे केल्या जातात. यंदा मात्र कोरोनाच्या सावटाखाली यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. भाविक दर्शनापासून वंचित राहू नये, यासाठी मंदिरे केवळ दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर येथे सुध्दा कार्तिक स्वामींचे छोटेसे मंदिर आहे. रविवारी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. केवळ कार्तिक पौर्णिमेलाच हे मंदिर उघडण्यात येत असल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.



मंदिर वर्षातून एकदाच उघडतात

                                   file image

मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती देवरण रोडवरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कण्डेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिक स्वामींची सुंदर संगमरवरी षडमुख मूर्ती आहे. कृतिका नक्षत्रात कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते. रविवारी कृतिका नक्षत्रात भाविकांसाठी हे मंदिर उघडण्यात आले. हजारो भाविकांनी कोविड-१९ नियमांचे पालन करून रांगा लावून शिस्तीत दर्शनाचा लाभ घेतला. 






या मंदिरात दरवर्षी आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग रविवार व सोमवारी (२९ व ३० नोव्हेंबर रोजी) आला. यानिमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी मूर्तिजापूर दाखल झाले. यावर्षी कार्तिक पोर्णिमा ३० नोव्हेंबर सोमवारी आहे. परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त २९ नोव्हेंबर रोजी असल्याने मंदिर रविवारीच दर्शनासाठी खुले करण्यात आले. 



जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असून, मंदिराचा गाभारा पवित्र अश्या नैसर्गिक प्रवाह जलाने भरल्या जात असल्याने  अधिक महत्व प्राप्त झाले आहे. कृतिका नक्षत्र हा दिवस कार्तिक स्वामींचा जन्म दिवस मानला जातो. येथे कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर असल्याने विदर्भासह व इतर प्रांतातून भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे जिथे कार्तिक स्वामींची मुर्ती आहे ते तळघर बाराही महिने पाण्याने भरत असल्याने  विशेष  धार्मिक महत्त्व आहे,अशी माहिती कार्तिक स्वामी मंदिर, मूर्तिजापूरचे सुनील शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिली.



हे धार्मिक स्थळ कानपुरचे नागा निर्वाण महाराज, अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान व चतुर्थ महाराज पुरुष श्री.गजानन महाराज, चिखलीचे संत मौनीबाबा, मूर्तिजापुरचे संत बद्रीनाथ महाराज आदीच्या पद स्पर्शाने आणि सहवासाने पावन झाली आहे. सन १९४२ मध्ये या मंदिराची निर्मिती झाली असून, या मंदिराचे तळघर (भुयार)  नैसर्गिक प्रवाहाच्या पाण्याने नेहमी भरलेले असते. रविवारी मंदिर उघडल्यानंतर त्यातील पाणी बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती दादासाहेब जमादार यांनी प्रसार माध्यमांना दिली. 




श्रीमार्कण्डेश्वराचे मंदिरात महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कण्डेय ऋषीची सुरेख संगमरमरी मूर्ती येथे स्थापित आहे. यासमोरच यमराज देवतेची सुध्दा काळया पाषाणाची आकर्षक मूर्ती आहे. तर पुढे प.पु.बद्रीबाबा महाराज, प.पु.बँक बाबा महाराज, श्री.बलदेव महाराज, वैध महाराज आदी संताची समाधी स्थळ आहे. आणि तळघरात कार्तिकेय स्वामी मंदिर आहे.




कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व


भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्व आहे. कार्तिक महिन्यात श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी देवी यांचे पूजन करतात. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. इतर पौर्णिमां प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे. सन २०२० मधील वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण आले. 



काही भागात देवदिवाळी


कार्तिक पौर्णिमेला देशातील काही भागात देवदिवाळी साजरी करतात. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. कार्तिक पौर्णिमेला बनारसमध्ये संपूर्ण नगरीला दिव्यांनी सुशोभित केले जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता,म्हणून शिवशंकर महादेवांना त्रिपुरारी असे सुध्दा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. यादिवशी लक्ष्मी नारायणाचे देखील पूजन केले जाते. 




कार्तिक पौर्णिमा : सोमवार, ३० नोव्हेंबर २०२०


- पौर्णिमा प्रारंभ : रविवार, २९ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटे.


- पौर्णिमा सांगता : सोमवार, ३० नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०३ वाजता.


भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे कार्तिकी पौर्णिमेचे पूजन सोमवार, ३० नोव्हेंबर २०२० रोजी करावे, असे सांगितले जाते.



श्रीलक्ष्मी-नारायण पूजन

                                     file image


कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित स्नान करावे.  यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे. लक्ष्मी नारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल, तर सत्यनारायणाची कथा आवर्जुन ऐकावी, धार्मिक ग्रंथांत सांगितले आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणाची आरती करावी. तुळशीचे पूजन आणि आरती करावी. तसेच दीपदान करावे, असे जुन्या पिढीतले लोक सांगतात.


दीपदान

                                     file image


दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जुन दिवा लावावा, असे सांगितले जाते. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे, असे म्हटले जाते. असे केल्याने कुंडलीतील चंद्र मजबूद होण्यास मदत मिळते, अशी मान्यता आहे.



मत्स्य अवतार आणि पुराण

                                     file image

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीविष्णूंनी दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलाया पासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता आहे.




टिप्पण्या