googledoodle: जगाच्या पटलावर मराठी नाव झळकले; 'पुलं' च्या जन्मदिनाला गुगलचे डूडल Marathi name flashed on the world stage; Google's doodle for 'P L' birthday.

पुलं हे हजरजबाबी होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्सुमने आणि विनोदी किस्से प्रसिद्ध आहेत.यावरही एक दोन नव्हेतर अनेक चित्रपट निर्माण होवू शकतात.



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  पु.ल. देशपांडे. संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आज हे मराठी व्यक्तिमत्त्व जगाच्या पटलावर झळकत आहे. आज गुगलने त्यांना डूडल समर्पित केले आहे. गुगलने हे डूडल त्यांच्या १०१ व्या जन्मदिन निम्मित समर्पित केले आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे देशपांडे सहसा थोडक्यात 'पु ल' हे नाव लिहायचे. गुगलने याची प्रकर्षाने दखल घेतली आहे. डूडलमध्ये ही गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसत आहे.



पुलं लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 'गुळाचा गणपती' या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.



पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषा प्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर जीवनावर अलीकडेच  मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे दोन भाग आहेत. कारण भाईंचे जीवन संकुचित नव्हतेच, विस्तृत असे विस्तारलेले आहे. एका क्षेत्रापुरते ते मर्यादित नाही राहिले. मृत्यू नंतरही ते मराठी अस्मितेचे मराठी प्रतिभेचेच नव्हेतर भारतीयांचे जगभर प्रतिनिधित्व करीत आहेत. म्हणूनच आज जगाच्या एका मोठ्या अग्रणी प्लॅटफॉर्मवर भाईंचे नाव मोठ्या दिमाखात झळकत आहे. पुलं हे हजरजबाबी होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्सुमने आणि विनोदी किस्से प्रसिद्ध आहेत.यावरही एक दोन नव्हेतर अनेक चित्रपट निर्माण होवू शकतात.



सबकुछ पु.ल!

१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सबकुछ पु.ल! होते.भारतीय टपाल सेवा ने सुध्दा त्याचे नावे टपाल तिकीट काढून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा सन्मान केला होता, असे हे उत्तुंग अजरामर व्यक्तीमत्व.


अभिनेता आणि गायक


भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती. १९४७ सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले,आणि आहे. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका साकारली होती.


चित्रपट व संगीत दिग्दर्शक



पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतले.'गुळाचा गणपती' मधील 'इंद्रायणी काठी' या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचेच आहे.



पंडित नेहरू यांची मुलाखत


दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणासाठी पंडित  नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.




मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे.


भाई-व्यक्ती की वल्ली



पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर यांनी अलीकडेच 'भाई' - व्यक्ती की वल्ली'  या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे. पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत. शिवाय त्यांच्या साहित्यावर आधारित ‘नमुने’ नावाची हिंदी मालिका राष्ट्रीय मनोरंजन वाहिनीवर प्रसारित झाली होती.यामध्ये अभिनेते संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारली होती. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ वर ही मालिका आधारित होती. यामध्ये सुबोध भावे आणि इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज दिसली होती.


(संदर्भ: विकिपीडिया,मराठी पुलंचे पुस्तके,फोटो:गुगल)



टिप्पण्या