Electric bill: युवा मुक्तीचे वीज बिल धोरणाच्या विरोधात आक्रोश आंदोलन

विद्युत बिलांची जाहीर होळी करण्यात येणार




भारतीय अलंकार

अकोला: कोरोना संकटकाळापासून सामान्य जनतेचे विद्यूत बिल हे वाढत चालले असून, हाताला काम नसल्यामुळे हे विद्युत बिल अद्यापही भरण्यात आले नाही. शासन जनतेसाठी विद्युत बिल संदर्भात लवचिक धोरण आखेल, अशी ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केल्यावरही अद्यापही कोणतेच विद्युत बिल माफीचे धोरण आखण्यात न आल्यामुळे सामान्य जणांचे हे बिल व्याज,चक्रव्याज सहित हजारो रुपयांच्या घरात पोहचले. हे बिल सामान्यांच्या आवाक्या बाहेरील आहे. कोरोना संकटकाळात हे बिल रद्द करून निश्चित धोरण आखावे, या मागणीसाठी युवा मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यात विद्युत बिलांची जाहीर होळी करण्यात येणार असल्याची माहिती युवा मुक्ती आंदोलनचे प्रदेश अध्यक्ष मनोज भालेराव यांनी दिली.



या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत या अभिनव आंदोलनाची माहिती देण्यात आली. यावेळी संजय गवई,आनंद चवरे, जितेंद्र आठवले, अविनाश ढोके, अमोल गणवीर आदी उपस्थित होते. 


     

कोरोना काळात सामान्यजन व गोरगरीब विद्युत ग्राहक यांचे वीज बिल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. यात ० ते १०० युनिटपर्यंत सरसकट वीज बिल माफ,१०० ते ३०० युनिटपर्यंत ५० टक्के माफ व ३०० ते ६०० युनिटपर्यंत २५ टक्के वीज बील माफ करण्यात येणार असल्याची घोषणा ना. राऊत यांनी करून तसा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात आला असल्याची माहिती ना राऊत यांनी शासनाच्या वतीने जाहीरपणे दिली होती. तसेच करोना काळातील वीज बिल न भरल्यामुळे वीज खंडित करण्यात येणार नसल्याचा निर्वाळाही देण्यात आला होता. सामान्य व गोरगरीब जनतेला या घोषणेमुळे दिलासा मिळून हजारो जनतेने या वीज बिल माफी व दरवाढ रद्द करण्याच्या आदेशाची वाट बघीत बिल भरले नाही. परिणामी हे बिल हजारो रुपयांच्या घरात गेले. शासनाने ऐन दिवाळीत दिलासा तर सोडाच उलट अव्वाच्या सव्वा दराने वीज बिल आकारणी केली. यामुळे शासनाने सामान्य जनतेचा या माध्यमातून विश्वासघात केला असल्याचा आरोप भालेराव यांनी यावेळी केला.



या संदर्भात युवा मुक्ती आंदोलन महा. प्रदेशच्या वतीने राज्य शासनाने कोरोना संकटकाळातील विद्यूत बिल रद्द करावे, यासाठी आजतागायत जोरदार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. म्हणून या आक्रोश आंदोलनात आंदोलनात विद्युत बिलांची जाहीर होळी करण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या जवळील विद्युत बिले घेऊन या एकदिवसीय धरणे आंदोलनात  सामाजिक अंतर राखीत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

टिप्पण्या