Education:बालदिवस निवड समितीत राज्य बोर्डाच्या शिक्षक व मुख्याध्यापकांना वगळले; परिपत्रकात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

शासनाच्या परिपत्रकाचा विदर्भ मुख्याध्यापक संघातर्फे निषेध





अकोला: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल (चाचा) नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिवस  म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल दिवस सप्ताह ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्याचे ठरले आहे. यात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मात्र, बालदिवस निवड समितीमध्ये राज्य बोर्डाच्या शिक्षक मुख्याध्यापकांना मुद्दामहून वगळले असल्याचा आरोप विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी केला आहे. 



बालदिवस सप्ताह निम्मित राज्य जिल्हा व तालुका स्तरावर निवड समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. निवड  समितीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक , केन्द्रप्रमुख निवड करतांना शक्यतो सीबीएसई, आयसीएसई ,आयबी या शाळातील असावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. 



यावरून महाराष्ट्र स्टेट बोर्ड असणाऱ्या शैक्षणिक संशोधन परिषद , महा .शिक्षण मंडळ याअंतर्गत करणाऱ्या शिक्षक , मुख्याध्यापक लायक नसल्याचा अविश्वास शासनाने दाखविला आहे. त्यामुळे सदर परिपत्रकाचा विदर्भ मुख्याध्यापक संघातर्फे निषेध व्यक्त केला. सदर परिपत्रकातील निवड समिती  सदस्यांमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शिक्षक, मुख्याध्यापक, केन्द्रप्रमुख यांना प्राधान्याने संधी देण्याची दुरुस्ती तातडीने करावी ,अशी मागणी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड,सचिव सतीश जगताप,कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी केली आहे.






टिप्पण्या