Drama and literature: जेष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांचे निधन

२०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषविले.





भारतीय अलंकार

अकोला: ज्येष्ठ नाट्य कलावंत व जेष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे आज निधन सकाळी  निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य व साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यासह राज्यातील नाट्य क्षेत्र पोरके झाले आहे, अश्या भावना अकोलेकर नाट्यप्रेमींनी व्यक्त केल्या.



अकोला भूषण राम जाधव


ज्येष्ठ रंगकर्मी, अकोला भूषण राम  जाधव उर्फ मामा  अशी त्यांची ओळख होती. आज दीर्घ आजारामुळे मामांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला असून मागील ५ दशकापासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.


तिकीट कलेक्टर


अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान - मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले. रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांची भूमिका वठविणे सुरूच होते. प्रयोगिक रंगभूमीला सन्मान मिळवून देण्याचे काम मामांनी केले. रंगभूमीला व्यवसाय न मानता पुजा मानणारे मामा होते.



नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद


मामांनी अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. २०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषविले. हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. जीवनभर सतत नाटक आणि नाटक हाच ध्यास घेतलेला हा कलावंत गेल्याने अकोल्याच्या नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह असावे हे मामांचे स्वप्न होते. ते अधुरे राहिले आहे.

टिप्पण्या