mahesh-navmi-2026-akola-city: विविध उपक्रमाने साजरी होणार भगवान महेश नवमी; सकल माहेश्वरी समाजाची तयारी पूर्ण
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सकल माहेश्वरी समाजाचा वंशोत्पती दिवस म्हणून महेश नवमी राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यावर्षीही मंगळवार दिनांक 23 जून रोजी महानगरातील सकल माहेश्वरी समाज महेश नवमी उत्सव साजरा करणार आहे.
या उत्सव पर्वावर स्थानीय माहेश्वरी भवनात दिनांक 19 जून ते 23 जून पर्यंत माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने व माहेश्वरी महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ तथा वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने बुधवारी माहेश्वरी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ट्रस्टचे प्रधानमंत्री विजयकुमार राठी व महेश उत्सव प्रमुख नरेश बियाणी यांनी दिली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार तोष्णिवाल, महिला मंडळ अध्यक्षा वंदना हेड़ा, प्रगति मंडळ अध्यक्ष सुरज काबरा, नवयुवती मंडळ अध्यक्षा नंदनी बजाज, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ अध्यक्ष सुरेश माहेश्वरी, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठ अध्यक्षा प्रमिला लाहोटी प्रामुख्याने उपस्थित होते.
यंदाच्या या महेश नवमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून जालना येथील मेटारोल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक द्वारकाप्रसाद सोनी राहणार आहेत. तर पूजा यजमान म्हणून गोपाल पनपालिया व सरलादेवी पनपालिया राहणार आहेत.
या महेश नवमी उत्सवाचा प्रारंभ शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी माहेश्वरी भवनात भगवान महेश यांच्या पूजा अर्चना व आरतीने करण्यात येणार आहे. सकाळी 9-30 वाजता देवकीबाई विजयकुमार सोमानी चॅरिटेबल ट्रस्ट व स्व रजनीबाई रामगोपाल तोष्णीवाल ट्रस्ट व प्रेमवती प्रसन्ना पोरवाल परिवारच्या वतीने जिल्हा महिला रुग्णालयात फळ वितरण कार्यक्रम होणार आहे. सकाळी 10 वाजता माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने संपूर्णनारी प्रतिभा स्पर्धा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5-30 वाजता वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठच्या वतीने वादविवाद स्पर्धा होणार आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य व वाढती व्यवस्था, विकासाची ओळख की नात्यातील दुरावा? या विषयावर ही वाद-विवाद स्पर्धा होणार आहे. शनिवार दिनांक 20 जून रोजी सकाळी 6 वाजता माहेश्वरी भवन येथे माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने एक धाव समाजासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. यात 5 वर्षापासुन 60 वया पर्यंत समाज बांधवाचा सहभाग राहणार असून यानंतर सकाळी 9 वाजता आरती होणार आहे. यानंतर सायंकाळी वाजता माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम व नाटिका होणार आहे. ‘जेथे विश्वास तेथे भगवंत’ या विषयावर हा कार्यक्रम होणार आहे. रात्री आरतीने या सत्राची समाप्ती होणार आहे.
रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 6 वाजता जागतिक योग दिनानिमित्त माहेश्वरी भवनात भव्य योग शिबिर होणार आहे. यानंतर स 6 वाजता महिला मंडळ व नवयुवती मंडळाच्या वतीने सर्व वर्गासाठी हॅप्पी स्ट्रीट हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये झुंबा, पझल, विविध खेळ राहणार आहेत.
यानंतर आरती होणार आहे. सकाळी 9-30 वाजता प्रगती मंडळाच्या वतीने बालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तर सकाळी 10 वाजता विदर्भातील युवा पीढ़ीसाठी उद्योगिक क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने उपलब्ध प्रोत्साहन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम होऊन यात सीए आशिष हेडा, सीए संदीप कलंत्री मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 6-30 वाजता माहेश्वरी भवन, महेश भवन व इतर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. दु 4 वाजता समाज ट्रस्टच्या वतीने बालकांसाठी स्त्रोत्र पठण कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी 7-30 वाजता समाज ट्रस्टच्या वतीने युवा पीढ़ी साठी संगीतमय भजन उत्सव होणार असून यामध्ये नागपूर येथील भजनकार श्याम शुभम हे आपली प्रस्तुति सादर करणार आहेत.
सोमवार दिनांक २२जून रोजी माहेश्वरी भवन येथे सकाळी 10 वाजता राधाकिशन तोष्णीवाल पब्लिक चेरीटेबल ट्रस्ट व माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने शालेय पारितोषिक व सत्कार कार्यक्रम होणार असून यात प्रमुख पाहुणे म्हणून धामणगाव येथील रमेशचंद्र चांडक व राधाकिसन तोष्णिवाल चेरीटेबल ट्रस्टचे विनोदकुमार तोष्णीवाल उपस्थित राहणार आहेत. सायं 5 वाजता माहेश्वरी भवन येथे वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने डिजिटल रावण ही नाटिका तथा प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार आहे. यानंतर आरती होऊन रात्री 8 वाजता माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने समाजातील महिला, पुरुष, नागरिकाना ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ ही संगीतमय मेजवानी देण्यात येणार आहे.
मुख्य नवमी सोहळा हा दिनांक 23 जून रोजी होणार आहे. या दिनी सकाळी नवमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे द्वारकाप्रसाद सोनी यांच्या उपस्थितीत समाज व राजस्थानी बांधवांसाठी व्यापारी चर्चा व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजता प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत महेश नवमीची भव्य शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा राजराजेश्वर मंदिरापासून प्रारंभ होऊन सिटी कोतवाली, टिळक रोड,जुने कापड बाजार, गांधी चौक, तहसील चौक मार्गे माहेश्वरी भवन येथे पोहोचून येथे मुख्य नवमी कार्यक्रम होणार होऊन मान्यवर समाजाला संबोधित करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सर्व कार्यक्रमाच्या सफलतेसाठी माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत असून या उत्सवात समाजातील महिला, पुरुष, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेत माहेश्वरी समाज ट्रस्ट चे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, सहाय्यक मंत्री विनीत बियाणी, कोषाध्यक्ष देवानंद लढ्ढा,अंकेक्षक सीए मनोज चांडक, सदस्य राजेश लोहिया, प्रा डॉ महेश मुंदडा, पंकज मणियार,आर्कि. पवन बंग, प्रा डॉ रमण हेडा, कुंजबिहारी चांडक, गिरीश तोष्णीवाल, राजेश भन्साली, ॲड. विशाल लढ्ढा, प्रदीप राठी, प्रकाश चितलांगे, दिनेश लढ्ढा समवेत माहेश्वरी समाज ट्रस्ट, महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ, वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा