Diwali20:'प्रभात'च्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपुरक दिवाळीचा आग्रह; आदित्य ठाकरे यांना पाठविले निवेदन

वाढत्या प्रदुर्षणामुळे आणि अर्निबंध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा स्तर सातत्याने खालावत आहे


अकोला: पर्यावरणाचा ऱ्हास एक बिकट प्रश्न असून यातून जागतिक तापमान वाढ, असंतुलित पर्जन्यमान या सह अनेक आव्हान समस्त मानव जाती समोर उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळीदरम्यान फटक्यामुळे प्रदुर्षणाचा प्रकोप वाढतो. कोविड-१९च्या संक्रमणकाळात श्वसनाच्या आजारात वाढ होत असताना महाराष्ट्र शासनाने फटाक्याच्या विक्रीवर बंदी आणावी, या मागणीसह पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करण्याचा आग्रह प्रभात किड्स स्कूलच्या निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केला. 


 

संयुक्त राष्ट्रे, नासा यांच्या माध्यमातून आयोजित जागतिक पर्यावरण कृती प्रकल्प २०२० मध्ये प्रभातच्या विद्यार्थ्यांनी चुणूक दाखवली असून, या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी दरवर्षी दिवाळीत फटाक्यामुळे होत असलेल्या प्रदुर्षणा विरोधात जनजागरण करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राला समृद्ध जैव-सांस्कृतिक विविधता लाभली आहे. मात्र, वाढत्या प्रदुर्षणामुळे आणि अर्निबंध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा स्तर सातत्याने खालवत आहे. या पृष्ठभूमीवर प्रभातच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना फटाक्याच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.



संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते ; मात्र त्यामध्ये प्रदुषणाचा स्तर कमी झाला होता. मात्र आता दिवाळीत फटाक्यामुळे प्रदुर्षणात पुन्हा वाढ होण्याचे चिन्ह आहेत. ज्याप्रकारे काही राज्यांसह मुबंई महानगरपालिकेने फटाक्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे, त्याच प्रमाणे पुरोगामी महाराष्ट्रातदेखील फटाक्याच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालून पर्यावरण रक्षणाचा संकल्प घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. 


 

प्रभातमध्ये सातत्याने पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कौतुक केले आहे. 



हा उपक्रम प्राचार्य वृषाली वाघमारे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. यावेळी प्रभातच्या शिक्षिका व प्रकल्प मार्गदर्शक अलिफिया अलमदार व जागतिक पर्यावरण कृती प्रकल्पाचे विद्यार्थी प्रतिनिधी अर्णव मोहोकार, बतुल अलमदार, दिव्यानी  पापळकर, प्रणव पिसे व अर्थव मिरगे उपस्थित होते.

टिप्पण्या