Akola police: शहर वाहतूक पोलिसांची अशीही माणूसकी; मजूराचे हरविलेले पाकीट केले परत

दुसरीकडे हे पैसे ज्यांना सापडले त्या पोलीस दादाचे आभार कसे आणि कोणत्या शब्दात मानावे,हेच गोलूला समजत नव्हते.



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अलीकडे पोलिसांमधील माणुसकी हरवत चालली,असे काही नागरिक म्हणत असतात.मात्र,खाकी वर्दीतला या माणसाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कणखर राहवेच लागते. कर्तव्य बजावत असताना,अनेक वेळा त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. पण हाच कणखर माणूस जेंव्हा आपल्या कर्तव्यसोबतच माणुसकी आणि प्रामाणिकता जपतो, तेंव्हा तो एखादयासाठी देवमाणूस ठरतो,हे परत एकदा अकोल्यात घडलेल्या घटनेतून  सिध्द झाले.


अकोला शहरातील गजबजलेला गांधी चौक. दिवाळी खरेदी निमित्ताने बाजार गच्च भरलेला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. या चौकात शहर वाहतूक पोलीस सुनील मानकर हे कर्तव्यावर होते, त्यांना गांधी चौकात रस्त्याच्या बाजूला एक पाकीट (Wallet) पडलेले दिसले. त्यांनी हे पाकीट उचलून पाहणी केली असता त्यात त्यांना अडीच हजार रुपये व आधार कार्ड दिसले. त्यांनी आजू बाजूला चौकशी केली. त्यांना माहिती मिळाली की १० मिनिटापूर्वी सायकल वर एक तरुण गेला कदाचित त्याचे ते पाकीट असावे, त्यातील आधारकार्ड वर गोलू जितेंद्र राम रा. झाकरूड, सुंदरेल मध्यप्रदेश असा पत्ता दिसला. 



मानकर हे त्याची चौकशी करीत असतानाच एक सायकल स्वार तरुण भेदरलेल्या अवस्थेत चौकशी करीत असतांना दिसला. मानकर यांनी त्याचे जवळ जाऊन चौकशी केली असता, त्याने अडीच हजार रुपये असलेले पाकीट हरविल्याचे सांगितले. दिवाळीच्या खरेदी साठी मजुरीचे ते पैसे असल्याचे म्हणाला.  त्याचे नाव विचारले असता त्याने गोलू असल्याचे सांगून मजुरी कामासाठी मध्यप्रदेश वरून अकोल्यात आल्याचे सांगितले. पाकीट मिळाले नाही तर दिवाळी अंधारात जाणार असल्याचे सांगितले. खात्री पटल्यानंतर  शहर वाहतूक पोलीस कर्मचारी सुनील मानकर यांनी त्याला त्याचे अडीच हजार रुपये असलेले पाकीट परत केले. 



मेहनतीचे पैसे हरविल्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार,या चिंतेत असताना माणुसकी जपणाऱ्या पोलिसांनी ते परत केल्याने गोलूच्या डोळ्यातुन आनंदाश्रू  आले.एकीकडे हरवलेले पैसे सापडल्याचा आनंद आणि दुसरीकडे हे पैसे ज्यांना सापडले त्या पोलीस दादाचे आभार कसे आणि कोणत्या शब्दात मानावे,हेच गोलूला समजत नव्हते.मात्र, त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या भावना व्यक्त केल्या. मानकर यांनी केलेल्या या सत्कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.


टिप्पण्या