Akola Crime: गुरुवारच्या रात्री अकोल्यात घडला थरार; पतीनेच केले पत्नीला ठार !

हे क्षुल्लक वाद विकोपाला गेल्याने या वादातून महिलेची हत्या झाली,





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: आपातापा रोडवरील दम्माणी हॉस्पिटल मागे असलेल्या वस्तीत घरगुती वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना रात्री साडे नऊ -दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव संगीता प्रशांत इंगळे असल्याचे कळते. पती पत्नीत झालेल्या घरगुती वादातून हा थरार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.



अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपातापा रोडवर संगीता प्रशांत इंगळे ही विवाहिता राहते. या महिलेच्या घरात रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद व्हायचे. हे क्षुल्लक वाद विकोपाला गेल्याने या वादातून महिलेची हत्या झाली असावी,असा कयास पोलीस  सूत्रांनी वर्तविला. मृतक महिलेचा पती प्रशांत हा नोकरी रोजगार निम्मित नाशिक येथे राहतो तर ही महिला आपल्या दोन मुलांसह आपातापा रोड परिसरातील एका वस्तीत राहत होती. तिचा पती मुलांना आपल्या सोबत घेवून जाण्यासाठी अकोल्यात आला होता. या कारणावरून मृतक आणि तिच्या पती मध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने, रागाच्या भरात पतीने पत्नीच्या पोटावर चाकूने वार करून तिला ठार केले,असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असून, तो फरार झाला असल्याची शक्यता गोपनीय सूत्रांनी व्यक्त केली.



घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम, सिव्हिल लाईन पो. स्टे.चे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेचा अधिक तपास पोलीसांनी सुरू केला. या घटनेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पण्या