Akola crime: पोलीस तक्रारीला १५ दिवस उलटूनही 'देवमाणूस' डॉक्टर आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई शून्य!

लागोपाठ घडत असलेल्या या घटनांमुळे अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रामुळे जनसामान्यांच्या  सध्या ' कोण डॉक्टर खरा कोण खोटा 'याचीच चर्चा सुरु आहे.

                         प्रातिनिधिक छायाचित्र



भारतीय अलंकार

अकोला : एका डॉक्टरने चुकीचा सल्ला देवून फसवणूक केल्याची तक्रार १५ दिवसापूर्वी एका वृद्धेने रामदास पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवर १५ दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप पर्यंत कारवाई केलेली नाही,नेमके या प्रकरणात कुठे पाणी मुरत आहे,असा प्रश्न वृद्ध तक्रारदाराला आता पडला आहे.



चुकीचा सल्ला देणारा डॉक्टर आणि तो काम करीत असलेल्या नावाजलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात १५ दिवसापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोल्यात दिवसागणिक वैद्यकीय क्षेत्रातील कारनामे उघडकीस येत असल्यामुळे देवरूपी 'देवमाणूस' वरचा लोकांचा विश्वास पार रसातळाला जात आहे.



लागोपाठ घडत असलेल्या या घटनांमुळे अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रामुळे जनसामान्यांच्या  सध्या ' कोण डॉक्टर खरा कोण खोटा 'याचीच चर्चा सुरु आहे. कारण एका ७३ वर्षीय माहिलेनी डॉक्टरांनी चुकीचा सल्ला दिल्याचा आरोप करत रामदास पेठ पोलिसात तक्रार दिलेली आहे.

 


वाशिम जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा गावातील शेतकरी कुटुंबातील ७३ वर्षीय अनुसूयाबाई घुगे. अनुसुयाबाईंना डोळ्याचा त्रास होत असल्याने त्या उपचारासाठी अकोल्यात आल्या होत्या. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना काही चाचण्या करायच्या होत्या. या दरम्यान त्यांनी अकोल्यातील ' आयकॉन ' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. कार्डिक अहवालात त्यांचे हृदय केवळ २८ टक्के काम करत असल्याचे येथील डॉ.बिनीत सिन्हा यांनी सांगितले. त्यामुळे अनुसुयाबाई आणि त्यांचे कुटुंबिय प्रचंड घाबरून गेले होते. अनुसयाबाई यांना एका महिन्याचं औषध घेण्याचा लेखी सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, या सोबतच मौखिकरित्या अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देखील डॉ सिन्हा यांनी दिल्याचा आरोप अनुसुयाबाई यांनी केला आहे.



रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी खातरजमा करण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तपासणी अहवालाने त्यांच्या जीवात जीव आला.कारण दुसऱ्या अहवालानुसार अनुसुयाबाईंचे  हृदय ६० टक्के काम करत असल्याचे समजले . यामुळे गरज नसतांना रुग्ण महिलेला  ओंजीओप्लास्टी करण्याचा सल्ला दिल्याने आणि दोन्ही अहवालात मोठी तफावत असल्याने डॉ. सिन्हा व आयकॉन हॉस्पीटल यांचे विरुष्द रामदासपेठ पोलिस स्टेशनला अनुसया बाई यांनी तक्रार दाखल केली. 




दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला नसता तर आज शेती आणि घर विकायची पाळी कुटुंबियांवर आली असती,असे अनुसया बाई यांनी म्हंटले. चुकीचा सल्ला देणारे डॉक्टर आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहीलेले नाहीत. आता याची तक्रार पोलिस दप्तरी नोंदविली असून जवाबदार डॉक्टरांवर कारवाई त्वरित व्हावी,अशी मागणी अनुसयाबाई यांच्या स्नुषा रेखा घुगे यांनी केली आहे.



२२ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी रामदासपेठ पोलिस स्टेशनला हॉस्पिटल आणि डॉक्टर विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. हॉस्पिटल आणि डॉक्टर विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. कायद्या नुसार डॉक्टरां विरुद्ध थेट गुन्हे दाखल करता येत नसल्याने  सध्या या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कागदपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठविली असल्याचे रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी सांगितले. 


तर अनुसुयाबाईंनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे डॉ  बिनीत सिन्हा यांनी म्हंटले आहे.  


कोरोना महामारीच्या या काळात खऱ्या अर्थाने डॉक्टर देवदूत नाही तर देव म्हणून समोर आले आहेत. मात्र, अकोल्यातील घडत असलेल्या प्रकरणांमुळे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चौकशी अहवाल लवकर प्राप्त होवून, या प्रकरणातील सत्य लवकर बाहेर यावे,अशी तक्रारदार वृध्द महिला रुग्ण व  तिच्या नातेवाइकांची अपेक्षा आहे.




टिप्पण्या