Agriculture: हरभरा, तुर, मकाचे चुकारे न दिल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी केले मुंडन

खरेदी विक्री संस्थेच्या बेताल कारभारा मुळे शेतकरी खवळले. तेल्हारा खरेदी-विक्री संघात शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन.



भारतीय अलंकार

तेल्हारा : या हंगामातील शासनाला खरेदी विक्री संस्था तेल्हारा यांचे मार्फत शेतकऱ्यांनी विकलेल्या हरभरा, तुर, मका या धान्याचे चुकारे मिळाले नाहीत, या निषेधार्थ शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाचे कार्यालय गाठून मुंडन केले.


याठिकाणी संस्थेचे पदाधिकारी बोलावूनही ते येण्यास तयार नसल्याने, शेतकऱ्यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी हिवरखेड येथील शेतकरी श्याम भोपळे यांनी खरेदी विक्री संघाच्या मनमानी कारभाराचा चांगलाच समाचार घेत मुंडण केले. जोपर्यंत हरभरा तुर मका चे चुकारे होत नाही तो पर्यंत मुंडण करत राहू, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.


 

तेल्हारा तालुक्यातील शेतकरी तुर हरभरा सोयाबीन मका ही पिके घेतात हंगाम २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांनी शासनाचे हमी भावाने आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हरभरा मका खरेदी करण्याबाबत खरेदी विक्री संघाचे कार्यालय जावुन अधिकृत नोंदणी केली होती. त्यानुसार खरेदी विक्री संघाने हरभरा व मकाची वजन व प्रतवारी करून शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन शेतकऱ्यांना तशा पावत्या सुध्दा दिलेल्या आहेत.



परंतु अद्यापही या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. यावर्षीच्या २०२०-२१ च्या रब्बी हंगामाकरीता हरभरा गहू मका या पिकाच्या मशागतीसाठी पैसा नाही पुढे दिवाळी सुध्दा आहे. त्यामुळे पैश्याची जुळवाजुळव कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या प्रकरणी चौकशी करुन मालाची रक्कम त्वरीत मिळावी अशा आशयाचे निवेदन तेल्हारा तहसिलदार यांना दिले आहे.



यावेळी  श्याम भोपळे, सुधाकर गावडे , सुधीर साखरे, अनिल वाकोडे, भारती खडसे, नागेश इंगळे, स्वप्निल नवरात्र, शांता अहेरकर, ओमप्रकाश उंबरकार ,सुभाष टोहरे, गजानन रेळे, महेश खोंड, भानुदास चोपडे, पांडुरंग कागटे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 


तेल्हारा खरेदी विक्री संघामध्ये पदाधिकारी यांचा कोणताही ताळमेळ नाही. शेतकऱ्यांच्या समस्या बाबत त्यांना काही देणे घेणे दिसत नाही. संस्थेकडे पैसा शिल्लक असतानाही ते ठराव घेण्यात चालढकल करीत आहेत. शेतकऱ्यांना यांचा जोरदार फटका सहन करावा लागत आहे. याबाबतही यावेळी शेतकऱ्यांनी खरेदी विक्री एकंदरीत कारभारावर  फटके बाजी करून निषेध नोंदविला.

टिप्पण्या