agricultural news: कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर

                  कृषि वार्ता 

Now use WhatsApp and blogs for information on agricultural schemes




मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले.


 


राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबींचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हॉटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची  सुविधा तयार करण्यात आली आहे.


 


मातीत राबविणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.



 


मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’  शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तीस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.


 


सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास २७ योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.


 


विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.


***

खते, बियाणे, औषधे परवाना नूतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा



खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नूतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबध्द नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.


 


कृषी विभागातील विषयनिहाय आढावा बैठक नुकतीच कृषीमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह राज्यातील संचालक सर्व विभागीय कृषी सहसंचालक उपस्थित होते.


 


बैठकीत ‘विकेल ते पिकेल’ अभियान, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे याबाबतचा आढावा घेण्यात आला. राज्यात मोठ्या प्रमाणात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू असून त्यांचा तपशील विभागाकडे असणे आवश्यक आहे. त्याबाबत सर्वेक्षण करून माहिती एकत्रित करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.


 


शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री स्टॉलच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तथापि इच्छुक शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती, प्रशिक्षण, मालाचा दर्जा, त्याची रास्त किंमत, मालाची योग्य मांडणी यासारख्या बाबी देखील अधोरेखीत करणे गरजेचे असल्याचे  भुसे यांनी सांगितले.


 


राज्यात नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याबरोबरच या अगोदर स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक आधाराची गरज आहे. शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत असलेल्या विविध योजना नवीन असल्याने सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात यावे. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना शेवटच्या घटकापर्यंत व लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही कृषीमंत्री  भुसे यांनी यावेळी दिले.

टिप्पण्या