World Post Day: मामाचं पत्र हरवलं...आम्हाला आजही नाही सापडलं…

     जागतिक टपाल सेवा दिन विशेष

पत्र लिहिणे आता तर जवळपास नाही. पूर्ण पणे बंदच झाले आहे. भाषा विषयात काही गुणां पुरता पत्रलेखन उरलं आहे.

             Uncle's letter lost



नव्या पिढीला परिचित नसलेला खेळ म्हणजे ‘ मामाचं पत्र हरवलं ' मामाचे पत्र का हरवलं, आणि हरवलं तर ते कुणाला का सापडत नाही,असे त्यावेळी कधी मनात प्रश्न निर्माण व्हायचे नाहीत. मात्र, मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरची ख्याली खुशाली त्यामधून कळत होती. त्याकाळी १५, २०, २५, ५० पैशांचे पोस्टकार्ड १ रुपयांचे आंतरदेशीय पत्र, ५ रुपयांचे पार्सल, रजिस्टर्ड लिफाफा हे सुध्दा जगण्याचे मुख्य घटक होते. टपाल घेवून येणारे कुणाचे पोस्टमन काका तर कुणाचे पोस्टमन मामा (आदराने छोटी मुळे पोस्टमनला काका किंवा मामा म्हणायची )आपल्या घराकडे कधी येतात याची सर्वजण टक लावून वाट पहायचे. 




पोस्टकार्डमुळे दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांच्या कडल्या चांगल्या वाईट बातम्या उशीरा का होईना पण मिळायच्या. लग्न जुळल्याच्या बातम्या, मौन्ज, डोहाळे, बारसे कार्यक्रमाचे निमंत्रण पोस्ट कार्डने मिळायचे. कधी निधनाच्या बातम्याचे पत्र आले की,ते पत्र वाचून टराटरा फाडून घराबाहेर फेकून देण्याची एक प्रथाच होती.घरात वाईट बातमीमुळे अमंगल घडू नये, असा त्यामागचा हेतू असे. सर्व महत्वाची पत्रे, ख्याली खुशालीचे पत्र जमा करून ठेवायला प्रत्येकाच्या घरात त्याकाळी दिवाणखान्यात  दिमाखात तारकेट लटकलेली दिसायची. तर मुलांच्या खोलीत पोस्ट बॉक्स सारख्या पिग्गी बँक राहायच्या.



स्वातंत्र्यपूर्व काळात देखील ब्रिटिशांच्या राज्यात टपाल सेवा होती.  स्वातंत्र्य मिळाल्या नंतर  देशात नागरिकरणाने वेग धरला. गावा कडला युवा वर्ग शहराकडे झेपावला. ज्यांना गावाच्या मातीशी प्रेम होतं, अशी माणसं गावातच राहिली. मातीशी इमान राखणारे प्रौढ आणि वृध्द पिढी गावाकडे राहिली. मात्र, पैसे कमविण्यासाठी बाहेर पडलेले युवा आईवडील व नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी पोस्टकार्डचा वापर करीत होते. पैश्याची देवाण-घेवाण करण्यासाठी 'मनी ऑर्डर' या टपाल सेवेचा वापर करीत होते. त्यावेळी टेलिफोन सेवा फक्त गर्भ श्रीमंताच्या कडेच असायची, म्हणून पत्रव्‍यवहार (टपाल सेवा) जगण्याचा मुख्य भाग होता.



नोकरदार वर्गासाठी टपाल सेवा संदेश वहनाचा खात्रीलायक आणि स्वस्तातील मार्ग होता. संदेश वहनाच्या पध्दती काळानुरूप आणि तंत्रज्ञाना नुसार बदलल्या. १९९० च्या दशकात टेलिफोन सेवा घरोघरी पोहचली. २००० नंतर मोबाईल फोन हळूहळू सर्वांच्या हातात दिसू लागली. यानंतर व्होडाफोनच्या जगात घोडाफोनचे महत्त्व पूर्णपणे नष्ट झाले. मोबाइलच्या अवतरण्याच्या काळात सुध्दा अनेक गाव,तांडा,पाडा मध्ये पूर्वी सारखे घोड्यावर संदेश वाहक जावून निरोप देण्याचे काम करीत होते. पूर्वी राजघराणे, व्यापारी वर्ग आपले संदेश आप्तेष्टांना  घोड्यावरुन संदेश वाहक पाठवून द्यायचे. वेगवेगळ्या प्रदेशातील राजे महाराजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत ते घोड्या वरून संदेश वाहक पाठवून करीत होते. घोड्या वरून संदेशवहन आधी तर प्रशिक्षित कबुतरां कडूनही संदेश पाठविले जात होते. अनेक ऐतिहासिक वास्तू संग्रहालयात जुन्या काळातील पत्र व्यवहारचे नमुने आजही आपल्याला पाहायला मिळतात. 



सुरवातीला युरोप आणि अमेरिकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले आणि त्यांनी हे टपाल साधन भारतात आणले. टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था हीच याच्या यशाची गमक ठरली.पोस्ट ऑफिसेस प्रत्येक गावात उभारल्या गेली.

संदेश वहनाचे  मोठे जाळे निर्माण झाले.दिडशे वर्षांपूर्वी थाटलेली ऑफिस अजूनही सुस्थितीत आहेत. त्याकाळात तार ( टेलिग्राफ) ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती. अर्जंट निरोप पाठवायचा असला की, तार पाठविला जायचा.कुणा कडे तार आली की,त्यांचे कुणी तरी जवळचे रक्तातील नातेवाईक गचकले (निधन झाले) असावे,असा समज काढण्यात येत असे.आणि तार सुध्दा कुणी मरणासन्न अवस्थेत असे किंवा मृत्यू पावला असेल तरच यायचा, त्यामुळे हा समज दृढ झालेला होता.एखादया लग्नप्रसंगी शुभेच्छा पर जरी तार आला तरी, तार घेवून येणाऱ्या कडे वेगळ्या नजरेने मंडळी पाहत होते. तार रिसिव्ह केल्यानंतर वधू वरा कडील फक्त जेष्ठ मंडळीच्या उपस्थित ज्याला वाचता येत असे,अश्या करवी ती वाचून आणि समजून घेतल्या जायची. नंतर तार कुणी पाठवली,काय संदेश दिला आहे,हे जाहीर केल्या जात होते.  तोपर्यंत मात्र, लग्न मंडपात गंभीर वातावरण निर्माण होत होते. बायकांच्या घोळक्यात कुजबुज अधिकच वाढायची तर काही जणींच्या डोळ्यातून अश्रूपूर येत होते,असे अनेक तार मुळे घडलेले किस्से हसून हसून जेष्ठ मंडळी आज सांगतात.


टपाल तिकिटांचा छंद


टपाल विभागाच्या तिकिटांमुळे पूर्वी तिकिट संग्रह करण्याचा छंद असायचा. आजही अनेकांनी हा छंद जोपासला आहे.  निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे. टपाल विभागाकडून अश्या तिकिटांची प्रदर्शन सुध्दा भरविण्यात येतात.ज्यात दुर्मिळ तिकीट पाहायला मिळतात.



पूर्वी  अशिक्षित लोक असल्यामुळे पोस्टमनलाच बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन द्यावे लागत होते. पोस्टमनला  (डाकिया) घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून ‘पोस्त’ दिली जायची. श्रीमंत घरातून तर काही पोस्टमन हक्काने दिवाळी मागून घ्यायचे. यात मग पोस्टमनला पूर्ण कापड, सूट, पैसे स्वरूपात, महागडी भेटवस्तू स्वरूपात दिवाळी दिली जायची.



कालौघातात संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र, पाच वर्षांपूर्वी पर्यंत पण व्यापारी वर्गाला आणि ग्रामीण भागात पोस्टकार्ड जवळचं वाटायचे. वकील वर्ग सुध्दा आपल्या पक्षकाराला पुढील तारखा सांगण्यासाठी अथवा प्रकरणा संदर्भात आवश्यक असलेला निरोप देण्यासाठी कारकून कडून लिहून पोस्टकार्ड पाठवीत होते.



नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं सहज शक्य झाले आहे.क्षणार्धात एक व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत निरोप जातो.एवढंच नव्हेतर तुमच्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी भरपूर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.ज्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणतात.लाखो करोडो लोकांपर्यंत तुमच्या मनातली गोष्ट या माध्यमातून पोहचते. चॅटींग करणं, फेसबुक  स्टेटस् अपडेट, व्टिटरवरचं व्टिट, टेलिग्राम, टम्बलर, लिंकेडीन, क्यूरा नवीन आलेलं कु आदी जेवढे शोधलं तेवढे मार्ग आंतर जाळ्याच्या (इंटरनेट) जगात उपलब्ध आहेत. त्यातच आपण सर्व रमतो,नव्हे जगण्याचा आवश्यक आणि गरजेचा भाग बनला आहे. सध्या कोरोना महामारी काळात पूर्णपणे इंटरनेटवरच व्यवहार होत आहे. पैसे देवाण-घेवाण, कार्यालयीन व्यवहार,पत्र व्यवहार, धोखा नातेवाईकांशी संवाद, इव्हन प्यार का इजहार एवढंच नव्हेतर गैरव्यवहार, फसवणूक असे सारं काहीं साठी इंटरनेटवर सुरू आहे. टपाल सेवा जेव्हा जोमात होती,तेंव्हा असे गैरप्रकार होत नव्हते; अशातला भाग नव्हे. देवी-देवता कडून पत्र यायचे.एवढ्या एव्हढ्या लोकांना पत्र पाठवले तर देवता प्रसन्न होवून मनोकामना पूर्ण होतात,असा संदेश अश्या पत्रातून दिला जायचा. वर्तमानपत्रातून जाहिराती कडून लोकांना पत्रव्यवहार करून वस्तू पार्सलने पाठवत असल्याचा बनाव करून,लोकांची फसगत होत असायची.याचा जाब पोस्ट ऑफिस कडेच फसवणूक झालेली व्यक्ती विचारायची. अश्या अनेक प्रकरणात रोषाचा पहिला बळी पोस्ट मास्तर व्हायचे. नंतर ते प्रकरण पोलिसात जायचे की कोर्टात जायचे त्याचा थांग पत्ता लागत नसे.मात्र,जणू काही पोस्टानेच फसगत केली, असा समज करून पोस्ट ऑफिसला जबाबदार ठरवल्या जायचे.



पत्र लिहिणे आता तर जवळपास नाही पूर्ण पणे बंदच झाले आहे. भाषा विषयात काही गुणां पुरता पत्रलेखन उरलं आहे. पत्र लिहिताना मोठ्यांना नमस्कार. लहानांना अनेक शुभ आशीर्वाद. अथवा पत्राचा मायना. पत्र पूर्ण झाल्यानंतर काही आठवलं आणि ते लिहायचे राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क.( ताजा कलम). निधनाची वार्ता कळवायची असेल तर त्यात टाकलेली टीप ‘ हे पत्र वाचताच फाडून टाकणे’ ‘या पत्रालाच तार समजून लवकर निघावे’.आदी अनेक गोष्टी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेल्या आहेत.पोस्ट ऑफिस मुळे आवर्ती ठेव (आर.डी. रिकरिंग डिपॉझिट) च्या रुपाने अनेकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. आजही टपाल खात्याशी ही लोकं  जुळलेली आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. (टपाल भविष्य निर्वाह निधी) राष्ट्रीय किसान पत्रच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.


९ ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली. पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगली,त्यांना मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या जोरावर कॉलेज लाईफ मध्ये  उधारी केल्या, पार्ट्या झोडल्या. तर कधी यावरून भांडण तंटे केली,आज ते मनी ऑर्डर कारणीभूत ठरलेले किस्से गोल्डन मेमरी म्हणून अनेकांनी आपल्या मनात साठवून ठेवलेली आहेत.



पत्र संदेश आणि गाणी


हिंदी चित्रपटामध्ये तर अनेक अजरामर गाणी आहेत.अलीकडच्या काळातील मैने प्यार किया या चित्रपटातील 'कबूतर जा-जा...पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ' तुफान गाजलं. लष्करी सेवेतील सैनिक सिमेवरुन आपल्या घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवण्यासाठी टपालाचा आधार घ्यायचे. ‘संदेसे आते है हमे तडपाते हे’ हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं हे त्याचा उत्तम नमुना. 'चिट्ठी ना कोई संदेश...जाने कौनसा देश जहाँ तुम चले गये 'ही जगजीतसिंग यांच्या आर्त आवाजातील गझल एका चिट्ठी चे महत्व सांगते. 




'नाम चित्रपटात पंकज उदासने गायलले व त्याच्यावरच चित्रित झालेल ‘चिठ्ठी आई है ’ हे गाणे सुरू असताना दूरदर्शन वर चित्रपट पाहण्यास आमच्या घरी आलेल्या शेजारच्या आजीला या गाण्यावर रडताना मी पाहिले आहे.  आन शान चित्रपटातील 'शहरी बाबू है मेरा यार चिट्ठी के बदले भेजा तार' या गाण्यातून टपाल सेवेची जलद गतीने कसे चालते याचे महत्व या दोन ओळीतून उलगडते ‘ डाकिया डाक लाया ’ सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं ‘ हमने सनम को खत लिखा ’ ही गाणी डाकिया, डाकबाबू, पोस्टमन,पोस्टमन काका, पोस्टमन मामा आणि टपाल खात्याचे महत्व अधोरेखीत करतात. 



आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यावरही खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले. असे असले तरी, महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्ट सेवा पसंद केली जाते. सनदशीर मार्गाने कोणताही लढा देण्यासाठी कागदपत्रे पाठविण्यासाठी पुरावा म्हणून पोस्टानेच व्यवहार केला जातो.


टपाल खात्याची आणखी एक जलद सेवा म्हणजे आरएमस (रेल मेल सर्व्हीस) महत्वाची कागदपत्रे  एका गावातूनच नव्हेतर राज्यातून दुसऱ्या लांबच्या गावात आणि राज्यात पाठविण्यासाठी आजही या गतीमान सेवेला प्राधान्य द्यावे लागते. 



कोरोनाच्या काळातही घरोघरी जाऊन टपालाचेच नव्हेतर वृद्ध लोकांना त्यांची पेन्शन सुरक्षित रित्या पोहचविणारे   पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम. तसेच प्रत्येक चौकातल्या शेवटच्या घटकेला आलेल्या लाल रंगाच्या टपाल पोस्ट बॉक्सला सुध्दा नमन.



आजच्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात टपाल सेवाही आपल्या कार्याचे स्वरूप बदलत आहेत. टपाल सेवांच्या कार्यप्रणाली मध्ये काळा नुसार बदल घडत आहेत. आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर होवून भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या टपाल सेवेचा प्रवास अजून गतीमान व्हावा, हीच आजच्या या जागतिक टपाल दिनानिमित्त शुभेच्छा. 


          अधिवक्ता नीलिमा शिंगणे-जगड

                            अकोला (विदर्भ)


टिप्पण्या