unlock:रेस्टॉरंट, डबेवाले यांना दिलासा; तूर्तास शाळा,चित्रपट गृह बंदच

राज्यात अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे रेस्टॉरंट चालक आणि डबेवाल्यांना दिलासा मिळाला आहे.


मुंबई: महाराष्ट्रात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनलॉक प्रक्रियेदरम्यान सावधानता बाळगली आहे. राज्यात अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे रेस्टॉरंट चालक आणि डबेवाल्यांना दिलासा मिळाला आहे. 



लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने बुधवारी गाइडलाइन्स जारी केल्या. 


हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बाबतचा निर्णय 

राज्यात ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार आहेत. ५० टक्के क्षमतेने ते चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण विभागाकडून स्वतंत्र गाइडलाइन्स जारी करण्यात येणार आहेत. त्यात कोणती खबरदारी घ्यायची आहे, याबाबत निर्देश देण्यात येणार आहेत. 


रेल्वे सेवा


राज्यातंर्गत रेल्वेसेवेला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तत्काळ प्रभावाने करोनाबाबतचे नियम व अटी पाळून रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवेला परवानगी देण्यात आल्याने हजारो नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल धावत आहेत. या लोकलच्या संख्येत वाढ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस बंदच

राज्यात शाळा, कॉलेज, अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस तूर्त बंदच राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


चित्रपट गृह बंदच

याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, मॉलमधील थीएटर्स, ऑडिटोरियम, सभागृहे याबाबतही तूर्त कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. 


राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांनाही खूप मोठा दिलासा देण्यात आला आहे. डबेवाले आता लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ते लोकलने प्रवास करू शकतील. त्यासाठी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातून क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे.



टिप्पण्या