Soyabean crop:परतीच्या पावसामुळे टिटवा येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन झाले मातीमोल

बार्शीटाकळी तालुक्यासह परिसरातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे खूप  नुकसान झाले.


अकोला:  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी करुन ठेवली आहे. परंतु राज्यात  अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पश्चिम विदर्भातील शेतकरी सुद्धा परतीच्या पावसामुळे हवालदिल झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन वाया गेले. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावातील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पूर्ण मातीमोल झाले.



बार्शीटाकळी तालुक्यासह परिसरातील अनेक भागात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे खूप  नुकसान झाले. शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. सोयाबीनचे  नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.


अनेक ठिकाणी शेतक-यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी रचली.  परंतु परतीच्या पावसामुळे पाणी घुसल्याने सर्व सोयाबीन खराब झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेतला आहे. 


काही गावांत सोयाबीन काढणी अभावी शेतात भिजला. यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या संकटात मजूर वर्ग दरवर्षी प्रमाणे यावर्षी उपलब्ध झाला नाही. यामुळे मिळालेल्या वेळेत खळे करून घेणे शक्य झाले नाही. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतक-यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. मात्र, खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतक-यांवर ऑक्टोबर पहिल्या आठवडयापासून पावसाने कहर करायला सुरुवात केली. 





दुसऱ्या आठवड्यात तर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसल्याने  शेतकऱ्यांच्या  हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावरून घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्पादनात घट झाली. परतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्यामुळे सोयाबीन, उडीद,कपाशी व मूग या पिकांच्या उत्पन्नात यावर्षीही घट झाली आहे.  परिणामी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 




लवकर खळे करून यंदाची दिवाळी गोड करावी, या आशेने शेतक-याने केलेल्या नियोजनावर पावसाने पाणी फेरले आहे. या पावसामुळे शेतक-यांचे सोयाबीन पाण्या खाली गेले. काही ठिकाणी तर काढून टाकलेले सोयाबीचे कडप अक्षरशा पाण्यावर पोहत आहेत. उभ्या सोयाबीनला कर फुटत आहेत. तर काढून ठेवलेल्या सोयाबीन दाण्यांना कोंब फुटत आहे. शेतक-यांची वर्षभराची मेहनत मातीत मिसळली.



दाण्याचा आकार लहान झाला असून, यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. त्यात परतीच्या पावसामुळे काढणीस आलेल्या तसेच कापणी सुरू असलेल्या सोयाबीन पिकांचे भिजून नुकसान झाले आहे.पाऊस झाल्यानंतर पाणथळ जमिनीवरील पिकात पाणी साचून राहिले. तर काही भागात चक्रीभुंगा, खोड माशीने पीक पोखरून नुकसान केले. गतवर्षीप्रमाणेच यंदाही हाती आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांवर संकट आले असून, अनेक अडचणींचा सामना करून शेतातून काढलेला सोयाबीन पीक ओले  झाल्याने बाजारात सोयाबीन पिकाला भाव कमी मिळत आहे. त्यात सरकार आणि व्यापारी शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करून पीकविमा रक्कम त्वरित मिळावी,तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी मनोहर चव्हाण, सीताराम जाधव व टिटवा येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.





   






टिप्पण्या