Political news: हे सरकार एवढे कुंथत कुंथत का चालवले जात आहे; राज ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका Why is this government being run so haphazardly; Raj Thackeray criticizes Chief Minister Uddhav Thackeray

वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय भाव मिळावा, या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे जनक्षोभ उसळला आहे. तरी देखील सरकार शांत आहे. तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच या विषयात सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी मनसे पक्षातर्फे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली. 


मुंबई: राज्यातील जनतेला भरपूर प्रश्न भेडसावत आहेत. मात्र, सरकारचे निर्णय अजूनही बदलताना दिसत नाही आहे. हे सरकार एवढे कुंथत कुंथत का चालवले जात आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची आज गुरुवारी सकाळी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी ही टीका केली. 


लोकल ट्रेन सुरू झालेल्या नाहीत. वाढीव वीज बिलं लोकांना मिळाली. हॉटेल सुरू केलीत पण मंदिराची दारे बंद ठेवण्यात आली, असे टीकास्त्र सोडत हे सरकार  एवढे संथ का काम करत आहे. सरकार एवढे कुंथत कुंथत का चालविले जात आहे, असा सवाल  राज ठाकरे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना उपस्थित केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले. या मागण्यांवर सरकारने एक ते दोन दिवसात निर्णय घ्यावा, अशी मागणी राज ठसकरे यांनी केली.



या कारणांसाठी घेतली भेट

अदानी कंपनी आणि बेस्टच्या अनेक लोकांनी आपली भेट घेतली, त्यानंतर ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आणि आता राज्यपालांनी सरकारला वीज बिलं कमी करण्या संदर्भात निर्णय घेण्यास सांगावे. हे वीज बिल कमी करायला कंपन्या तयार आहेत. सरकार तयार आहे. पण बिलं कमी करणे कुठे अडले आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.



या मागणीसाठी शरद पवारांची भेट तर घेणारच आहोत पण वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार, असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले. सध्या राज्यपाल आणि सरकार यांच्यात जे सख्य आहे ते पाहता त्यांचे बोलणे होईल का आणि त्यावर निर्णय होईल का, ते पहावे लागेल, असा टोलाही राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.



काय लिहले आहे निवेदनात

राज्यातील जनतेशी संबंधित दोन अत्यंत महत्वाच्या विषयांच्या बाबतीत सरकारने काही ना काही पाऊलं ही तातडीने उचलायला हवीत, जरी ह्या विषयांत आमचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरु असला तरी ह्यावर सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद इतका प्रलंबित आहे की, आता सरकारचे घटनात्मक प्रमुख ह्या नात्याने आपण ह्या विषयांत लक्ष घालून सरकारला निर्देश द्यावेत आणि जनतेला दिलासा द्यावा.



पहिला विषय आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या  दूध दराचा. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्याला एका लिटरच्या मागे १७ ते १८ रुपये देतात पण त्यावर स्वत: मात्र भरघोस नफा कमवतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ ह्यामुळे आधीच शेतकरी गांजलेला असतो त्यात वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल देखील खूप महाग झाली आहे आणि त्यामुळे शेतक-याला एका लिटर मागे किमान २७ ते २८ रुपये मिळायला हवे आणि ह्यासाठी राज्य सरकारने लक्ष घालायला हवं.


अजून एक सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना पाठवलेली वाढीव वीजबिलं. आधीच उदरनिर्वाहाची साधनं बंद, त्यात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे गेले ७ महिने बंद असल्यामुळे अनेकांनी रोजगार गमावला आहे, अनेक आस्थापनं बंद आहेत आणि अशा परिस्थितीत वीज बिलांनी दिलेला शॉक जबरदस्त आहे. ह्या विषयात माझे सहकारी वीज मंत्र्यांना भेटून आले, आम्ही आंदोलनं केली पण सरकार अजूनही ह्यात मार्ग काढायला तयार नाही. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजविलातील वाढीव रक्कम परत करायला हवी. हे दोन्ही विषय सामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत आणि जनतेला ह्यात लवकरात लवकर प्रतिसादाची अपेक्षा आहे आणि ह्यासाठी सरकारला आपण सूचना द्याव्यात,असे निवेदनात नमूद केले आहे. 





टिप्पण्या