Navratri2020: मौन आणि उपवासात किती ताकद असते;ते नवरात्री उत्सवाने शिकविले

             स्वानुभव-स्वानुभूती


त्यांनी पुन्हा मला सांगितले त्या दुकानात चोरी झाली, तुम्हाला माहित आहे का? मी मान हालवली की मला माहित नाही म्हणून? त्यावर त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिले एवढं सांगितल्यावरही हा बोलत नाही? हा मुका वगैरे तर नाही ना? मग आमच्या मंडळातील एक सदस्य तिथे आला  व त्याने पोलिसांना सांगितले की याचे नवरात्राचे उपवास असल्यामुळे तो बोलत नाही.



✍️संजय बोबडे

आमच्या परिवारात आम्ही एकूण तिघे जण मी, माझी पत्नी व मला एक कन्यारत्न आहे. सध्या ती इयत्ता ११ वीत आहे. सांगण्याचा भाग असा की मी नवरात्राचे उपवास करण्याचे वयाच्या १९ व्या वर्षीपासून सुरू केले. मी माझ्या मामांच्या घरी राहात होतो. उपवासाचे औचित्य असे होते की, त्यावेळेस मित्र मंडळींनी इनकम टॅक्स चौकात देवी बसविण्याचा घाट घातला. आता जन्माने ब्राम्हण असल्याने सर्वांनी मला देवीच्या पूजेची व एकंदरीत मंडपाच्या आतील सर्व जबाबदारी सोपविली. आता देवीचे करायचे म्हटल्यावर उपवास हा आलाच. म्हणून मी उपवास करण्याचे ठरविले. आता उपवास म्हणजे फराळाचे खायची सोय नाही, मामांकडे राहात असल्याने कोण फराळाचे करून खाऊ घालणार, उपवास करतो कर आम्ही काय करणार जे शिजवले आहे ते खा. फराळाचे कुठुन आणायचे. मी सगळ्याच गोष्टींचा विचार केला आणि ठरवलं रोज सप्तशतीचा पाठ झाला की, १ ग्लास पाणी मग दिवसभर काहीही खायचे नाही. पण मग शरीरातील त्राण कसा टिकवायचा यावर मी एक उपाय काढला. आपण जर अष्टमी पर्यंत मौन राहायचे. ठरलं. तेव्हापासून आजतागायत मी दर नवरात्रीला अष्टमीपर्यंत फक्त पाण्यावर उपवास करतो आहे आणि हे निरंतर चालू आहे. बरं अशात मी कधी आजारी वगैरे पडत नाही, किंवा मला थकवा जाणवत नाही, परत मी दैनंदिन कामावर देखील हजर असतो. पायात चप्पल नाही व कोणाशी बोलत देखील नाही. 



मौन आणि पोलीस

यावरून मला एक किस्सा येथे सांगावसा वाटतो, देव कसा परीक्षा घेतो ते पहा मी ज्या वर्षीपासून उपवासाला सुरूवात केली तेव्हा मला पंतप्रधान रोजगार योजनेमधून लोन मिळाले होते. मी त्यापासून आपले स्वत:चे एक रेडिमेड कापडाचे दुकान लावले होते. दुकान बऱ्यापैकी चालतही होते; परंतु अचानक माझ्या दुकानात नवरात्राच्या अदल्यादिवशी चोरी झाली. मला या गोष्टीची काणकुणही नव्हती. मी सकाळी इनकमटॅक्स चौकात देवीच्या पूजेची तयारी करीत असताना माझ्याजवळ पोलिस आले व त्यांनी संजय बोबडे कोण म्हणून मला विचारले तेव्हा बोलण्याची सोय नाही. पण मी जवळ येऊन उभा राहिलो.



तेव्हा त्यांनी सांगितले की तुमचे रिंगरोडवर कापडाचे दुकान आहे का? मी मान हालवली ते माझ्याकडे पाहात होते? त्यांनी पुन्हा मला सांगितले त्या दुकानात चोरी झाली, तुम्हाला माहित आहे का? मी मान हालवली की मला माहित नाही म्हणून? त्यावर त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिले एवढं सांगितल्यावरही हा बोलत नाही? हा मुका वगैरे तर नाही ना? मग आमच्या मंडळातील एक सदस्य तिथे आला  व त्याने पोलिसांना सांगितले की याचे नवरात्राचे उपवास असल्यामुळे तो बोलत नाही. त्याने तुमचे म्हणणे ऐकलेले आहे. तो आपल्या दुकानात नेमके किती नुकसान झाले याचे अवलोक करून तुम्हाला पोलिस 'ठाण्यात येऊन भेटेल असे त्याचे म्हणणे आहे. नवरात्र झाल्यावर तो येईल. एवढा मोठा किस्सा घडल्यावरही मी मौनच होतो. त्यामुळे सांगायचे ताप्तर्य एवढंच की मी आजतागायत  या उपवासाच्या काळात अजिबात बोलत नाही. 



पत्नीला देखील नवल वाटे

असेच माझ्या पत्नीला देखील नवल वाटलं होतं. लग्नानंतर ती जेव्हा घरी आली आणि नवरात्र काळात तिने हे सर्व पाहिले ती सरळ घाबरलीच पण आईने समजवून सांगितले तुझा नवरा देवीचे कडक उपवास करतो त्यामुळे तु काळजी करू नको आम्हाला याची सवय आहे. अष्टमीचा होम झाल्यानंतर मात्र मी बोलतो व नवमीला सवाष्ण-ब्राम्हण यांचे जेवण झाल्यावर थोडाफार भात खातो व मग हळू हळू माझं रूटीन सुरू होते. हे मी सर्व १९८९ पासून सुरू केले आहे. आज माझ्या या व्रताला जवळपास ३० वर्ष पूर्ण होऊन ३१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनेकांनी माझी थट्टा, मस्करी उडविली पण मी मात्र या नऊ दिवसात कोणालाही काहीही बोलत नाही. आता सर्वजण हळूहळू मला समजून घेतात. 


ऑफिस मध्ये सर्वांचे सहकार्य

ऑफीसमध्ये तर सर्वांनाच या गोष्टीची माहिती आहे. मी देशोन्नती न्यूजपेपरला संपादकीय विभागात पेजिनेशन करतो. त्यामुळे मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पण सर्व ज्येष्ठ सहकारी मला कुठलाही त्रास होऊ देत नाही. त्यांच्या कृपाप्रसादानेच मी माझे हे व्रत निरंतर करू शकतो त्याकरिता त्या सर्वांचे या' ठिकाणी आभार मानतो तसेच माझ्या परिवाराने देखील मला  उत्तम सहकार्य केले त्यामुळे मी गेली ३० वर्षे हे सर्व करू शकलो एवढेच मला या 'ठिकाणी सांगायचे आहे. 

सरतेशेवटी एवढंच म्हणेन हे सर्व ती आई जगदंबा पूर्ण करून घेत असते त्यामुळे आपण फक्त तयार असायला हवे बाकी सर्व तिच्यावर सोडून द्यायचे. 


जय जगदंब!!



।।सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरंण्ये त्र्यंम्बके देवी, नारायणी नमोस्तुते।।


                       संजय मधुकर बोबडे

                         व्दारा/सुदाम नगरी,

                           तापडिया नगर, 

                               अकोला



टिप्पण्या