Mahatma Gandhi Jaynti: महात्मा गांधी जयंती निमित्त वर्धा शहरात दीपोत्सव

काळानुरूप  महात्‍मा गांधीचे विचार आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक होत आहेत. गांधीजी हे धर्म, पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे  सर्व जगाकरिता सर्वमान्‍य नेता होते. त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून  सत्‍य व अहिंसा हा संदेश दिला. गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे प्रतिपादन  महाराष्‍ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.

वर्धा येथील हिंदी विश्‍वविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यक्रम व उपक्रमांची प्रशंसा करत विविध उपक्रमातून  गांधीजींचा संदेश जनमानसात पोचविला जात आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला .


 

वर्धाराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्‍टोबर रोजी महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय आणि नागरिक समिती वर्धा यांच्या वतीने वर्धा शहरात भव्य दीपोत्‍सव साजरा करण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून  गांधीजींना एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने वर्धेकरांकडून अभिवादन करण्यात आले. दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ हिंदी विश्‍वविद्यालयातील गांधी हिल्‍स वर दीप प्रज्‍ज्‍वलनाने झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी व राजस्थानचे राज्यपाल  कलराज मिश्र यांनी  महाराष्ट्र व राजस्थान येथील राजभवनातून दीप प्रज्ज्वलित करुन दीपोत्सवाचा शुभारंभ केला.


विद्यापीठाच्या गालिब सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्‍ट्राचे  राज्‍यपाल भगत सिंह कोश्‍यारी , राजस्‍थानचे राज्‍यपाल कलराज मिश्र तसेच विश्वविद्यालयाचे कुलाधिपति प्रो. कमलेश दत्‍त त्रिपाठी यांनी ऑनलाइन  उपस्थित राहून दीपोत्सवाचे उदघाटन केले.

 

 

याप्रसंगी सभागृहात महाराष्‍ट्र राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार  रामदास तडस,  जिल्हाधिकारी  विवेक भीमनवार उपस्थित होते.  कुलाधिपति प्रो. कमलेश दत्‍त त्रिपाठी यांनी कार्यक्रमाची अध्‍यक्षता केली. राजस्‍थानचे  राज्‍यपाल कलराज मिश्र यांनी गांधीजींची कर्मभूमी वर्धा येथून जगात अहिंसा व शांततेचा संदेश प्रसारित झाला पाहिजे असे सांगून गांधीजींचा सर्वोदय विचार आजची गरज असल्याचे स्पष्ट केले. 



राज्‍यपालांनी विश्‍वविद्यालयाचे अध्‍यापक डॉ. लेखराम दन्‍नाना द्वारा संस्‍कृत मध्ये भाषांतरित  ‘मंगल प्रभात’ या पुस्‍तकाचे ई-लोकार्पण केले.   अध्‍यक्षीय भाषणात कुलाधिपती प्रो. कमलेश दत्‍त त्रिपाठी यांनी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांचे कृतित्‍व अनुकरणीय असल्याचे सांगून तळागाळातील शेवटच्या माणसाला सशक्‍त करण्यासाठी गांधी मार्ग सदैव उपयोगी राहणारा आहे.

 

पालकमंत्री सुनील केदार म्हणाले, महात्‍मा गांधी यांनी प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. दीपोत्सवाचे आयोजन हे जिल्ह्यासाठी अनोखे आहे. यातून मानवतेचा  संदेश जनसामान्यांपर्यंत प्रसारित करण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

खासदार  रामदास तडस यांनी गांधीजींच्या वर्धा वास्तव्याचे स्मरण करवून देत, त्यांच्या पावन स्पर्शाने हा जिल्हा भाग्यशाली ठरला आहे असे सांगीतले. विश्‍वविद्यालयाकडून आयोजित दीपोत्सवाची प्रशंसा केली.

 

राज्‍यपाल द्वयांचे  स्‍वागत करतांना विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल म्हणाले की, दीपोत्‍सवातून गांधीजीचे तत्वज्ञान दर्शन व चिंतन यांचा प्रकाश सर्वत्र प्रसारित होईल.

 

प्र कुलगुरु प्रो. हनुमान प्रसाद शुक्‍ल यांनी ऑनलाइन आणि ऑफलाईन सहभागी झालेल्या मान्यवरांचे व उवस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन प्र कुलगुरु प्रो.चंद्रकांत रागीट यांनी केले.

 

पालकमंत्री सुनील केदार, खासदार  रामदास तडस,जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, कुलगुरु प्रो रजनीश कुमार शुक्ल यांनी गांधी हिल्‍सवर दीपोत्‍सवाचे निरीक्षण केले व महात्‍मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.  यानंतर कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल,  प्रो. हनुमान प्रसाद शुक्‍ल,  प्रो. चंद्रकांत रागीट, डॉ पीयूष प्रताप सिंह, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. राजेश लेहकपुरे, डॉ भरत पंडा, बी. एस. मिरगे यांनी वर्धा शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन दीपोत्‍सवाची पाहणी केली. शहरातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सघटनांनी चौका चौकात मातीपासून तसेच गायीच्या शेणापासून बनविलेले दीप लावून गांधी जयंती निमित्त दीपोत्सव साजरा केला. यामुळे सर्व  शहर उजळून निघाले होते.

टिप्पण्या