fight against Corona: 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम कोरोना विरुद्धच्या लढाईत ठरतेय एक प्रभावी शस्त्र!

             Sunday special

कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणारी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम एक प्रभावी शस्त्र ठरत आहे.

'My family, my responsibility' campaign An effective weapon in the fight against Corona!




कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी अकोला जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उप जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारूखी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून राबविण्यास सुरूवात करण्यात आली असून, या मोहिमेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
शहर, गावे, पाडे, वस्त्या व ताडे येथील प्रत्येक नागरिकापर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.



पालकमंत्री ना. बच्चू कडू हे वेळोवेळी या मोहिमेचा आढावा घेत असून, संबंधित यंत्रणा आणि अधिकारी वर्गाला आवश्यक त्या सूचनाही देत आहेत. जिल्ह्यातील खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरीया, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणजित पाटील यांचेही या मोहिमेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.



गेल्या सुमारे सात महिन्यांपासून भारतात हैदोस घालीत असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणारी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यासाठी गृहभेटी देण्याकरिता आरोग्य पथके तयार करण्यात आली असून, या पथकामध्ये ज्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी उपलब्ध आहे त्याठिकाणचा एक आरोग्य कर्मचारी, एक आशा स्वयंसेविका आणि ग्रामपंचायतने सुचविलेला एक स्वयंसेवक अशा तिघांचा समावेश असून, ग्रामीण भागात १०७४ आणि नगर परिषद क्षेत्रात १५१ अशा एकूण १, २२५ टीमच्या माध्यमातून या मोहिमेचा पहिला टप्पा १२२ पर्यवेक्षकांच्या नियंत्रणाखाली आणि ३७ रूग्णवाहिकांच्या मदतीने १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला. दुसरा टप्पा आता १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एक पथक दररोज सुमारे ५० घरांना भेटी देत आहे. 



पहिल्या टप्प्यातील २५ दिवसांच्या कालावधीत या मोहिमेत ग्रामीण भागातील एकूण २ लाख २८ हजार ९२९ घरांमधील १० लाख १७ हजार ८३३ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सारी आजाराचा आणि सर्दीचा त्रास असलेले २२९, तापाचे ४२१, रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेले २५४ असे एकूण ९०४ कोविड संशयीत रूग्ण आढळले. त्यांच्या स्वॅबचे आणि रक्ताचे नमुने घेवून पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय संस्थांमध्ये संदर्भीत करण्यात आले. त्यासोबतच उच्च रक्तदाब असलेले ९, ५५३, मधुमेहाचे ७, ०६६, किडनी विकाराचे २, ६१०, लिव्हरचा आजार असलेले ३५ आणि इतर आजार असलेले ३, ०७५ असे विविध रोगांनी ग्रस्त २३, ३३९ रूग्ण ग्रामीण भागात आढळून आले. त्यांच्यावरही योग्य ते उपचार करण्यात येत असून, ज्यांना अतिरिक्त उपचारांची गरज आहे त्यांना शासकीय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भीत करण्यात आले आहे. या मोहिमेची माहिती आरोग्य विभागाच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अ‍ॅपमध्ये भरण्याची जबाबदारी आशा, आरोग्य कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली असून, आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील ५,९०,३३६ लोकांची नोंद या अ‍ॅपमध्ये घेण्यात आली आहे. उर्वरित लोकांची येत्या दोन दिवसांमध्ये या अ‍ॅपमध्ये नोंद होणे अपेक्षित आहे. 

विविध स्पर्धा आयोजित

या मोहिमेंतर्गत ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखाने, अ‍ॅलोपॅथीक दवाखाने स्तरावर बॅनर, पोस्टर, हँडबिलस, माहिती पुस्तिकांचे वितरण करण्यात आले असून, मोहिमेच्या अनुषंगाने तालुकानिहाय निबंध स्पर्धा, कलरफुल पोस्टर स्पर्धा, मॅसेजेस व शॉर्ट फिल्म स्पर्धादेखील आयोजित करण्यात आल्या आहेत. गृहभेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे तसेच सदर रूग्णाला एखादा दुर्धर आजार आहे का याची माहिती घेण्यात येत असून, ताप, खोकला, दम लागणे, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनीकमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. 


फिवर क्लिनीकमध्ये कोविड-१९ प्रयोगशाळा चाचणी करुन आवश्यकता भासल्यास पुढील उपचार केले जात आहेत. विविध रोगांनी ग्रस्त असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का? याचीही खात्री केली जात आहे. आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी रूग्णांना संदर्भित केले जात आहे. प्रत्येक पाच ते दहा पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देत असून, घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगण्यात येत आहे. जनजागृतीवरही विशेष भर देण्यात येत आहे.


लोकसंख्येनुसार आरोग्य पथके 

लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, शहर व गाव येथे आरोग्य पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना आवश्यक ते साहित्य वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक ५ ते १० पथकामागे एक डॉक्टर निश्चित करण्यात आला आहे. रोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी विकार असलेल्यांसाठी लागत असलेल्या औषधींचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय स्तरावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला असून, संदर्भित रुग्णांना संशयीत रुग्ण कक्षात दाखल करुन कोविड-१९ चाचण्या करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यात एक ताप उपचार केंद्र स्थापन करण्यात आले असून, संशयीत कोविड-१९ रुग्णांना या केंद्रांमध्ये आणण्यासाठी प्रत्येक दोन ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमागे एक रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. मोहिमेसाठी लोकप्रतिनिधी, खासगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.  



मोहिमेची सांगता २५ ऑक्टोबर रोजी


या मोहिमेची सांगता २५ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही यंत्रणा राज्यातील घराघरात पोहोचलेली आहे. प्रत्येक कुटुंबाशी त्यांचा संपर्क असतो. त्यामुळे त्यांच्या सहभागाने, सहकार्याने  'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे घराघरात पोहोचत आहे. कोणतेही अभियान व योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येत  असल्यामुळे कोरोनाबधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य झाले आहे. नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदिंबाबत खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा.पहिल्या टप्प्यात जसे या मोहिमेला सहकार्य केले तसेच सहकार्य द्वितीय टप्प्यातही देवून कोरोनाला हरविण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होवूया!



                         ✍️ लेखन व माहिती  
                                                                                           -प्रकाश गवळी
          जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी
           जिल्हा परिषद आरोग्य विभाग, 
                                           अकोला.
                     

टिप्पण्या