Agricultural: तर आम्ही नेते व अधिकाऱ्यांचे कपडे फाडू-रविकांत तुपकर

ओला दुष्काळग्रस्त भागात दौरा केलेल्या नेत्यांचे आतापर्यंत फक्त फोटो सेशन झाले 


अकोला: येत्या ५ नोव्हेंबर पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू, आणि त्यानंतरही जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर दिसेल तिथे केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांचे आणि चुकीचे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांचे कपडे आम्ही फाडू, असे वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.



अकोला येथे आज रविकांत तुपकर यांनी 'स्वाभिमानी'च्या आक्रमक राज्यव्यापी आंदोलनाची काय दिशा असणार आहे आणि आंदोलन घेण्यामागील उद्देश, याबाबत प्रसार माध्यमाशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.



अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. परंतू, ती अतिशय तोकडी आहे. शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी व इतर मागण्यांसाठी 'स्वाभिमानी' च्या वतीने पुढील आठवड्यात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे असे सांगून, ओला दुष्काळग्रस्त भागात दौरा केलेल्या नेत्यांचे आतापर्यंत फक्त फोटो सेशन झाले आहे,असा टोला तुपकर यांनी लगावला.


केंद्र आणि राज्यसरकार हे शेतकरी विरोधी  सरकार आहे.शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना काहीच घेणं देणं नाही,असे देखील तुपकर म्हणाले.


राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्याच्या विषयावर शरद पवार यांना आठवण करून देत, शेट्टी यांना आमदारकी मिळावी,अशी अपेक्षा तुपकर यांनी व्यक्त केली.रविकांत तुपकर हे सध्या पश्चिम विदर्भाच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत. काल ते अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते.





टिप्पण्या