Teachers day2020:कोरोना: शैक्षणिक वातावरण आणि समस्या - एक आत्मचिंतन

    दिन विशेष-Teachers Day

कोरोना: शैक्षणिक वातावरण आणि समस्या - एक आत्मचिंतन


                               सर्व file photo
पूर्व विदर्भाकडे नजर वळविल्यास लक्षात येतं की पूर ओसरला असला तरी परिस्थिती निवळायला किंवा आटोक्यात यायला बराच वेळ लागतो. अशा स्थितीत पुरग्रस्तांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे काय..?

प्राचीन काळापासून जगामध्ये गुरू- शिष्य परंपरा अस्तित्वात आहे. जन्मापासून मिळालेले आचरण आई-वडिलांच्या सानिध्याने तर जगण्याचा योग्य मार्ग हा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सफल होतो. शिक्षक हे एकाच 'कॅनव्हास'वर विविध रुप-रंगाच्या कलाकृती साकारणाऱ्या चित्रकाराप्रमाणे असतात. संकटांवर मात करण्यासाठी, आव्हाने पेलण्यासाठी आणि स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रेरित करीत असतात. विविध क्षेत्रातील निर्माण होणारी सामर्थ्यवान पिढी शिक्षकांकडूनच घडलेली आहे आणि पुढेही घडत राहील. अशाच शिक्षकांच्या सन्मानार्थ आजचा हा दिवस म्हणजे 'शिक्षक दिन'. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.




दरवर्षी या दिवशी शाळा-महाविद्यालयात जय्यत तरी असायची. शाळेची सजावट, विद्यार्थ्यांचा शिक्षक-प्राध्यापक म्हणून सहभाग, या दिवशीच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व भूमिका या साऱ्यांचे अनोखे चित्र आपणास पहावयास मिळत होते. या वर्षी जरा अखंड जगाचंच तंत्र विस्कळीत झालंय. कोरोना (कोविड-१९) आणि आपण यातून निर्माण होणारी भयावह परिस्थिती, बाधितांचे-मृतांचे प्रमाण याविषयीची हतबलता अतिशय आक्रमकरित्या मनावर नैराश्याचे वादळ निर्माण करणारी आहे. मार्च २०२० पासून शाळा बंद झाल्या, त्या सुट्ट्यांचा काळ सोडला तर पाच महिन्यांपासून बंदच आहेत. 



यावर्षी शिक्षकांना उन्हातून पायदळी रस्ता तुडवून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत 'अ‍ॅडमिशन'साठी फेऱ्या देखील माराव्या लागल्या नाहीत. शाळा बंद, परीक्षा नाही पण निकाल मात्र लागला. उत्तीर्णतेची आकडेवारी १०० टक्के! 

ज्यांना परीक्षा नको होत्या त्यांना आयते गुण, पण ज्यांना हव्या होत्या त्यांचा मनस्ताप वाढला कारण साऱ्यांचे गुण कमी अधिक प्रमाणात सारखेच! असो...आनंदच आहे. परंतु, सध्याच्या काळात ऑनलाईन प्रयोग यशस्वी करू पाहणारे शिक्षक, आत्मसात करू पाहणारे विद्यार्थी आणि त्यात कसरत करणारे पालक या त्रिमितीत प्रचंड गोंधळ निर्माण झालेला दिसतो. 



तिसऱ्या वर्गापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागतंय. त्यातून माहिती नसलेल्या बऱ्याच तांत्रिक गोष्टी, तांत्रिक अडचणी, ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या विविध भौतिक समस्या या साऱ्या घटकांचे समायोजन करण्याचे कसब देखील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनीही शिकून घेतलेले असावे यात शंका नाही. कधी कधी लहान विद्यार्थ्यांना ते त्रासदायक, कंटाळवाणे देखील वाटत असावे तर कधी त्याविषयी हुरूपही वाटत असावा. पहिली घटक चाचणी देखील काही शाळांमध्ये बहुपर्यायी प्रश्न देवून ऑनलाईन घेतली जात आहे. काही मोठे विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणाचा गैरफायदाही घेताना दिसतात.  



उदा. ऑनलाईन तास सुरू ठेवून 'गेम' खेळणे, 'चॅटिंग' करणे, 'मुव्ही' बघणे किंवा आवाज 'म्युट' करून मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे हे सर्व गैरप्रकारही निदर्शनास आलेले दिसतात. ही गोष्ट चांगली की वाईट याकडे वळण्यापेक्षा सद्यपरिस्थिती आणि जीवाची पर्वा याचा विचार करणे अपरिहार्य झाले असल्याने या ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जाणे गरजेचे आहे. 


पण टाळेबंदी लागू झाल्यानंतर 'डोअरस्टेप स्कुल' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले, की शिक्षण घेणाऱ्या ५५ टक्के विद्यार्थ्यांकडे 'डिजिटल' शिक्षणासाठी आवश्यक उपकरणे नाहीत.  हे ऑनलाईन शिक्षण केवळ ज्या विद्यार्थ्यांचे पालक सधन आहेत, किंवा ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे वा लॅपटॉप आहे त्यांनाच शक्य होईल पण गावखेड्यात राहणाऱ्या आणि मोबाईल, लॅपटॉप अशी साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय..? याहीपलीकडे विचार केला तर ज्या गावात नेटवर्कचीच समस्या आहे त्या परिस्थितीवर कसा तोडगा काढता येईल..?  किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिले जातेय का 'ऑनलाईन' शिक्षण..? किंवा केवळ व्याख्यान म्हणजे शिक्षण आहे काय..? लेखन वाचन कौशल्ये, लेखन वाचन दोष, व्याकरणातील चुका, गणितातील पद्धती, सामाजिक शास्त्रे, विज्ञान या विषयातील प्रात्यक्षिके तसेच विद्यार्थ्यांची आकलनक्षमता यांचे मूल्यमापन ऑनलाईन उत्तरांतून किंवा बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तरांतून किंवा केवळ शिक्षकांच्या व्याख्यानातून कसे करता येईल..? यानंतर जरा पूर्व विदर्भाकडे नजर वळविल्यास लक्षात येतं की पूर ओसरला असला तरी परिस्थिती निवळायला किंवा आटोक्यात यायला बराच वेळ लागतो. अशा स्थितीत पुरग्रस्तांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे काय..?




खरे शिक्षण म्हणजे काय..? हा विचार मांडताना 'महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड'चे चीफ मेंटार विवेक सावंत एका लेखात म्हणाले, की मुलांना कुठलीही गोष्ट 'करून' शिकायला आवडतं, नुसतं बघून ऐकून शिकता येत नाही. कृतीजन्य अनुभव आणि नैसर्गिकपणे कौशल्य आत्मसात करण्याची गती यातून मिळणाऱ्या शिक्षणाने सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. या धर्तीवर सध्या शाळा बंद असल्याने काही शाळा शिक्षक वस्त्यांमध्ये जाऊन शिकवत आहेत. सामाजिक अंतर ठेवून कोरोनाविषयी जागृती देखील करीत आहेत. काही शिक्षक प्राध्यापक स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून स्क्रीनवर शक्य तितका प्रत्यक्षपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेणेही तितकेच महत्वाचे आहे. 



परीक्षा हा हल्ली समाज माध्यमांचा ज्वलंत विषय बनलेला, रोजच ऐकायला वाचायला मिळतो आहे. परीक्षा घ्यावी की नको या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अहंभावभरीत वादाने विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. परीक्षा हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. परीक्षेविना निकाल म्हणजे 'शब्दांविना ग्रंथ' असे म्हणता येईल. परीक्षेविना विद्यार्थ्यांचे कुठल्याही बौद्धिक, भावनिक आणि मानसिक क्षमतेचे मूल्यमापन करता येत नाही, शक्यच नाही. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण असो वा व्यावसायिक शिक्षण वा त्यासाठीची प्रवेशिका असो प्रत्येक परीक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे. बी.ए., एम.ए. च्या विद्यार्थ्यांबाबत विचार केल्यास पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम हा दुसऱ्या सत्रात नसतो अर्थात प्रत्येक सत्राचा अभ्यासक्रम हा निगडित नसून स्वतंत्र असतो त्यामुळे त्या त्या सत्राचा अभ्यास केल्याशिवाय त्यातील माहिती विद्यार्थ्यांना मिळणार नाही. 

अशा परिस्थितीत जर का परीक्षाच घेतली गेली नाही तर विद्यार्थी त्या अभ्यासक्रमापासून वंचित राहतील. याउलट गणित, विज्ञानाच्या विद्यार्थ्याबाबत बघता मागच्या अभ्यासक्रमाचा पुढच्या अभ्यासक्रमाशी संबंध असतो त्यामुळे थेट अंतिम वर्षाची परीक्षा विद्यार्थ्याने कशी द्यायची? परीक्षा नाही म्हणताना स्थिरावलेले विद्यार्थी किंवा अचानक अंतिम अभ्यास करताना मागचा अभ्यासक्रम राहिल्याचा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार नाही काय..?  ढोबळमानाने यंदा विद्यार्थी अभ्यास न करताच पास होणार आणि २०२० हे वर्ष 'कोविड विद्यार्थी' म्हणून आयुष्यभर हे ओझं डोक्यावर घेऊन समाजात वावरणार आहेत हे निश्चित! 



खर तर कुठल्याही सत्राची परीक्षा रद्द न करता ती तात्पुरती स्थगित करून कोरोना परिस्थिती निवळल्यावर परीक्षेचे नियोजन करावे असे मनोमन वाटते. पूर्वी व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच त्यासोबत बी.ए. ,एम. ए. च्या परीक्षेसाठीही विद्यार्थी तयारी करीत असत. बरेचदा दोन परीक्षा एकाच वेळेला येत असत. यानुसार दोन सत्राच्या परीक्षा काही दिवसांच्या फरकाने विद्यार्थ्यांना देण्यास अडचण नसावी किंबहुना देऊ शकतील अशी खात्री आहे. आपल्या एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणेने व्यवस्थित नियोजन केले तर परीक्षेची ही समस्या सोडविण्यास सोपे होईल. या मतांवर हेवेदावे होऊन शेवटी अंतिम वर्षांची परीक्षा घेण्याचे ठरल्यावर विद्यापीठ कुलगुरूंना शिक्षणमंत्र्यानी दिलेल्या अटी काटेकोरपणे पाळण्याच्या मतांवर येऊन नजर थांबली आणि मन अस्वस्थ झाले. कमी गुणांची ऑनलाईन परीक्षा, विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर यायला नकोत, प्रश्नपत्रिका घरी पोहोचायला हव्यात वगैरे, त्यावर कुलगुरूंनी बहुपर्यायी व तासाभरांचीच परीक्षा घेण्याची केलेली शिफारस याचा आलेख नजरेसमोर येतो तेंव्हा वर्णनात्मक प्रश्न, वर्गीकरणात्मक प्रश्न, दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न या साऱ्यांच्या अभ्यासाचे काय..? विद्यार्थ्यांच्या मतस्वातंत्र्य आणि दृष्टिकोनाचे काय असे प्रश्न अनुत्तरित आहेत. याचा सारासार विचार करता कुठलाही होतकरू विद्यार्थी संतापून त्यापेक्षा 'नकोय ही परीक्षा' या मतावर ठाम भूमिका घेईल हे सत्य! 



या काळात मंदिर प्रवेश चालतोय, बस-ट्रेन धावत आहेत. आंदोलने काय होतात...! याने कोरोना फोफावत नाही का..? आणि केंद्रावर योग्य ते अंतर राखून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न सुटण्याऐवजी कोरोना बळावेल..? यावर खरे तर आता सर्व शिक्षक-प्राध्यापकांनी विचार करून निर्णय घेणे आणि विद्यार्थ्यांच्या हितावह आपली भूमिका मांडणे गरजेचे झाले आहे. ऑनलाईन शिक्षणापेक्षाही विद्यार्थ्यांना 'स्टडी फ्रॉम होम' असा सल्ला देवून परीक्षेच्या तयारीसाठी त्यांची मानसिकता बनविणे आणि विद्यापीठांपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचविणे आता महत्वपूर्ण झाले आहे. कुठल्याही संकटावर मात करण्याची माणसाची प्रवृत्ती इथे निष्क्रिय होता कामा नये. सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही बिकट परिस्थितीवर दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणे गरजेचे असते. कुठल्याही चुकीच्या निर्णयाने समाजात चुकीचा पायंडा तर पडत नाही ना..? याची शहानिशा जरूर करावी अन्यथा पुढेही जेंव्हा केंव्हा कोरोना महामारीसारखी भयावह परिस्थिती निर्माण झाल्यास मुलांच्या शिक्षणाबाबत अयोग्य निर्णय घेतले जातील. आजवर मार्गदर्शन करीत आलेल्या गुरूंनी यंदाच्या कठीण समस्येवर विचार विमर्श करून परीक्षेसाठी एक मध्य साधावा. '२०२०-कोविड-विद्यार्थी' या शिक्कामोर्तबाचे खंडन करून या वर्षाला ऐतिहासिक मोहर लावावी.

                                     लेखिका
                            गीता देव्हारे-रायपुरे
                                       चंद्रपूर
         raipuregeeta57@gmail.com

टिप्पण्या

  1. गिता ताई फार चिंतनशील असा लेख लिहिला.बरोबर आहे कोविडच्या कारणाने शिक्षण व्यवस्थेची चाललेला खेळ शिक्षक आणि विद्यार्थी थांबवु शकतात.
    अभ्यासपूर्ण मांडणी करून नवे पर्याय ही तुम्ही लिखाणातून सुचविले
    खूप खूप अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा
  2. कोविड काळातील शिक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती समतोल रित्या मांडलीत.
    हे वर्ष यावर्षी असेच कोविड वर्ष म्हणून जाईल असे वाटतेय.तेंव्हा सरळ जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष व्हावे.
    अर्थवट निर्णय घेऊन आता शाळा सुरू केल्या तर पुन्हा कोविड संक्रमण विद्यार्थ्यत वाढले तर मग त्याला कोण जबाबदार राहील?so धोक्याचाअंदाज घेऊन पाऊले उचलावीत बस्स

    उत्तर द्याहटवा
  3. वाह, वाचताना वेग येतो, परिस्थिती डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी होते. आजच्या स्थितीचे उत्तम चित्रण साकार झाले. परीक्षा झालीच पाहीजे असे मत तयार होते.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप मार्मिकपणे विचार मांडले आहे. शिक्षकांच्या मनातील भाव लेखात उतरविले आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा