Government medical:आता शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे निवड मंडळामार्फत भरणार

आता शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे  निवड मंडळामार्फत भरणार


मुंबई: राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळून ती निवड मंडळांमार्फत भरण्याचा कालावधी वाढविण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा कालावधी ३१ मार्च २०२० पर्यंत होता तो आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे.



राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, गट-अ, सहयोगी प्राध्यापक, गट-अ व सहाय्यक प्राध्यापक, गट-ब ही अध्यापकीय पदे तसेच दंतशल्यचिकित्सक (गट-ब) ही पदे  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळून ती सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र निवडमंडळामार्फत भरली जात असत.  याबाबतचा कालावधी दि.३१ मार्च २०२० पर्यंत होता.



कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ही पदे तातडीने भरावयाची असल्याने ती  निवडमंडळामार्फत भरण्याबाबतचा कालावधी वाढविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.



त्यानुसार शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ) व सहायक प्राध्यापक (गट-ब) ही पदे तसेच दंतशल्यचिकित्सक (गट-ब)  ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा व रिक्त असलेली पदे शासन निर्णय दिनांक १३.८.२०१८ अन्वये गठीत निवड मंडळामार्फत भरण्याचा कालावधी दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यास त्याचप्रमाणे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ) व सहायक प्राध्यापक (गट-ब) ही पदे देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा व रिक्त असलेली पदे स्वतंत्र निवड‍ मंडळ गठित करुन त्यामार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली.

टिप्पण्या