Teachers:शिक्षक महामंडळाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

शिक्षक महामंडळाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन





शुक्रवार २१ ऑॅगस्टला दुपारी ३ ते ५ या कालावधीत हे निदर्शने धरणे आंदोलन आयोजित




अकोला: गणेशोत्सव व मोहरम या सणानिमित्त ऑॅगस्ट पेड इन सप्टेंबरचे वेतन विशेष बाब म्हणून २५ ऑॅगस्टपूर्वी व त्यापुढील प्रत्येक महिन्याचे वेतन एक तारखेस अदा करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे शुक्रवार २१ ऑॅगस्ट रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयांसमोर निदर्शने व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. याबाबत महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना नोटीस पाठविली आहे.   



श्री गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी व मोहरम (ताजिया) ३० ऑगस्ट  रोजी आहे. दिवाळी व इतर सण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आले असताना यापूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळा शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन चालू महिन्याच्या २० ते २५ तारखे दरम्यान अदा केलेले आहे. शासनाचे यापूर्वीचे धोरण लक्षात घेता विशेष बाब म्हणून गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त ऑॅगस्ट २०२० चे मासिक वेतन ऑगस्ट महिन्याच्या २५ तारखेपूर्वी अदा करावे असे डायगव्हाणे यांनी शासनास पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.   


एक तारखेस वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता ७ नोव्हेंबर २०१२ च्या शासन निर्णयान्वये धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. १३ ऑॅगस्ट २०१५ च्या परिपत्रकानुसार एक तारखेस वेतन अदा करावे याबाबतची जबाबदारी संनियंत्रण अधिकारी म्हणून राज्य स्तरावर शिक्षण आयुक्त व विभागीय स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 


एक तारखेस वेतन अदा न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली, असे परिपत्रकात नमूद आहे. परंतु सद्यस्थितीत ३० ते ४० टक्के शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेस अदा होत नाही. या दोन्ही विषयाबाबत शालेय शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्याकरिता महामंडळाकडून शुक्रवार २१ ऑॅगस्टला दुपारी ३ ते ५ या कालावधीत हे निदर्शने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे या नोटीसमध्ये नमूद आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन विमाशिसंघचे अमरावती विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर यांनी केले आहे.

टिप्पण्या