Nurse In Maharashtra:महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांचे १ सप्टेंबर पासून आंदोलन

महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांचे १ सप्टेंबर पासून आंदोलन

                              f i l e p h o t o


अकोला: मागील सहा महिन्यापासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, या काळातही परिचारिका, आपल्या जिवाची पर्वा न करता, वैयक्तिक, कौटुंबिक काळजी बाजूला ठेवून कोरोनाशी लढत आहेत, या काळात परिचारिकांना फ्रंटलाईन योद्धे असे संबोधून जगभर त्यांचे कौतुक केले जात आहे, परंतु राज्यात त्यांच्या वाट्याला फक्त शाब्दिक कौतुक व अवहेलना येत आहे. राज्यातील परिचारिकांनी आपल्या अतिसंवेदनशील न्यायिक व रास्त मागण्यासाठी कधीही शासनास वेठीस धरले नाही तरीदेखील शासन परिचारिकांच्या सहनशीलतेचा गांभीर्याने विचार करत नाही ही बाब दुर्दैवी आहे. परंतु आता त्यांच्या सहनशीलतेची सीमा संपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील परिचर्या व्यवसायाच्या उन्नतीसाठी लढा देणारी एकमेव शासनमान्य महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना  परिचारिकांच्या अतिसंवेदनशील व न्यायिक मागण्यांसाठी  १ सप्टेंबर पासून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.


या आहेत मागण्या
१.राज्यात गेल्या अनेक वर्षात परिचारिकांची मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरची पदे रिक्त आहेत. सध्या कोरोना महामारी मध्ये शासनाने टेंडर भरती काढून तात्पुरती सोय करण्याचा प्रयत्न केला परंतु तुटपुंजा पगार व जीवाची भीती यामुळे अनेक जण राजीनामे देऊन निघून गेले. त्यामुळे नियमित पदभरती करणे गरजेचे आहे. परीसेविकांची ही पदे रिक्त असल्यामुळे त्यांचा कारभार वरिष्ठ अधिपरीचारिका यांना दिला जातो त्यामुळे प्रत्यक्ष रुग्ण सेवा देणारे मनुष्यबळ अत्यंत अपुरे पडते त्यातच कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे सर्व स्तरावरचे पदोन्नती व पदभरती अत्यावश्यक बाब आहे. १००% परिचारिकांच्या पदभरतीसाठी शासनाने परवानगीही दिली आहे, परंतु प्रत्यक्षात पदभरती झालेली नाही. म्हणून सर्व स्तरावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात यावीत, यामुळे आर्थिक अपव्यय टाळता येईल व चांगल्या दर्जाच्या रुग्नसेवा देण्यास मदत होईल.



२ कोव्हीड कक्षात रोटेशन करताना अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याने व रुग्ण संख्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असल्यामुळे परिचारिकावर प्रचंड मानसिक ताण येतो, त्यातच सात दिवस रोटेशन व तीन दिवस कोरोंटाईन, त्या आठवड्याची साप्ताहिक सुट्टी ही देण्यात येणार नाही, हे परिचारिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिक दृष्ट्या घातक आहे, ICMR च्या मार्गदर्शक तत्वानुसार कोव्हीड-१९ विषाणू चा अधिशयन काळ हा १४ दिवसांचा आहे, या निर्णयामुळे  इतर नॉन कोव्हीड रुग्णांनाही संसर्ग होऊ शकतो, तसेच परिचारिका आजारी पडण्याचे प्रमाण वाढेल व आधीच अपुरे असलेले मनुष्यबळ आणखी कमी होईल. तसेच सदर rotation ईतर रुग्णांच्या दृष्टीनेही घातक आहे कारण COVID कक्षात कर्तव्य बजावून आलेली परिचारिका Healthy Carrier असू शकते व ती ईतर रुग्णांनाही COVID चा संसर्ग पसरवू शकते. आशा प्रकारे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढु शकते. म्हणून ७ दिवस रोटेशन व ७ दिवस कोरोंटाईन हा क्रम कायम ठेवावा.
तसेच त्यांना प्रोटीनयुक्त आहार व चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.



३ कोरोना (कोव्हीड-१९) महामारीमध्ये परिचारीका जिवाची बाजी लावून लढत आहेत, अनेक जण बाधित झालेल्या आहेत,तर काहींनी आपले अमुल्य जिव गमावले आहेत, मृत झालेले आहेत, आरोग्य क्षेञात नेहमीच असे संसर्गजन्य आजार उद्भवतात ज्यामुळे परिचारिकांना आपले प्राण गमवावे लागतात, म्हणून राज्य शासनाने, त्यांचे फक्त शाब्दिक कौतुक न करता, केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता नव्याने मंजूर करून देण्यात यावा.



४. ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अधिपरिचारिका श्रीमती अरिफा शेख यांचे वैयक्तिक आकसापोटी नियमबाह्य निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना प्रचंड  वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व त्यांची मान हानी झाली. परंतु न्यायालयाने त्यांचे निलंबन नियमबाह्य ठरवुन त्यांना पुन्हा कर्तव्यावर हजर करुन घेण्याचे आदेश दिले.अधिकाराचा गैरवापर करून परिचारिकांना त्रास देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर विनाविलंब कडक कार्यवाही करण्यात यावी.



५. राज्यातील परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावी, 
ग्रामीण रुग्णालय स्तरावर मासिक अहवाल तयार करणे, डाटा एन्ट्री ईत्यादि कारकुनाची कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी.


असे होईल आंदोलन
*१ सप्टेंबर पासून रुग्णसेवा विस्कळीत न करता काळी फीत आंदोलन व निदर्शने. 

*मागण्या मान्य झाल्या नाही तर, ८ सप्टेंबर रोजी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येईल.

*त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास  बेमुदत संप.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा