Kawad yatra2020:इतिहासात पहिल्यांदा पोलीस बंदोबस्तात मानाची पालखी निघाली;श्रीराजेश्वराला जलाभिषेक

इतिहासात पहिल्यांदा पोलीस बंदोबस्तात मानाची पालखी निघाली;श्रीराजेश्वराला जलाभिषेक


अकोला: श्रावण महिन्यात अकोल्यात श्रीराजराजेश्वरला पूर्णा नदीचे जल आणून अभिषेक करण्याची परंपरा आहे.यंदा कोरोना विषाणूच्या सावटाखाली अत्यंत सध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला यंदा ७६ वर्ष झाले.मात्र कावड पालखी उत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदा यावर्षी पोलीस बंदोबस्तात मानाच्या पालखीचे आगमन मंदिरात झाले.मानाची राजराजेश्वरची पालखीचे मार्गक्रमण पोलीस बंदोबस्तातच झाले.दरवर्षी सर्वधर्मीय या उत्सवात हिरीहीरीने सहभागी होत असतात.शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करतात.

सोमवारी सकाळी मानाचा पालखीचे शहरात आगमन झाले.सिटी कोतवाली चौक येथून शिवभक्तांनी पालखी खांद्यावर घेवून राजेश्वर मंदिरात नेली.दर्शनासाठी नागरिकांनी पालखी मार्ग व मंदिरात गर्दी केली होती.

शिवभक्तांची नाराजी

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर ला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा आहे.अकोल्यात पूर्वी खूप दुष्काळ पडायचा,या संकटातून निवारण्यासाठी अकोलेकर शिवभक्तांनी राजेश्वरकडे साकडे घातले. पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्यात आला.त्या वर्षा पासून अकोल्यात कधीच दुष्काळ पडला नाही,अशी मान्यता आहे. वाघोलीला आदल्या दिवशी पायी जाऊन शिवभक जल आणतात. सुरवातीला फक्त एकच कावड निघायची.नंतर पाच कावड पालख्या निघायच्या,दरवर्षी पालख्याची संख्या वाढतच गेली.तशी कावड जल भरण्याची संख्या वाढत गेली.चढाओढीने कोणी 101 भरण्याची कावड तर कोणी 501 भरण्याची कावड आणून राजेश्वराला अभिषेक करत होते. या उत्सवाला केवळ धार्मिक नव्हेतर सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय किनार लाभत गेली.उत्सवाचे रूपांतर महोत्सवात झाले. मात्र,यावर्षी कावड पालखी सोहळा साजरा झाला नसल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला.

मानाची पालखी सिटी कोतवाली चौक:व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा


शिव भक्तांचे आभार

  जिल्ह्यातील परपंरागत असलेल्या राजराजेश्वराची पालखी व कावड यात्रा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी काढण्यात येते. हजारोच्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पुर्णा नदीतून  कावडव्दारे जल आणून राजराजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. 

 परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तसेच जिल्हा प्रशासनाने  केलेल्या आवाहनानुसार शिवभक्तांनी कावड यात्रेस मानाची एक पालखी काढून, मर्यादित संख्या व सामाजिक अंतर राखून प्रतिसाद दिला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शिवभक्तांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानले आहे. यापुढेही जिल्ह्यातील नागरिकांनी अशाच प्रकारचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


भाजपाने केले स्वागत



अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वर यांच्या पालखीचे पूजन  गेल्या ३६ वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या परंपरेला आजही कायम ठेऊन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजयभाऊ धोत्रे, जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांच्या नेतृत्वात ठिकठीकाणी पालखी नमन, पूजन करण्यात आले. 

भाजपा तर्फे अकोट फैल, गांधी चौक, जयहिंद चौक येथे नमन, पूजन करून भक्तांचे स्वागत करण्यात आले.अकोला शहराचे लोकप्रिय आ. गोवर्धन शर्मा यांनी आपल्या ३६ वर्षाच्या परंपरेनुसार जयहिंद चौक येथे राज राजेश्वर  पालखीला नमन करून कोविड-१९  या महामारीपासून मुक्त करावे तसेच शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कामगार, युवा शक्ती, मातृशक्ती यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होऊन सुख समृद्धी नांदावी तसेच यंदा पावसाने कृपा करून अकोला जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरले आहे परंतु अकोट तेल्हारा,संग्रामपूर, शेगाव, या परिसरात पिण्याचे पाणी पुरवठा करणारा व शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या वान धरणात अजूनही जलाशय कमी असून तो जलाशय पूर्णपणे भरावा अशी प्रार्थना या वेळी आ गोवर्धन शर्मा यांनी केली.  यंदा कोविड्च्या  पार्श्वभूमीवर मानाची राज राजेश्वर पालखी व कावड गांधीग्राम येथून सकाळी ७ वाजता जयहिंद चौकात पोहोचल्यावर जयश्रीराम, हरहर महादेव या नादात पूजन करण्यात आले या वेळी भाजपा नगर सचिव मनोज वानखडे, संजय जिरापुरे, सतीश ढगे, हेमंत शर्मा, रामेश्वर वानखडे,प्रीती वानखडे, राजेश रेड्डी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



 जय बाभळेश्वर कावड उत्सव 2020 


संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या साथीमुळे कावड उत्सव मध्ये होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये या अनुषंगाने जय बाभळेश्वर शिवभक्त संस्थानच्यावतीने यंदा १०१ भरण्याची कावड न आणता केवळ दोन भरण्यातून पूर्णा नदीच्या पवित्र जलाने श्री राजराजेश्वर व बाभळेश्वराला जलाभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जय बाभळेश्वर शिवभक्तांन कडून केवळ एका भरण्यातून पूर्णा नदीच्या पवित्र जलाने श्री बाभळेश्वराला जलाभिषेक करण्यात आला.

परंपरा खंडित न होऊ देता महादेवाच्या चरणी जल अर्पण करून धार्मिक भावना जोपासणाऱ्या शिवभक्तांचे आभार मंडळाने मानले.


कावड पालखी काढणा-या शिवभक्तांवर दाखल केलेले गुन्हे निषेधार्ह असून अटक केल्यास आम्ही जामीन घेणार - वंचित बहुजन आघाडी.


अकोला शहरातील कावड आणि पालख्यांना ७५ वर्षाची परंपरा असून काल जुने शहर येथील शिवचरण पेठ येथील सहा शिवभक्तांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.सण उत्सव साजरे न करू देण्याच्या आणि गुन्हे दाखल करण्याचा वंचित बहुजन आघाडीने निषेध व्यक्त केला असून शिवभक्तांना अटक केल्यास त्यांचा जमीन वंचितचे पदाधिकारी घेणार असल्याचे अकोल्यातील वंचितच्या प्रदेश पदाधिका-यांनी जाहीर केले आहे.


काल जुने शहर येथील शिवचरण पेठ येथील सहा ते सात शिवभक्तांनी अगदी मर्यादित भक्त संख्या ठेवून पालकी काढली असता  जुने शहर पोलिसांनी त्यांना मज्जाव केला तसेच गुन्हे देखील दाखल केले आहेत.हा प्रकार निंदाजनक आहे.जनता सामान्य जीवन जगू इच्छित असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनाठायी निर्णयामुळे जनता कुलुपबंद करण्यात आली आहे.गेली ७५ वर्षाची परंपरा मोडीत काढणारे जिल्हा प्रशासन आणि जनप्रतिनिधींना अकोल्यातील जनता माफ करणार नसल्याची प्रतिक्रिया जिल्हाभर उमटत असल्याचे ह्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हामागे कुणाचे राजकीय हात आणि मेंदु आहे, ह्याचे उत्तर जनता मागत आहे.पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून शिवभक्तांना अटक केली जाणार असेल तर वंचित बहुजन आघाडी त्या सर्व शिवभक्तांचे जामीन घेणार असल्याची माहिती वंचित चे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुंधतीताई सिरसाट ह्यांनी दिली आहे.


कोरोनाच्या नावावर केंद्र आणि राज्य सरकार लोकांच्या जीवन जगण्यावर बंधने आणत आहे.ह्याचा विरोधात सर्व प्रथम  एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी आवाज बुलंद केला आहे.अकोल्यातील शेवटच्या श्रावण सोमवारी काढली जाणारी कावड आणि पालख्या ह्यांना ७५ वर्षाची परंपरा असल्याने हा उत्सव साजरा व्हावा असा प्रयत्न वंचितने सुरु केला होता.त्यासाठी पालकमंत्री नामदार बच्चू कडू ह्यांची भर पावसात शिव मंडळ पदाधिका-या समवेत पीकेव्हीही मध्ये भेट घेतली.भेटी मध्ये १५ ऑगस्ट रोजी पालख्या व कावड बाबत दुपारी १२ वाजता सर्कीट हाऊस येथे बैठक घेण्याची वेळ पालकमंत्र्यांनी दिली होती.परंतु १५ ऑगस्ट रोजी शासकीय कार्यक्रम आटपून पालकमंत्री थेट अमरावतीला रवाना झाले होते.प्रशासनाकडून हा उत्सव आणि सण साजरे होऊ नये, जनतेने सामान्य जीवन जगू नये असेच प्रयत्न सुरु होते.त्यामुळे काल संचारबंदी असताना देखील पोलिसांनी मार्च काढला.गांधीग्राम येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून शिवभक्तांना मज्जाव करण्यात आला.




टिप्पण्या