Gouri pujan-Mahalakshmi:गवराई माझ्या लाडाची लाडाची गं… आज जेष्ठा कनिष्ठा गौरींचे घरोघरी आगमन... पुजन मूहुर्त कोणते आहे वाचा

गवराई माझ्या लाडाची लाडाची गं… आज जेष्ठा कनिष्ठा गौरींचे घरोघरी आगमन


भारतीय अलंकार

भाद्रपद चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमनानंतर महाराष्ट्रात  भाद्रपद शुद्ध सप्तमीला जेष्ठा कनिष्ठा गौरीच्या स्वागताची तयारी केली जाते. भारतीय संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या मातेचे रूप मानले जाते. गौरी पूजन,जेष्ठा गौरी, महालक्ष्मी पूजन असे विविध नावाने प्रामुख्याने महाराष्ट्र हा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या तीन दिवस गवराई माहेरवासीन असते.तिचे कोडकौतुक करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असते.



महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी आवाहन आणि मांडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचारा नुसार गौरी पूजन करण्यात येते.  यंदा सन २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या सावटाखाली देखील भाविक सण उत्साहाने साजरा करताना दिसत आहे.




अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद  शुद्ध पक्षात गौरींचे आवाहन करून हे व्रत करतात. पुराणातील एका कथे नुसार, असुरांच्या जाचाला कंटाळून स्त्रिया त्यांचे सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण जातात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. जेष्ठा कनिष्ठा गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते. भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. 



जेष्ठा गौरी आवाहन व पुजन मूहुर्त

२५/८/२०२०, मंगळवार,तिथी शु.

वेळ मुहूर्त: दूपारी १:५६ मि.नंतर,अनुराधा नक्षत्रावर श्री महालक्ष्मीचे आवाहन करावे.


दि.२६/८/२०,बुधवार,शु.८

महालक्ष्मी पुजन,महानैवेद्य,आपापल्या परंपरेनूसार(कुलाचारानूसार)करावा.


दि. २७/८/२०२०,गुरूवार,

शु.९,दुपारी १२:३४ नंतर,मुळ नक्षत्रावर कुळाचारानूसार महालक्ष्मीचे विसर्जन करावे.


यानूसार जेष्ठा व कनिष्ठा गौरीचे आवाहन, पुजन केल्यास घरोघरी धन, धान्य, समृध्दी,भरभराट व लक्ष्मी स्थिरता व आरोग्यप्राप्ती होते.

                -श्री.अमोल चिंचाळे गुरूजी,

            (अध्यक्ष-पुरोहित संघ,अकोला)




परंपरेप्रमाणे निवास प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापना जागेपर्यंत रांगोळीने किंवा ओल्या कुंकवाने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. हातात गौरी घेऊन आलेल्या स्त्रीचे  दुधाने व पाण्याने पाय धुवावे.  त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे स्थापना जागेपर्यंत आणावे.  वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. पूजन करावे.आशीर्वाद घेवून घरात सदैव ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करावी. 


महाराष्ट्रातील विविध प्रांतानुसार गौरी पूजनामध्ये विविधता आढळते. पद्धत वेगवेगळी असली तरी भाव मात्र एकच असतो. काही भागात गौरीचे नुसते मुखवटे असतात, तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकारा खडे   घरी आणून त्यांची गवराई म्हणून पूजा केली जाते. याला खड्यांच्या गौरी म्हणतात. काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून किंवा विविध धातूंच्या पायल्या करून (आपापल्या ऐपतीप्रमाणे किंवा पारंपरिक व कुळाचार नुसार) त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी-चोळी नेसवून  गौरीचा पुतळा उभारून त्याची पूजा करतात.आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात.काही घरी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील गहू, तांदूळ यांच्या राशी मांडून तयावर देवींचे मुखवटे ठेवून पूजा करतात. काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. यात तेरड्याची रोप मुळासकट आणून गौरी म्हणून त्याची पूजा केली जाते .


अलीकडच्या काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी किंवा महालक्ष्मी येतात. तर काही घरी भारतीय थोर स्त्रियांच्या प्रतिकृती तयार करून देवी रुपात पूजा करण्यात येते. अलीकडे ही प्रथा रूढ होत आहे. तर कुठे गौरी वा महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. काही ठिकाणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते. काही ठिकाणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. तर काही जण आपापल्या कुळाचार किंवा भाद्रपद मध्ये काही कारणास्तव गौरी महालक्ष्मी मांडता आली नाहीतर, कोजागिरी, अष्टमी, भाऊबीज या दिवशी बसवून पूजा करतात.



आरती  जेष्ठागौरी  महालक्ष्मीची 

भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा

अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा

गणेशा सहित गौरी धनिष्ठा

बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||


जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,

कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।


ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा

षडरस पक्वान्ने होती सुखधामा

सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा

तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।


जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,

कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।


उत्थापन मूळावर होता अगजाई

वर देती झाली देवी विप्राचे गृही

रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी

वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।


जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,

कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।



जेष्ठा कनिष्ठा देवीची कथा

आटपाट नगरात एक गरीब मनुष्य राहत होता.त्यांच्या मुलांनी जेष्ठा कनिष्ठा देवी व्रत उत्सव पाहिला. मुलं घरी धावत येऊन  आईला म्हणाली आपल्या घरी गौरी आण. आई म्हणाली बाळांनो, गौर आणून काय करू, आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही हा हट्ट बाबांपाशी करा. त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा. त्यांनी सामान आणलं तर मी गौर आणीन."मुलं बाबांपाशी आली. गलका करून म्हणाली, " बाबा तुम्ही बाजारात जा. घावन-घाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई आपल्या घरी गौर आणील." मुलांचा हट्ट ऐकून बापाला वाईट वाटले. साधी हौसही गरिबीमुळे पुरवता येत नाही, हे त्याच्या मनाला लागले. सोन्यासारखी मुले आहेत, पण गरिबीपुढे हातटेकीस आले. मागायला जावं तर कोणी काही सणावारात देणार नाही. त्यापेक्षा मेलेलं बरं, असा अभद्र विचार करून तो उठला. देवाचा धावा करत तळ्याच्या काठाशी आला. तोपर्यंत संध्याकाळ होत आली. दिवेलागणीची वेळ होती. जवळच एक वृद्धा सवाशीण येऊन उभी राहिली. तिने त्याची चाहूल घेतली असावी. त्याने आपली कथा तिला सांगितली. म्हातारीला वाईट वाटले. तिने चार समजुतीच्या गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्याचं समाधान केलं. त्या मनुष्याने म्हातारीला घरी आणलं. बायकोनं सांजवात केली आणि “पाहुणीबाई कोण आणल्या?” असं नवऱ्याला विचारलं. नवऱ्यानं आजी आहेत, असं सांगितलं. बायको स्वयंपाक घरात आली. आंबिलीसाठी कण्या पाहू लागली. मडकं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला फार नवल वाटलं. तिनं ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. त्यालाही आनंद वाटला. तिनं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदानं निजली. सकाळ झाली. म्हातारीनं त्या माणसाला हाक दिली व म्हणाली, "मुला, मला न्हाऊ घालायला सांग. घावन घाटलं कर. नाही असं काही म्हणू नको. रडू  नको."  मनुष्य उठला व बायकोजवळ आला. “अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल.” असं म्हणून तो भिक्षेकरिता गावात गेला. त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. 

संध्याकाळ झाली, त्या पुरुषाने म्हातारीच्या सांगण्यावरून  गाई-म्हशींना हाका मारल्या, सर्व गोठा भरला. मनुष्याने गायींचे दूध काढलं. दुस-या दिवशी खीर केली. संध्याकाळी म्हातारी म्हणाली, "मुला, माझी आता पाठवणं कर." मनुष्य म्हणाला, "आजी, तुमच्यामुळे मला सगळ काही लाभले,आता तुम्हाला परत कसे पाठवू? तुम्ही गेलात तर हे सगळं नाहीसं होईल." म्हातारी हसली व बोलली, "त्याची तुला चिंता नको, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्टागौर म्हणतात ती मीच आहे बाळा, आज मला पोहचती कर. “तुम्ही दिलेलं हे असंच उत्तरोत्तर वाढावं असा काही उपाय सांगा.” मनुष्य हात जोडून म्हणाला. ज्येष्ठागौरी म्हणाली, "तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटी-फडताळात टाक, गोठ्यात टाक, असं केलं का काही कमी पडणार नाही. मनुष्याने गौरीची पूजा केली.गौर प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले.

"भादव्यात तळ्याच्या काठी जावे. दोन खडे घरी आणावेत. ऊन पाण्याने ते धुवावेत. त्यांना ज्येष्ठा गौर व कनिष्टा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. दुसऱ्या दिवशी पंचामृत, आंबील, कथली,सोळा भाजी, पंच पक्वान्य भोजन आपल्या ऐपत प्रमाणे, तिसरे दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. तिला जेवू घालावे. संध्याकाळी हळदकुंकू वाहून बोळवण करावी. यामुळे अक्षय संपत्ती व सुख मिळेल.”


(संदर्भ: आरती आणि कथा पारंपरिक ऐकण्यात आलेली व धार्मिक पोथीत दिलेले संदर्भ घेवून येथे दिली आहे.)


Subscribe, Share, Comment

टिप्पण्या