Ganesh feshtival2020: Covid-19Lockdown मधले गणपती बाप्पा...

Covid-19Lockdown मधले गणपती  बाप्पा...

                                 
*लॉकडाउनचा गणपती बाप्पालाही फटका


भारतीय अलंकार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागलेल्या लॉकडाउनमुळे मार्च महिन्या पासून  सर्व धर्मीय सण घरातच साजरे करावे लागले. त्यातून कुणीही सुटलेले नाही. आता गौरी गणपतीचे आगमन होत आहे. दरवर्षी मोठया उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सवलाही lockdown चा फटका बसला आहे. 


गणपती बाप्पाचे आगमन दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होत असते.यंदा ऑगस्टमध्ये गणरायाचे आगमन होत आहे. अगदी काही तासच आता बाकी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या लाडक्या गणेशाचे आगमन पावसाळ्यात होत असले तरी आगमनाची तयारी उन्हाळ्यापासून सुरू होत असते.



महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. मात्र, गणेशोत्सवाच्या पाच सहा महिने अगोदर सुरू होणाऱ्या कामाचा यावर्षी lock down मुळे एप्रिल  उलटूनही कच्च्या मालाअभावी "श्रीगणेशा' झालेला नव्हता. यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाली.वादळ,वारा, पाऊस यामुळे मूर्तिकारांच्या रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे. 


कोरोनाने चिंतेचे वातावरण पसरवले. गणेशोत्सव तोंडावर येवून ठेपला तरीही   मूर्ती विक्रीचा श्रीगणेशा न झाल्याने बऱ्याच मूर्तिकारांचीही चिंता वाढली. मूर्तींसाठी आवश्‍यक असणारी माती वाहतूक बंद केली असल्याने मुर्तीकाराने वेळेवर कच्चा माल उपलब्ध होवू शकला नव्हता. लॉकडाउनमुळे अद्यापही अनेक मूर्तिकार आणू शकले नसल्याने त्यांना व्यवसाय करता आला नाही.गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला एप्रिलपासनू प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा परिणाम गणेशमूर्तीच्या निर्मितीवरही झाला आहे.  त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या मातीतूनच मूर्तीची निर्मिती त्यांनी केली. मात्र, कच्च्या मालाअभावी मूर्तीच्या संख्येत कोरोनामुळे घट झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. दरवर्षी शहरात गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने मूर्ती विक्री होत असते.मात्र,यंदा अनेकांनी घरीच मातीच्या मुर्त्या घडविल्याने त्याचा परिणाम मूर्ती विक्री वर झाला. शिवाय यावेळी lock down मुळे  घरबसल्या अनेकांनी ऑनलाईन classes द्वारे मूर्ती बनविणे शिकले तर काहींनी आपल्या अंतर्भूत कलेला वाव देवून गणेश मूर्ती साकारल्या.



शहरात अनेक कारागीर गणेशमूर्तीसह  देखाव्यांच्या मूर्तीही घडवितात. त्यांचे नियोजन एप्रिल-मे महिन्यापासूनच सुरू होते. काही कारागीर कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे निघून गेल्याने  मुर्तीकाराना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातच रंग, ब्रश यांसारख्या व्यवसायाशी निगडित अनेक वस्तूंची बाजारपेठही पूर्णपणे सुरू झालेली नाही.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने काही निर्बंध लावलेले आहेत,त्यामुळे गणेशमूर्ती तयार असूनही मूर्तिकारांना मोठ्या ऑर्डर आद्यपही मिळाल्या नाहीत. एकंदरीतच गणेशाच्या स्वागताची तयारी संथ असल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या संकटाशीच सामना करत असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.



मूर्ती बनविण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळ खाऊ असल्याने मूर्तिकार दिवाळीनंतर घरगुती मूर्ती बनविणे सुरू करीत असतात. एप्रिलमध्ये या मूर्तींना रंगरंगोटीचे काम सुरू केल्या जाते. मात्र, यावेळी लॉकडाउनमुळे या सर्व प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.



पावसाळ्याच्या आधी, एप्रिल महिन्यामध्ये सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींसाठी कच्चा माल गोळा केला जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व साहित्य गोळा करण्याचे नियोजन मूर्तिकारांचे असते. मात्र, लॉकडाउनमुळे हे साहित्य मूर्तिकारांनी गोळा करण्यास तारेवरची कसरत करावी लागली. लॉकडाउन पावसाळ्या पूर्वी न उघडल्याने घरगुती बाप्पाच्या मूर्ती मंडपामध्ये पाहायला मिळणार आहे. शिवाय ४ फूट पेक्षा अधिक उंच मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळणार नाही.




 मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले आहेत.


कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.



सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी

या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश  मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा. कोरोना आणि एकंदरीतच आरोग्य विषयक जनजागृती मोहिम होती घेण्याचे आवाहन करतानाच दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.



समाज माध्यमांवरील चुकीच्या व्हीडिओंवर पोलिसांचे लक्ष

समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या व्हिडिओंवर पोलीसांनी लक्ष ठेवण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची स्थानिक यंत्रणेने अधिकाधिक निर्मिती करावी जेणेकरून विसर्जनाला गर्दी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


Toll माफ

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी  सांगितले.


टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक आहे.


मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन 


दिल्ली स्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्ली स्थित ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन व विक्रीला सुरवात केली होती. महामंडळातर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या गणपती प्रदर्शन आणि विक्री हा उपक्रम राबविण्यात येतो.


महाराष्ट्रातील मुर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमुर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या २८ वर्षांपासून गणेशमुर्ती विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ३९ गणेश मंडळांत गणेशोत्सव साजरा होतो. त्यासोबतच अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. अनेक मान्यवरांनी गणेशमूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. गणेशमूर्तींची विक्री २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २२ वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील  ‘मऱ्हाठी’एम्पोरियमध्ये येतात. यावर्षी कोरोना प्रादूर्भाव असुनही मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक असणाऱ्या यंदा एकूण १०० शाडूच्या मुर्ती आहेत. ६ इंच ते २ फुटापर्यंतच्या गणरायाच्या मुर्ती येथे उपलब्ध आहेत. ७०० रूपयांपासून ते २५ हजार रूपयांपर्यंत गणेशमुर्तींची किंमत आहे.

महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात दिनांक २२ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. 


पुण्यातही यंदा साधेपणाने गणेशोत्सव

पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले आहेत. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही या निर्णयाचं अनुकरण करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


पुणे शहरानं नेहमीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व केलं असून समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा या मानाच्या गणपती मंडळांनी, तसंच भाऊ रंगारी मंडळ, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व अन्य गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी झालेली बैठक देखील ‘ऑनलाईन’ झाली. सार्वजनिक उत्सव साधेपणानं साजरा करत असताना महापालिका व पोलिस यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद आहे. पुण्यातील सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींनी दाखवलेलं हे समाजभान कौतुकास्पद आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचा हा निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. राज्यातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


Subscribe, Share & comment





टिप्पण्या