Crime news:रस्त्यावर दुचाकी अडवून राशन माफिया कडून पत्रकाराला मारहाण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रस्त्यावर दुचाकी अडवून राशन माफिया कडून पत्रकाराला मारहाण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


विविध पत्रकार संघटना व मातृशक्ती संघटने कडून निषेध


आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

 
शेगाव: अकोल्यावरून लोहारा मार्गे शेगावला येत असताना दैनिक बातमीदारचे विदर्भ विशेष प्रतिनिधी सतीश अग्रवाल यांच्या दुचाकीला रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोहारा येथील रेशन माफिया व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करुन त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना लोहारा फाट्यावर घडली याबाबत अग्रवाल यांच्या तक्रारीवरून उरळ जि.अकोला पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की दैनिक बातमीदार चे पत्रकार सतीश अग्रवाल हे गोरगरिबांच्या हक्काचा असलेला रेशनचा तांदूळ काळा बाजारात विकणाऱ्या रेशन माफिया विरुद्ध बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाकडून बुलढाणा व अकोला जिल्ह्यात शेकडो क्विंटल काळ्याबाजारात जाणारा राशनचा तांदूळ जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. यामुळे राशन माफिया कडून पत्रकार सतीश अग्रवाल यांना सतत धमक्या सुद्धा मिळत होत्या. पाच ऑगस्ट बुधवार रोजी सतीश अग्रवाल हे आपल्या खाजगी कामानिमित्त एका व्यक्तीसह दुचाकीवर अकोला येथे गेले होते. 

अकोला येथून शेगाव कडे परतत असताना गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्याचे त्यांना जाणवले त्यामुळे त्यांनी लोहारा फाटा  येथे पेट्रोल मिळेल का, असे विचारण्यासाठी गाडी थांबविली. त्या ठिकाणाहून शेगावकडे जात असताना राशन माफिया असलेले लोहारा येथील सुशील सिंघल ठाकूर निलेश उर्फ बबलू सिंघल ठाकूर व यात 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकार सतीश अग्रवाल यांची दुचाकी रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी पत्रकार अग्रवाल यांना जबरदस्तीने जंगलात नेवून तेथे सुद्धा बेदम मारहाण केली व गंभीर रित्या जखमी केले. तू आमच्याविरुद्ध यानंतर बातम्या प्रकाशित केल्यास तर जीवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. यावेळी अग्रवाल यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये व 17 हजार रुपये नगदी सुशील सिंगल ठाकूर यांनी काढून घेतले व पोलीसात तक्रार केली तर विचार कर,असे धमकावले. याबाबत उरळ पोलिसांनी सतीश अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सुशील सिंगल व निलेश सिंगल या दोघा आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 327, 323, 294, 506, 34 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

भ्रष्टाचाराविरुद्ध निर्भीडपणे आपली लेखणी चालविणाऱ्या पत्रकार सतीश अग्रवाल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,शेगाव तालुका पत्रकार संघ, प्रेस क्लब शेगाव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांसह मातृशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वरील सर्व संघटनांतर्फे तहसीलदारांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.

टिप्पण्या