Corona Warriors:शेगाव येथे जेष्ठा गौरींच्या आरास सजावटीतुन कोरोना योद्धांचा गौरव; डॉक्टर आणि पोलीसच्या रुपात साकारल्या गौरी

            देव एक रूप अनेक


शेगाव येथे जेष्ठा गौरींच्या आरास सजावटीतुन कोरोना योद्धांचा गौरव; डॉक्टर आणि पोलीसच्या रुपात साकारल्या गौरी


The glory of the Corona Warriors from the ornamental decoration of Jestha Gauri at Shegaon;  Gauri as a doctor and a policewomen


रांगोळीच्या माध्यमातूनही योद्धांना सलाम  



भारतीय अलंकार

शेगाव : श्रीगणराया पाठोपाठ घरोघरी मंगळवारी जेष्ठा, कनिष्ठा गौरींचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनपावलांनी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घरोघरी कामांची लगबग सुरु होती. कोरोनामुळे पुरुष मंडळी घरीच असल्याने महिलावर्गाला त्यांची चांगलीच मदत झाली. प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्कृष्ठ सजावट करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात गौरीच्या आरास सजावटीतुन कोरोना बाबत घ्यावयाची काळजी व कोरोना योद्धांचा गौरव करण्यात आला. धार्मिकता जपत असताना सामाजिक भान देखील लक्षात घेवून ते प्रत्यक्ष साकारल्याबद्दल त्याचीच चर्चा सध्या शेगाव नगरीत होत आहे.


श्रीसंत गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे श्रीक्षेत्र शेगाव जगप्रसिद्ध  आहे. याच पुण्य नगरीत राहणारे झापर्डे कुटुंबातील सदस्यांनी यावर्षी अनोखी सजावट करून धार्मिकतेच्या सोबतच सामाजिक दायित्व जपले आहे. प्रियांका झापर्डे यांच्या गौरी आणि बाप्पाचा देखावा कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आला आहे. झापर्डे यांनी गणपतीसाठी इको फ्रेंडली देखावा तयार केला असून, त्यांनी यंदा बाप्पा आणि गौरीचा देखावा साकारत कोरोनाच्या लॉकडाऊन् काळात आपत्कालीन सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांचे आभार मानले आहे. 



यंदाच्या वर्षी मार्च पासून लॉकडाऊन जाहीर झाला आणि मग सगळेच बदलले. या काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या आपत्कालीन परिस्थितीत सेवा दिली त्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यासाठी यंदा बाप्पा आणि गौरीच्या सजावटीच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती शेगावच्या प्रियांका झापर्डे यांनी दाखवली आहे. शिवाय कोरोना बाबत घ्यावयाची काळजी या देखाव्यातून विषद करण्यात आली आहे.



दुसरीकडे गौरींच्या सजावटीतुन कोरोना योध्यांचा गौरव करीत पोलीस आणि डॉक्टरचा रांगोळीच्या माध्यमातून कोमल पाटील या रांगोळी चित्रकाराने चित्र रेखाटले आहे. रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील महिला आणि बच्चे कंपनी गर्दी करीत आहे.


आज जेष्ठा गौरी उत्सवाचा दुसरा दिवस त्यामुळे माहेरी आलेल्या गौरीं आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरु होती. घराघरात खमंग वास दरवळत होता. घरांसमोर विविधरंगी रांगोळ्या व गौरींचे सोनपावलं लक्ष वेधुन घेतले. गौरी गणपतीच्या आगमनाने गेले पाच महिन्यांपासुन घरातच असलेल्या बच्चे कंपनीमध्ये उत्साह संचारलेला दिसत होता. उद्या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मुळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होणार आहे. 


            

टिप्पण्या