- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबईत लवकरच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक उभारणार
मुंबई, दि. 1 : अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णाभाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर भाषा सातासमुद्रापार पोहोचविली. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे. परखड मत मांडणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही मोठे योगदान होते. त्यांनी आपले पोवाडे आणि गीतांच्या माध्यमातून जनमानसांना त्यांच्यातील हिमतीची आणि कर्तव्याबाबतची जागृती करून दिली. कामानिमित्त मुंबईत आलेल्यांना मुंबई माझी असल्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण करून लौकिक कमावला.
हे वर्ष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे तर लोकशाहीर म्हणून लौकिक मिळविलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष आहे. एक तेज लोप पावले तर दुसरे उगवले हा विलक्षण योगायोग असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दोघांच्याही कार्याचा गौरव केला.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, रशियन स्टेट युनिव्हर्सिटीमधील अभ्यासक, मुंबई विद्यापीठातील मान्यवर, रशियन विभाग आणि विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. संजय देशपांडे आदी उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊंना मानाचा मुजरा. अण्णा भाऊ हे केवळ कलावंत नव्हते, तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवले, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.
आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मना-मनात पोहचवला. आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली. अण्णाभाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे. अशा महान साहित्यरत्न अण्णाभाऊंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे अण्णाभाऊ थोर समाजसुधारक होते. लोककला, लोकसाहित्य, लोकजीवन, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे ते स्वतंत्र विद्यापीठ होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी देशासाठी, समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महान साहित्यिक होते. मानवतावादी लेखक होते. दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून मांडलं. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी जीवनभर मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा लढला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा अनेक संघर्षात आघाडीवर राहून भूमिका बजावली. राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊंना असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाने केली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज मन जागविण्याचे काम स्वतःच्या शाहिरीतून आणि प्रतिभेतून केले आहे. प्रतिभावंत आणि संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आग्रहाने केल्याचे सांगितले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त आज वाटेगाव येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्यहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार मानसिंग नाईक, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तदनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री जयंत पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जुन्या घरास भेट देऊन अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्यहार करून अभिवादन केले व येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर साकारलेल्या शिल्पसृष्टीची पाहणी केली.
यावेळी वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री साठे व कुटुंबीय उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत आपण त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त श्री. मुंडे यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे. तसेच राज्य सरकारने केंद्राकडे याबाबतचा ठराव पाठवावा याबाबत आपण मागणी व पाठपुरावा करणार असल्याची माहिती बीड जिल्हा पालकमंत्री श्री. मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली.
पीडित - शोषितांचा आवाज आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे थोर समाजसेवक, लेखक - कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज शंभरावी जयंती. त्यांच्या विचारांचा वारसा आपण त्यांचे सच्चे अनुयायी बनुन अखंडपणे तेवत ठेवू. साहित्यरत्न यांना भारतरत्न देण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे, असे यावेळी मंत्री श्री मुंडे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाईल याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोप आणि अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबिनार द्वारे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मातंग समाज मंडळ, शिव सहकार सेना पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी दलित, शोषित आणि कष्टकरी त्यांच्या हितासाठी फार मोठे कार्य केले आहे. अण्णांचे शिक्षण कमी असूनसुद्धा त्यांची साहित्य संपदा फार मोठी आहे, त्यांनी विविध कथा, कादंबऱ्या, पटकथा लिहल्या असून, अनेक पोवाडे, लोकनाट्याची निर्मिती केली आहे, ही त्यांना ईश्वराने दिलेली एक देणच म्हणावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा आणि लोककलेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करून इंग्रजांच्या विरोधात, भारतीयांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा गोवा मुक्ती संग्राम असो यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते अण्णाभाऊ साठे यांनी फकीर नावाची कादंबरी लिहली आहे, या कादंबरीचा मूळ हेतू अन्यायाविरुद्ध लढा व सर्वसामान्यiच्या हिताचे कार्य हा होता. अण्णा भाऊ साठे यांचे, जीवन कार्य फार अदभूत आणि महान होते.त्यांनी समाजाच्या हितासाठी खूप मोठं कार्य केले आहे. त्याकाळी, मुंबईतील गिरणी कामगारांच्या व्यथा, पोटासाठी भटकंती, करणाऱ्या मजुरांचे दुःख त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या साहित्यातून समाजापुढे मांडलं अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने समाजसेवक होते. त्यांचे कार्य फक्त्त साहित्य पुरतं मर्यादित नसून देशातील परकीय राजवट संपली पाहिजे यासाठीही त्यांनी कार्य केले, असे ते म्हणाले. कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री रमेश बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिव सहकार सेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे, रवींद्र बागवे, अविनाश बागडे, हनुमंत साठे, रवींद्र दळवी, विजय अंभोरे आदींनी आपला ऑनलाइन सहभाग नोंदविला. लहुजी समता परिषदेचे, अध्यक्ष अनिल हातागले यांनी आभार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा