Amravati/Nakul sontakke:आंदोलन राहणार सुरूच, शुद्धीवर आल्यावर नकुल सोनटक्के यांची पहिली प्रतिक्रिया नकुल सोनटक्के यांच्या समर्थनार्थ चर्मकार महासंघ मैदानात

आंदोलन राहणार सुरूच, शुद्धीवर आल्यावर नकुल सोनटक्के यांची पहिली प्रतिक्रिया



*आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप 

* जिल्हा कचेरीवर उपोषणाला बसणार 



अमरावती, दि.१८ : दर्यापुर तालुक्यातील येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के हे मंगळवारी दुपारी शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो कधीच यशस्वी होणार नाही. मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, आता आम्ही जिल्हा कचेरीत आमरण उपोषण पुढे सुरू ठेवू असं त्यांनी सांगितलं.


 शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एकडगे यांनी काढले होते. त्यांच्या आदेशाला दर्यापूर तालुक्यात हरताळ फासली जात आहे. शेतकरी सामान्य माणसांची अक्षरशहा कोरोनाच्या काळातही पिळवणूक सुरू आहे. ही बाब ओळखता दर्यापुर तालुक्यातील येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी १४ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस पासून आमरण उपोषण आरंभले आहे. 

त्यांच्या उपोषणाला तहसीलदार, गटविकास अधिकारी  यांनी भेट दिली नाही. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सोमवारी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांची प्रकृती पूर्णतः खालावल्याने त्यांना रात्री उशिरा दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती अत्यवस्थ असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने अमरावती येथे रेफर केले. अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


मंगळवारी शुद्धीवर आल्यावर नकुल सोनटक्के यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. प्रशासनावर राजकीय दबाव टाकण्यात आला आहे. त्यामुळेच तहसीलदार व गटविकास अधिकारी आंदोलनाला भेट द्यायला आले नाहीत. माझे आंदोलन जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आपण तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही. रुग्णालयातही आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. येथून थेट आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तेथे आंदोलन करू असेही त्यांनी सांगितले.


नकुल सोनटक्के यांच्या समर्थनार्थ चर्मकार महासंघ मैदानात


*जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  

*आंदोलनावर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

 दर्यापुर तालुक्यातील येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ चर्मकार महासंघ मैदानात उतरला आहे. मंगळवारी महासंघाचे अध्यक्ष राजेश विजयकर यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देत आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. अन्यथा आपण रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
   स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येपासून दर्यापुर तालुक्यातील येवदा येथील गांधी चौकात नकुल सोनटक्के यांनी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. त्यांच्या आंदोलनाची तालुका प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. परिणामी पाच दिवसानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सोनटक्के यांची चर्मकार महासंघाचे अध्यक्ष राजेश विटेकर यांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी अध्यक्ष राजेश विजयकर, सचिव अरविंद सावरकर, युवा अध्यक्ष योगेश विजयकर, युवा सचिव प्रविन रावळे, प्रसिद्धि प्रमुख दिनेश अर्जापुरे, मुख्य मार्गदर्श मनोहर चव्हाण, कुलदिप विजयकर,  प्रविन सावरकर हे उपस्थीत होते.

टिप्पण्या