Akola MNC:अकोला महानगर पालिका राज्यात प्रथम क्रमांकावर

अकोला महानगर पालिका राज्यात प्रथम क्रमांकावर


अकोला: पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झाल्यामुळे पंतप्रधान आत्मनिर्भर निधी अंतर्गत गरजू फेरीवाल्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यात अकोला महानगर पालिका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांच्या व्हिडिओ द्वारा बैठकीत राज्याच्या नगरविकास प्रधान सचिवांनी अकोला महानगरपालिकेने या महिन्यात केलेल्या कामाची प्रशंसा करत मनपा आयुक्‍त आयुक्त संजय कापडणीस यांचे अभिनंदन केले.


पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता लक्षात घेवून शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेचे उद्दीष्टे रुपये दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करणे,नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे; आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे आहे. करिता पथविक्रेत्यांनी https://pmsvanidhi.mohua.gov.inवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.



याकरिता महानगरपालिकेने अर्जभरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावयाची होती. याकरिता सुविधा केंद्रावरून अर्ज भरून सादर करावे असे आवाहन अकोला महानगर पालिकेच्या महापौर  अर्चना मसने यांनी करण्याबरोबरच स्वतः सुविधा केंद्र उद्घाटन करून योजनेला कार्यान्वित करण्यास प्रोत्साहन दिले होते. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी याकरिता उपायुक्त वैभव आवारे आणि पूनम कळंबे यांचेवर जबाबदारी सोपवून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासह शहरातील चारही झोन कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शहरातील पथविक्रेते, फेरीवाल्यांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे .यासंदर्भात महापालिकेच्या नगरसेवकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.


महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ( एनयुएलएम )  विभागाने याकरिता शहरातील महिला बचत गट व त्यांच्या वरिष्ठ संस्था वस्तीस्तर संघ ,शहरस्तर संघ तसेच शहर उपजीविका केंद्र यासोबतच सामान्य सुविधा केंद्र (SCS) यांच्या प्रत्यक्ष व ऑनलाईन बैठका व प्रशिक्षणे घेतली. यामधून अर्ज भरण्याचे शुल्क मिळाल्याने अनेकांना या कालावधीत रोजगार प्राप्त होण्याबरोबरच शहरात मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याचे कार्य झाले.सद्यस्थितीतशहरातील पथविक्रेते/फेरीवाल्यांचे ३२४० अर्ज ऑनलाइन भरून अकोला महानगरपालिका राज्यात प्रथम स्थानी असून त्यापैकि बँकामार्फत२८१लाभार्थ्यांचे  एकूण २८ लक्ष एवढे कर्ज प्रकरणे मजूर झालेले आहेत.




याकारणाने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या महानगरपालिकांच्या तुलनेत अकोला महानगरपालिकेचे काम मोठ्या पटीने अव्वल आहे. या कारणाने इतर महानगर पालिका व नगरपालिकांना याचे उदाहरण देत नगर विकास प्रधान सचिव यांनी अकोला महानगरपालिकेची प्रशंसा केली. सोबतच त्यांनी शहरातील सर्व बँका व आर्थिक संस्था यांना अर्जावर लवकरच कार्यवाही करून कर्ज उपलब्ध करून योजनेला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.



टिप्पण्या