Women&Child: प्रत्येक जिल्ह्यात उभारणार महिला व बाल विकास भवन – ॲड.यशोमती ठाकूर

प्रत्येक जिल्ह्यात उभारणार महिला व बाल विकास भवन – ॲड.यशोमती ठाकूर


*‘तेजश्री’ योजनेच्या धनादेशांचे ठाकूर यांच्या हस्ते वितरण

*कारंजा येथील 'रूरल मार्ट' ला भेट


वाशिम : महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले. पथदर्शी प्रकल्प म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून हे भवन उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲड. श्रीमती ठाकूर म्हणाल्या, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोगाचे केंद्र सुरु करण्याबाबत सुद्धा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात पूरक पोषण आहाराचे नियमितपणे घरपोच वितरण करावे. याबाबतीत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एक रक्कमी लाभाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने सुरु असलेले पूर्व प्राथमिक शिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्राम बाल विकास केंद्र, एकात्मिक बाल विकास योजना, अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा, माझी कन्या भाग्यश्री, वन स्टॉप सेंटर, डिजिटल अंगणवाडी आदी योजनांचा ॲड. श्रीमती ठाकूर यांनी यावेळी आढावा घेतला.

 ‘तेजश्री’ योजनेच्या धनादेशांचे वितरण

मानव विकास कार्यक्रमामध्ये समाविष्ट वाशिम, मालेगाव, रिसोड व मानोरा या चार तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ०७ लोकसंचालित साधन केंद्रांना तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत एकूण १ कोटी ३ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या धनादेशाचे वितरण महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बचत गटाचे सदस्य असलेल्या अतिगरीब कुटुंबांना उपजीविकेचे साधन निर्माण करणे, कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंब, गटाला कर्जातून बाहेर काढणे आणि सीएमआरसी स्तरावर सामाजिक मूल्यवर्धित प्रकल्प राबविण्यासाठी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस अंतर्गत निधी देण्यात आला आहे.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महिला बचत गटांचे डिजीटायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २ हजार बचत गटांचे डिजीटायझेशन करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘ई-शक्ती’ पोर्टलचे ॲड.श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.नागपुरे व ‘नाबार्ड’चे श्री.खंडरे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली.

जिल्ह्यातील महिला बचतगटांचे काम चांगले असून त्यांच्या उत्पादनांना वाशिम शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचना ॲड.श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व कृषी विभागाच्या बीज प्रक्रियाविषयक संयुक्त उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या बचत गटांच्या कार्याचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.


 प्रत्येक जिल्ह्यात ‘रुरल मार्ट’ असावे

बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिला संघटीत झाल्या असून आता त्या उद्योग-व्यवसाय करीत आहेत. त्यांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू ह्या रुरल मार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी असे रुरल मार्ट प्रत्येक जिल्ह्यात असावेत, असे मत महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

आज ८ जुलै रोजी कारंजा येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड पुरस्कृत महिला आर्थिक विकास महामंडळ, वाशिम द्वारा संचालित महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे विक्री केंद्र असलेल्या ‘रुरल मार्ट’ला ॲड.श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या.

‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन मोहुर्ले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसिलदार धीरज मांजरे व गटविकास अधिकारी कालिदास तापी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ॲड.श्रीमती ठाकूर याप्रसंगी म्हणाल्या, महिलांच्या विकासासाठी ‘नाबार्ड’ने रुरल मार्टच्या माध्यमातून स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे. बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्य आणि वस्तूंना हक्काची बाजारपेठ या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. निश्चितच रुरल मार्टमुळे बचतगटातील महिलांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

या प्रकल्पाबाबत ॲड.श्रीमती ठाकूर यांना माहिती देतांना नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री.खंडरे म्हणाले की, २४ महिन्यांच्या कालावधीसाठी नाबार्डच्या वित्तीय सहभागातून पथदर्शी प्रकल्प म्हणून रुरल मार्टला सहाय्य केले आहे. जिल्ह्यातील बचतगटातील सर्व महिलांना याचा फायदा होणार आहे. कोरोनाच्या काळात रुरल मार्टमधून बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. महिन्याकाठी रुरल मार्टला १५ ते २० हजार रुपये मासिक उत्पन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. नागपुरे यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या जिल्ह्यातील ८६ बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हातमागावर बनविलेल्या वस्तू देखील विक्रीला आहेत. केवळ बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचीच येथे विक्री होत असल्याची माहिती श्रीमती ठाकूर यांना दिली.

प्रारंभी, रुरल मार्टमध्ये विक्रीसाठी असलेले साहित्य व वस्तूंविषयी माहिती त्यांनी जाणून घेतली. उपस्थित बचतगटांच्या महिला व माविमच्या सहयोगिनी यांच्याशी महिला व बाल विकास मंत्री ॲड.श्रीमती यशोमती ठाकूर यांनी संवाद साधून महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल प्रशंसा केली. अभिप्राय नोंदवही त्यांनी आपला अभिप्राय देखील नोंदविला.

यावेळी लोकसंचलित साधन केंद्राचे अधिकारी तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचतगटांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची उपस्थिती होती.

.........


टिप्पण्या