Save Earth: सातपुडा नी एक तपस्वी! ..मंजीतसिंग

Save mother Earth

सातपुडा नी एक तपस्वी! ..मंजीतसिंग 

कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी जगाला आहे. त्यामुळे आम्ही लॉकडाउन झालो आहोत. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी सालईबन भागात सध्या वेगळेच वास्तव पाहायला मिळत आहे. मंजितसिंग शिख नावाचा अवलीया लॉकडाउन असतानासुद्धा आपला दिनक्रम तितक्याच काटेकोरपणे पाळत आहेत. दररोज उठून हातात वीळा आणि खांद्यावर झाडाची रोप घेऊन तो अविरत, अविश्रांतपणे राबतो आहे. सातपुड्याचा पर्वतरांगा हिरव्याकंच करण्यासाठी. त्यांच्यासोबत नुकताच भेटण्याचा योग आला. 

कॅमेरा म्हटलं की माणस आकर्षित होतात. मात्र, मंजीत याला अपवाद ठरला. एका दैनिकात काम करतो. लॉकडाऊनमध्ये मंजीत सिंग काय करतो आहे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. स्क्रीन समोर सांगू शकाल का? असा प्रश्न मंजीत यांना केला. तेव्हा मंजीत  म्हणाले, तुला हव काय ते सांगेल. मात्र, स्क्रीन समोर सध्या यायचं नाही. अजून खूप काम बाकी आहे. माझ्यासोबत अन्यही सहकारी काम करताहेत. त्यामुळे आमच काम व्यक्तिकेंद्रित व्हायला नको, असे सांगून मंजीत सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये निघून गेले. त्यांचे हे उत्तर ऐकून त्याच्याबद्दलचा आदर कैक पटीने वाढला. प्रसिद्धीसाठी पराकोटीचे स्टंट करणारे दिसतानाच सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये 'सातपुडा नी एक तपस्वी मला दिसला.  सालईबन या भागाला त्याचं गतवैभव प्राप्त करून देणे हेच या अवलियाच भविष्यकालीन व्हिजन आहे. 

सातपुड्याच्या पर्वतरांगेत भ्रमंती करताना मंजीत सिंह यांच्यासोबत केवळ अनौपचारिक गप्पा झाल्या त्याचा अंश इथे देतोय. मंजीतभाई हे पत्रकारितेचे पदवीधर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर अपार निष्ठा. त्यातूनच त्यांनी महात्मा गांधी लोक सेवा संघाची स्थापना केली. श्रमश्री बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले मंजीतसिंग यांनी आनंदवनाद्वारे आयोजित श्रम संस्कार शिबिरांमध्ये सहभाग घेतला. समाजाचे देणे लागतो हा विचार मुळातच काळजात रुजल्याने त्यांनी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. समाजाची विविध विषय शब्दबद्ध करून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे शास्त्र निवडलं. बातमीदार म्हणून काम करताना त्यांना तिथं समाधान लाभत नव्हतं. म्हणून त्यांनी ग्राउंड लेव्हलला उतरण्याचा निर्णय घेतला. तरुणाई फाउंडेशन खामगावची स्थापना करून त्यांनी खामगाव, बुलढाणा या परिसरात सुमारे वीस वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचे काम केले. जल, जंगल, जमीन हे ब्रीद घेऊन त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या परिसरात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. आपल्या कामावर निष्ठा असणाऱ्या मंजीत यांच्या कामाची दखल समाजाने घेतली.  त्यातूनच त्यांना सातपुड्याच्या पायथ्याशी सालईबन भागात २०१५ मध्ये ७२ एकर जमीन पर्यावरण (Environment) संवर्धना साठी देण्यात आली. तेव्हापासून मंजितभाई या परिसरात वास्तव्याला आहेत. सुरुवातीला या भागात रस्ता नव्हता. वीज नव्हती. पाण्याचीही सुविधा नव्हती. आज मात्र त्यात भर पडली.  राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेमार्फत त्यांना झाड पुरवण्यात येतात. तर काही तरुणाई फाउंडेशनची मित्रमंडळीही त्यांना झाडे देतात. तसेच त्यांचा वैयक्तिक खर्चही लोकसहभागातून पूर्ण केला जातो. मंजीत अविवाहित आहेत. एक झोपडीत ते राहतात. डॉ.विकास बाबा आमटे, पोपटराव पवार,  आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रकल्पाला भेटी दिल्या.  त्यांच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०११  मध्ये राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सुद्धा त्यांना सन्मानाने बहाल करण्यात आला. या भागामध्ये ते राबवत असताना सध्या लॉकडाउन असतानाही  त्यांचा दिनक्रम चुकलेला नाही. भाई सकाळी उठून हातामध्ये वीळा घेत गरजेपुरतं पाणी ठेवत डोक्यावरती रोप घेऊन सातपुड्याच्या भागामध्ये झाडे लावण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या या धड़पडीचे व्हिजन काय असा प्रश्न साहजिकच पुढे येतो, त्यावर प्रामाणिकपणे ते उत्तरतात सांगायला लागतात की,  या भागात पूर्वी सालई नावाचे झाड होते. वनसंपदेने नटलेला हा भाग होता. त्यांची कत्तल करण्यात आली. संपूर्ण जंगल दिसेनासं झालं. याच ओसाड आणि उजाड माळरानावर पुन्हा याच जंगलाचे अस्तित्व अबाधित राहावे पुर्विसारखा हा परिसर हिरवागार व्हावा हेच माझे स्वप्न असल्याचे ते सांगतात. आपण जर या भागात गेलात तर निश्चितच सातपुड्याच्या या तपस्वीला भेटा.

कसे जाल?
बुलडाणा-नांदुरा-जळगाव येथून जामोद मार्गावर चालढाणा फाटा आहे. येथून सालईबनला जाता येतो. 

'एनामॉर्फिक स्कल्प्चर' वेधतो लक्ष..
मंजीत यांच्या व्यक्तिमत्त्वावर गांधी विचारांचा मोठा पगड़ा. त्यातूनच गांधी जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध उपक्रम राबविण्याचा आवाहन देशवासीयांना केलं होतं. या आवाहनाला साद देत तरुनाई फाऊंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी या भागात पोलादच्या शीट पासून तयार करण्यात आलेला महात्मा गांधी यांचे इल्युजन आर्ट उभारले. त्यालाच एनामॉर्फिक स्कल्प्चर' असे शास्त्रीय नाव आहे. दृष्टी भ्रम आधारित हे शिल्प आहे. एका विशिष्ट ठिकाणी अंतरावर जाऊनच हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेलांच्या इल्युजन आर्टपासून प्रेरणा घेऊन हे शिल्प तयार करण्यात आले आहे. सतरा लोखंडाच्या खांबावर हे चित्र आहे. त्यावर पोलादी शिट कट करून बसविन्यात आल्या. सहा महिने हे शिल्प तयार करण्यास वेळ लागला. वरील माहिती मंजीतभाई यांचे सहकारी उमाकांतजी कांडेकर यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल कांडेकरसर यांच्या ऋणात राहू इच्छितो.

-शुभम बायस्कार
(लेखक पत्रकार आहेत)

टिप्पण्या