Pandharpur:कशाला जाता दूर...येथेच पंढरपूर…अकोल्यातील प्राचीन विठ्ठल-रुख्मिणी मंदिर

  दिन विशेष:आषाढी एकादशी

कशाला जाता दूर...येथेच पंढरपूर…

अकोल्यातील प्राचीन विठ्ठल-रुख्मिणी मंदिर

  

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: विदर्भातील अकोला नगरीच्या वैभवशाली इतिहासात वैदिक भारताच्या संस्कृतीची जोपासना करण्यात आली आहे. श्रीराजराजेश्वर मंदिर हे अकोल्याचे आराध्यदैवत.श्रीरामदास स्वामी स्थापित शिवकालीन काळा मारोती मंदिर. तसेच या संस्कृतीची जोपासना करण्यात महत्त्वाचा वाटा असणारे संस्थान म्हणजे, जुने शहरातच स्थित श्रीविठ्ठल मंदिर संस्थान. मंदिर जवळपास ३५०-४०० वर्षा पूर्वीचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीविठ्ठल व श्रीरुख्मिणी यांची विलोभनीय मूर्ती आहे. मूर्तीचे दर्शन होताच भाविकांच्या मनात भक्तिभाव जागृत झाल्याशिवाय राहत नाही. यंदा covid-19 मुळे lockdown आणि महामारीची बिकट परिस्थिती उध्दभवल्याने शासकीय नियमानुसार आषाढी एकादशीला (देवशयनी)अत्यन्त साधेपणाने पूजा अर्चना करण्यात येणार आहे.

मंदिर स्थापना

या मंदिराची स्थापना स्व.पोपटलाल अग्रवाल यांच्या पूर्वजांनी केली असल्याचे, जुन्या पिढीतील नागरिक सांगतात. मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सवांना १९३३ पासून प्रारंभ झाला. परंपरागत हे उत्सव व सप्ताह आजपर्यंत अखंड सुरू आहेत.यावर्षी हे उत्सव सार्वजनिक न करता,फक्त मोजक्या पदाधिकारी यांच्या उपस्थित धार्मिक विधिनुसार पार पडले. पुढील कार्यक्रम देखील या पद्धतीनेच साजरे करण्यात येणार आहेत.

प्रथम प्रवर्तक तात्यासाहेब देशपांडे

श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रथम प्रवर्तक तात्यासाहेब देशपांडे होते. जुन्या भारतीय महिला शारदा मंडळाने येथे विविध कार्यक्रम राबविले आहेत. या मंदिरात जेंव्हा अखंड हरिनाम सप्ताह,काकडा आरती,हरिपाठ, नामस्मरण चालते तेंव्हा भूलोकी वैकुंठ अवतारल्याचा भास भाविकांना होतो. विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष वासूकाका ओक यांनी सुरवातीपासूनच या सांस्कृतिक उत्सवात विशेष प्रतिसाद दिला. वासू काका यांच्यानंतर नानासाहेब चिने, गोविंदराव भौरदकर, एम. एस. जोशी, भगवानदास पटेल, सुरेश आहेर यांनी कारभार चालविला. आज मंदिर संस्थानची  धुरा जेष्ठ वकील दादासाहेब देशपांडे वाहत आहेत.

आफळेबुवांचे किर्तन

अवघ्या देशाला आपल्या किर्तनातून जागृत करणारे राष्ट्रीय कीर्तनकार गोविंद स्वामी आफळेबुवा यांच्या कीर्तनाचा अपूर्व कार्यक्रम स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही घडवून आणला. नाना महाराज यांचे पुत्र बडोदेकर महाराज यांचे प्रवचनाच्या अमृतवाणीचा लाभ भाविकांना या संस्थान ने घडवून आणला. पूर्वी आषाढी पासून पुढे चार महिने म्हणजेच चातुर्मासमध्ये नामसंकीर्तनाचे कार्यक्रम या मंदिरात व्हायचे. ६०-७० वर्षांपूर्वी जशी श्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढी एकादशीला तशी गर्दी या मंदिरात व्हायची.आजही या मंदिरात एकादशीला भाविकांचा पूर लोटतो. पूर्वी येथे जत्रा भरत होती.दूरवरचे छोटे-मोठे व्यापारी या यात्रेत विविध गृहपयोगी आणि सजावटीच्या वस्तू,खेळणी विक्री करीत होते.आज यात्राचे स्वरूप पूर्वी सारखे मोठ्याप्रमाणात नाही;पण येथे पिढीजात येणारे व्यापारी आणि काही स्थनिक अन हारफुल,तुळसी हार,वाघडेचे फळ विक्री करणारे यात्रेत येतात. मात्र,यंदा कोरोना विषाणू संकटामुळे हे दृश्य देखील पाहायला मिळणार नाही.

जगतगुरु शंकराचार्य यांची पंढरीनाथासमोर हजेरी

येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये  अकोल्यातील तसेच बाहेरील कीर्तनकार यांना आमंत्रित करण्यात येते. प्रवचन,हरिपाठ,भजन आदी कार्यक्रम मंदीरात साजरे केले जातात. परम पूज्य श्री जगतगुरू शंकराचार्य ते अनेक संत महात्मे यांनी या मंदिरात येवून, पंढरीनाथ समोर आपली हजेरी लावली आहे. आपल्या प्रवचनातून अमृतवाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण सप्ताहात भव्यदिव्य सोहळा पाहून भाविकांच्या तोंडून नकळतपणे शब्द बाहेर पडायचे,"कशाला जाता दूर येथेच पंढरपूर".

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा:कशाला जाता दूर येथेच पंढरपूर


"टाळ  मृदुंगाच्या तालावर भाविक देहभान हरपून आपल्या पंढरीनाथाशी एकरूप होतो. जसे अवघे वैकुंठ पृथ्वीतलावर अवतरावे. असे टाळ मृदंगामुळे पंढरपूर हे नादब्रम्ह आहे, तसेच काशी हे पवित्र स्थान ज्ञानब्रम्ह आहे. तर बद्रीनाथ हे स्थान ध्यानब्रम्ह आहे. म्हणूनच हिंदूच्या कोणत्याही धार्मीक कार्यक्रमात टाळ व मृदूंग यांना अग्रस्थान आहे."

श्रीविठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे प्रथम सर्वसेवाधिकारी

मांगीलाल शर्मा  होते. त्यांच्या निधनानंतर  मंडळाचे सर्व सेवाधिकारी म्हणून त्यांचे पुत्र गोवर्धन शर्मा (आमदार) हे यशस्वीरित्या धुरा सांभाळत आहे. श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळातर्फे संपूर्ण वर्षभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू रहावे, सर्व भक्तांकडून ईश्वराचे नामस्मरण व्हावे, व जास्तीत जास्त भाविक प्रपंचामधून परमार्थाकडे प्रवृत्त व्हावे, या हेतुने मंडळाचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा व मंडळाचे अध्यक्ष अशोक मनवाणी यांनी सन १९९८ पासून दर एकादशीला महाआरती सुरु करण्याचा संकल्प केला होता. त्याच माध्यमातून दर एकादशीला महाआरती संपन्न होत आहे. सन २००१ मध्ये मंडळातर्फे अखिल जन कल्याणार्थम् श्रीराम जय राम जय जय राम या राम नामाचा १३ कोटीचा जप संकल्प सोडून वर्षभरात सर्व भाविकांनी ६५ कोटी जप केला. यामध्ये आमदार गोवर्धन शर्मा यांनी सुध्दा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास सिंहाचा वाटा उचलला होता.या कार्यक्रमाची सांगता होम हवनाने व महाप्रसादाने करण्यात आली. या कार्यक्रमाचा सांगता समारोहाचा प्रसंग अकोलेकर भाविकांच्या स्मरणात आजही आहे. तसेच २००२ मध्ये सुध्दा अखिल जन कलयाणार्थम ॐ नमः शिवायचा ११ कोटी जपाचा संकल्प केला.भाविकांनी १६ कोटी जप करुन कार्यक्रम सिध्दीस नेला त्याचा सुध्दा सांगता समारोह एप्रिल २००३ मध्ये होम हवन, कथा, प्रवचन, महाप्रसादाने झाली. यावर्षी देखील श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळ. विश्व शांती हेतू अखिल जनकल्याणार्थम् १३ लक्ष श्री राम जय राम जय जय राम नाम जप महायज्ञ संकल्प भाविकांनी सिद्धीस नेला.

सामाजिक कार्य

केवळ धार्मिक कार्यक्रमातच नव्हेतर सामाजीक कार्यक्रमास सुध्दा मंडळाचे सर्व सेवाधिकारी गोवर्धन शर्मा हे अग्रेसर असतात. मंडळाचे सदस्य सुध्दा तन मन धनाने प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने व यशस्वीरित्या पूर्णत्वास नेतात.गोवर्धन शर्मा यांचे वडील  मांगीलाल शर्मा हे तर नम्रतेची साकार मुर्तीच होते. त्यांच्या प्रेमळ व मृदू स्वभावाने या संस्थानाच्या कार्यक्रमात चांगली भर पडली. पुण्यात पाणशेत धरण फुटल्यावर जो हाहाकार उडाला व पुणेकर संकटात सापडले तेव्हा विठ्ठल मंदिर संस्थानच्या प्रवचन किर्तनातून निधी जमा करुन पुण्याला पाठविला. आजही सामाजिक क्षेत्रात जेव्हा संकटे येतात तेव्हा श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळ मदतीला धावून जाते. मंदिरात पूर्वी  आपत्कालीन निधी संकलन साठी गायनाचे कार्यक्रम सुध्दा व्हायचे.जमा झालेला निधी जन कल्याणसाठी पाठविला जायचा. यावर्षी सुद्धा राष्ट्रीय कार्य म्हणून कोरोना महामारीशी लढण्यासाठी मंडळातील युवा वर्गाने रक्तदान शिबिराचे आयोजन १४ जून रोजी केले होते.शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा रक्तदान केले.


पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक व्याकुळ

आषाढी एकादशीला श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक व्याकुळ होतात. पंढरपूरला मोठी यात्रा भरते. वारकरी भाविक देहभान विसरुन पांडुरंगाचे रुप बघण्यास व्याकुळ झालेले असतात. परंतु जे भाविक हा अपूर्व सोहळा बघण्यास तिथे जाऊ शकत नाही, त्यांना या सोहळ्याचे भावदर्शन व्हावे म्हणून मंदिराचे जुने विश्वस्त भजन,फुगड्या, भारुड, पालखी, दिंडी, दहीहांडी, गोपाळकाला हा सर्व सोहळा थाटामाटात साजरा करत होते. यातून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय अनुपम असतो असायचा.मात्र,यंदा भाविकांचा कोरोना महामारीमुळे हिरमोड झाला आहे. मंदिरात येवून आपल्या पंढरी नाथाची गळाभेट घेवू शकणार नाही.मात्र,यंदा पांढुरंगच भाविकांना घरी जावून भेट घेणार आहेत, अशी धारणा भाविकांनी करून घेतली आहे. भाविक यंदा घरी राहूनच पूजा अर्चना करून पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत.

मंडळाचा उद्देश लोकांमधील सुप्त धार्मिक भावना जागविणे हा आहे. राजकारण हे धर्मोधष्ठित असावे, परंतु धर्मात राजकारण नसावे. पूर्वी राजाला ही सुध्दा धर्मदंड असे आणि त्यामुळेच समाज व सर्वराज्य सुखात असे. त्याचप्रमाणे ह्या मंडळाची पूर्वीचे विश्वस्त मंडळी ही राजकारण विरहीत भावाची होती. सर्व कार्यक्रम आध्यात्मिक भावाने होत होते. आताची मंडळी सुद्धा राजकारण सापेक्ष असूनही मंदिरात अखंड कार्यक्रम होतात. असे जुन्या मंडळीचे मत आहे. आताही या संस्थानतर्फे अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यात प्रवचन,किर्तन, हरिपाठ, भजन, दहीहांडी, गोपाळकाला, महापूजा असे भरगच्च कार्यक्रम होतात.त्यानंतर पंढरीनाथाच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येते व दरवर्षी महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम असतो. पंढरीनाथाच्या महाप्रसादाचा असंख्य भाविक लाभ घेतात. हे सर्व कार्यक्रम मंडळाचे तरुण उत्साही कार्यकर्ते व सदस्य पदाधिकारी सिध्दीस नेतात. परंतु,यावर्षी कोविड-१९ मुळे महाभयंकर परिस्थिती उध्दभवली असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. 


"यावर्षी मोजक्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला मुख्य सोहळा पार पडणार आहे.परंपरागत व धार्मिक विधी प्रमाणे जे करणे आवश्यक आहेत,असे कार्यक्रम मंदिर पुजारी यांच्या हस्ते करण्यात येतील."

रमेश अलकरी (व्यवस्थापक)

श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळ,अकोला.

........







टिप्पण्या