Online education:लावण्या शिक्षणाचा लळा...मुलांच्या घरीच आली शाळा...

ज्ञानगंगा आली घरी...!

लावण्या शिक्षणाचा लळा
मुलांच्या घरीच आली शाळा..

पाचमोरीची जिल्हा परिषद शाळा म्हणजे नाविन्याचा ध्यास घेवून गुणवत्ता विकास साधण्याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.


भारतीय अलंकार
अकोला: जिल्ह्यातील पंचायत समिती अकोला अंतर्गत पाचमोरी येथील जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ते 5 ची द्विशिक्षकी शाळा आज जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमशिल शाळा म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे या शाळेत शंभर टक्के विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत.

विपरीत परिस्थितीत मुख्याध्यापिका मनिषा शेजोळे यांनी शाळा समृद्धीचा संकल्प केला आणि गुणवत्तेचा व नाविन्याचा ध्यास मनात ठेवून कोणत्याही कामाचा त्रास न मानता 'शाळा म्हणजे मंदिर' व 'विद्यार्थी माझे दैवत' या एकाच प्रेरणेतून कामाला सुरुवात केली. प्रथमतः विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला महत्त्व दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, प्रामाणिकपणा ही तत्वे पाळणारा, पर्यावरणस्नेही, कलासक्त, श्रमप्रतिष्ठेचे मोल जाणणारा, ज्ञानपिपासू विद्यार्थी व शिक्षक घडविणे हे जिल्हा परिषद शाळा पाचमोरी चे स्वप्न आहे..आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. शाळेतील विविध उपक्रमातून पालकांना, गावाला शाळा आपली वाटू लागली. परिणामी ग्रामस्थांचा सहभाग वाढू लागला आहे. 

मनोरंजनात्मक शिक्षण व विविध भाषिक खेळ याद्वारे अध्यापनात रंजकता आणल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली.

परंतु नंतर मात्र सद्यस्थितीत जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाचा आकस्मित शिरकाव झाला. आणि संपूर्ण चित्रच बदलले... त्यामुळे कोरोनाबाबत जनता व विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या हेतूने शाळेतील "कोरोना बचाव"  कार्यशाळेत मुख्याध्यापिकेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बचाव मास्कची निर्मिती केली. गावांमध्ये रॅली काढून प्रतिबंधात्मक उपाय यांच्या माहिती पत्रकांचे वाटप करून जनजागृती सुद्धा केली. पण...पुढे खरी अडचण आली ती शिक्षणाची...! 

ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी आजही जेमतेम तुटपुंज्या मजुरीवर जगणारे पालक आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतांनाही काहीही करू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. 
स्वतः उत्तम तंत्रस्नेही असलेल्या मनिषा शेजोळे यांच्या वर्गातील अगदी मोजक्याच मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तर काही मुलांकडे साधा मोबाईल आहे.आणि काही मुलांकडे मोबाईलचं नाही. त्यामुळे अशा विविध गटातील मुलांना एकसारखा अभ्यास देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी वर्गातील ज्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांचेसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. तसेच वर्गातील ज्या मुलांकडे साधा मोबाईल आहे त्याच्या पालकांच्या मोबाईलवर सूचनांचे मेसेजेस पाठवण्यासोबतच मुलांचा अभ्यास, ऑफलाईन टेस्ट सुद्धा पाठवतात. त्याला सर्वांकडून छान प्रतिसाद मिळत आहे. दररोज फोन करून मुलांनी केलेल्या अभ्यासाचा आढावा पण घेतल्या जातो. अभ्यासात अडचण आल्यास मॅडमला निःसंकोचपणे फोन करून विचारणा केली जाते. मॅडम लगेच शंका निरसन करतात. पण...ज्यांचेजवळ मोबाईलचं नाही अशा मुलांचे काय ? असा प्रश्न त्यांना सतावू लागला. शेवटी अशा मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी सोशल डिस्टंन्स ठेवून थेट शिक्षण प्रत्येक मुलांच्या घरी घेऊन जाण्यासाठी "ज्ञानगंगा आली घरी " हा उपक्रम सुरू केला. पालकांना व विद्यार्थ्यांना घरी जावून मार्गदर्शन केले. सोशल डिस्टंन्स ठेवून, मास्क लावून अभ्यासाला बसवले. पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांना स्वखर्चातून लेखन साहित्याचे वाटप केले. स्वतः स्वाध्याय पुस्तिकेच्या झेरॉक्स काढून मुलांना दिल्या. वेळोवेळी शक्य होईल तेव्हा मार्गदर्शन व वह्या तपासणीचे काम सुरू केले. अशाप्रकारे शाळा बंद, पण ऑफलाईन शिक्षण सुरू ठेवले आहे. 

लर्न फ्रॉम होम च्या जिल्हास्तरीय अभ्यास गटात सदस्य व तालुका समिती सदस्य असलेल्या तंत्रस्नेही मनिषा शेजोळे यांनी स्वतः घटकानुसार अनेक शैक्षणिक व्हिडिओ, पीपीटी, स्मार्ट पीडीएफ, फ्लीपबुक्स यास्वरूपात ई कंटेंट निर्मिती केली असून जिल्ह्यातील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना प्रोत्साहित करून तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणले आहे.
.........


टिप्पण्या