Malnutrition:'कुपोषणमुक्ती'साठी एक ठोस पाऊल-डॉ. आरती कुलवाल

'कुपोषणमुक्ती'साठी एक ठोस पाऊल - डॉ. आरती कुलवाल


*पोषण पुनर्वसन केंद्र ठरतेय उपयुक्त!

*शेकडो माता व बालकांनी घेतला लाभ
भारतीय अलंकार
अकोला: अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील बालकांच्या कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये राज्य शासनाने सन २०१६ मध्ये पोषण पुनर्वसन केंद्रांची स्थापना केली. त्याच पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जिल्हा स्त्री रूग्णालयातही १७ जानेवारी २०१६ रोजी या केंद्राची स्थापना करण्यात आली असून, हे केंद्र म्हणजे कुपोषणमुक्तीच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरत असल्याचा विश्वास रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आदिवासी बांधवांमधील बालमृत्यूचे प्रमाणही कमी होवून एक सक्षम पिढी निर्माण करण्याच्या शासनाच्या योजनेस बळकटी मिळत असल्याचेही डॉ. कुलवाल म्हणाल्या.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मे २०१६ रोजी नाशिक विभागातील सातपुड्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या पोषण व उपचारासाठी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात 'युनिसेफ' च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचे (न्युट्रीशन रिहॅबिलिटेशन सेंटर) उद्घाटन केले. तत्पूर्वी, त्याच धर्तीवर अकोल्यात जिल्हा स्त्री रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली. 

महिलांचे बाळंतपण असो, की बालकांवर जननी शिशू योजनेंतर्गत केले जाणारे उपचार, त्यासाठी केवळ अकोलाच नव्हे तर लगतच्या बुलडाणा आणि वाशिम या जिल्हयांमधील लोकांचा जिल्हा स्त्री रूग्णालयाकडेच सर्वाधिक ओढा आहे. अगदी विवाह होवून पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा येथे सासरी गेलेल्या पश्चिम विदर्भातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीही बाळंतपणासाठी जिल्हा स्त्री रूग्णालयालाच प्राधान्य देत असल्याने अलिकडच्या काळात या रूग्णालयावरील ताण वाढला असला तरी रूग्णसेवेच्या बाबतीत या रूग्णालयाने विदर्भात एक आदर्श कायम केला आहे. परिणामी पोषण पुनर्वसन केंद्रालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गेल्या चार वर्षांच्या आकडेवारी वरून दिसून आले आहे.  


डॉ. आरती कुलवाल यांनी या केंद्रासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले, की या पोषण पुनर्वसन केंद्रात १० खाटांची व्यवस्था असून, येथे सहा वर्षे वयापर्यंतच्या कुपोषित बालकांचा सर्वांगिण शारीरिक विकास होण्यासाठी उपचार करण्यात येत आहेत. येथे पोषण आहार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, कुपोषित बालकांच्या सुश्रुषेसाठी परिचारिका व अन्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये बालकांसाठी उपचारासोबतच त्यांना पोषण आहार दिला जातो. तसेच मुलांसाठी खेळण्याची साधने, कुपोषित बालकाच्या पालकांचे समुपदेशन, बालकांच्या आईलाही आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. बालकाला एनआरसी केंद्राच्या मेसमधून तर त्याच्या आईला रूग्णालयाच्या मेसमधून भोजन देण्यात येते. बालकाच्या पालकाला बुडणार्‍या रोजगाराची भरपाई म्हणून दररोज १०० रुपये रोख स्वरूपात देण्यात येतात. या केंद्राच्या निर्मितीमुळे आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील कुपोषित बालकांवर वेळीच उपचार करुन त्यांना कुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यास मदत होत आहे. या केंद्रामध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांवर १४ दिवसांपर्यत उपचार करण्यात येतात. या बालकांना त्यांच्या घरी पाठविल्यानंतर पुढील सहा महिन्यांपर्यंत त्यांची दर १५ दिवसांनी तपासणी करण्यात येते. या माध्यमातून बालकांच्या प्रकृतीत होणारया सुधारणेचा आढावा घेवून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही डॉ. कुलवाल यांनी सांगितले.

१२०४ माता आणि बालकांनी घेतला लाभ
दरम्यान, जिल्हा स्त्री रूग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्राचा गेल्या चार वर्षांच्या काळात ६०२ माता आणि ६०२   बालकांनी लाभ घेतल्याची माहिती या केंद्रातील बालरोगतज्ज्ञ डॉ. साधवाणी यांनी दिली. सन २०१६- १७ मध्ये ८७ माता ८७ आणि बालकांना या केंद्रातून लाभ देण्यात आला. सन २०१७- १८ मध्ये १५२ माता आणि १५२ बालकांना, सन २०१८- १९ मध्ये १८३ माता आणि १८३ बालकांना, सन २०१९-२० मध्ये १८० माता आणि १८० बालकांना या पोषण आहार केंद्रातून लाभ मिळाला.

दररोज १०० रूपये बुडीत मजूरी रोख
दरम्यान, या केंद्रात मातेसोबतच बालकाच्या आहाराची व्यवस्थितपणे काळजी घेतली जाते, बालकांना सकस आहार दिला जातो ज्यामध्ये दूध, फळे, खिचडी, काजू, बदाम, उपमा, सोयाबिनच्या वडयांचा समावेश असतो, अशी माहिती सध्या या केंद्रात राहून लाभ घेणारया वडद आणि आपोती या गावांमधील पूजा सचिन नांदूरकर आणि सुषमा देवलाल शिरसाट या मातांनी सांगितले. पूजा यांच्या १६ महिन्यांच्या मुलीवर आणि सुषमा यांच्या तीन वर्षांच्या मुलावर या केंद्रात उपचार सुरू आहेत. आम्हाला दररोज १०० रूपये बुडीत मजूरी रोख स्वरूपात देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
.........
(Like, Share, Subcribe,Comment)

टिप्पण्या