Maharashtra tourism: महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा

महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा



मुंबई: महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा (Maha Tagline Contest) आयोजित करण्यात आली आहे. यात राज्यातील व देशातील कलाकार, तरुण, विद्यार्थी यांसह सर्व घटक सहभागी होऊ शकतात. त्यांच्या कल्पना व आधुनिक ज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य तयार करण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. स्पर्धेत सहभागाची अंतिम मुदत १२ जुलै २०२० आहे. 

प्रवेशिका maharashtratourismcontest@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात. विजेत्या स्पर्धकांना पर्यटन संचालनालयाद्वारे प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम १० हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेविषयक सविस्तर अटी व नियम यासाठी फेसबूकवर https://bit.ly/2YY7n0N तर इन्स्टाग्रामवर https://bit.ly/2C2qhup या लिंकवर क्लिक करावे. महाराष्ट्र पर्यटनविषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या जाहिरातीवर बोधचिन्हाच्या कल्पक माध्यमातून निरंतर सन्मानित होण्याचा लाभ उपलब्ध होणार असल्याने देशातील व राज्यातील युवक, कलाकार आदींनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन संचालयालयाने केले आहे.

पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनस्थळांना व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देऊन राज्यात देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सध्या जनमानसात असलेले सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटन संचालनालयाने आगामी काळात समाज माध्यमांचा वापर करून राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी मोहीम राबविण्याचा निर्णय  घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. बर्फाच्छादित हिमशिखरे वगळता महाराष्ट्राचे पर्यटन विविधतेने सजले आहे. ऐतिहासिक  गडकिल्ले, गिरिस्थाने, निसर्गरम्ये समुद्रकिनारे, अभयारण्ये, जागतिक वारसास्थळे, लेणी, सरोवरे, जंगल, धार्मिक स्थळे इत्यादी समृद्ध पर्यटन वारसा राज्यास लाभला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता विचारात घेऊन पर्यटन संचालनालय हे गेली काही वर्षे आपल्या जाहिरातीमध्ये "महाराष्ट्र अनलिमिटेड" या घोषवाक्याचा वापर करीत आहे. तथापि, हे घोषवाक्य जुने असल्यामुळे पर्यटन संचालनालयाने भविष्यातील प्रसिद्धी मोहिमेसाठी नवीन घोषवाक्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पण्या