Indian women:विदर्भाची झिंगुबाई बनली अनाथाची नाथ...

          स्त्रीशक्ती-आदिशक्ती

विदर्भाची झिंगुबाई बनली अनाथाची नाथ...

- पंजाबराव वर
झिंगुबाई बोलके यांचे बालपण टिटवा ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथे गेले. वडीलाचे नाव नामदेव टुलाजी तायडे व आई  पंचफुला नामदेव तायडे या सुंदर जोडप्याचे संसारवेलीवर सुंदरचे फुल म्हणजे झिंगुबाई! तिच्या आईवडीलांची परिस्थिती हलाकीची. त्यातच कहर म्हणून झिंगुबाई दिव्ययांग म्हणून जन्माला आली ! परंतू , दिव्याग असूनही लहानपणापासून झिंगुबाई फार गुणवान, दिसायला सुंदर, लहानपणी गोड गळ्याची, गाणी गायची, गाणी तिला वडीलांकडून मिळालेली देन आहे.  वडील नामदेवराव तायडे हे कवी होते. झिंगुबाई आईला कामधंदा करू लागायची त्यामुळे ती सर्वांची लाडली होती. झिंगुबाईला लहान चार भावंडे निळकंठ, उद्धव, देवराव व भाऊराव व ती त्यांची थोरली बहीण. झिंगुबाई थोरली असल्यामुळे लहानपणी आईसोबत आठ आणे रोजाने कामाला जायची. तिला अपंग असल्यामुळे काम होत नसे त्यामुळे सोबतीला असलेल्या बाया झिंगुबाईला गाणे म्हणायला लावत असत व तिचे काम त्या बायाच करत असत, अशी ती सर्वांची लाडकी होती. 

वयाच्या बारा वर्षापासून झिंगुबाई गाणे म्हणणे, कविता करणे तिला छंद होता. परंतू घरची परिस्थिती फार हलाकीची असल्यामुळे आईवडीलांना कुटूंब चालवणे फार कठिण जायचे. भावंडे लहान होती, झिंगुबाईचे वडील नामदेवराव हे समाजातील लग्न लावण्याचे, प्रबोधनाचे काम करायचे. कार्यक्रमात गित गायचे व कविताही लिहायचे.वडीलांचे समाज प्रबोधनाचे सर्व गुण झिंगुबाईमध्ये आलेत. 
झिंगुबाई १८ वर्षाची झाली, तेंव्हा या वयातच मुलीचे लग्न करण्याची घाई असायची. परंतू झिंगुबाई दिसायला सुंदर, गुणी, गित गायणारी, कविता करणारी असूनही एका पायाने अपंग असल्याने तिला कोणताही पोरगा पसंत करीत नव्हता. त्यामुळे झिंगुबाईचे आईवडील फार चिंतेत असायची. आपल्या मुलीचे कसे होईल, एवढी गुणी पोर माझी परंतू ती अपंग असल्याने तिला जो-तो नाकारतो म्हणून वडील फार चिंतेत असायचे. 


ज्या महिलांसोबत झिंगुबाई कामाला जायची त्या महिलांही तिला खुप जीव लावायच्या, म्हणायच्या ‘‘माय किती सुंदर आहे की, पोरगी, आम्हाला सोडून जाशील तर आम्हालाही करमणार नाही, तू आम्हाला गाणे म्हणून दाखवितेस, सावित्री, रमाई, जिजाऊच्या कथा सांगतेस, एवढ्या वयातही तुला किती शहाणपण आलय झिंगु!’’

परंतू त्या वयातही झिंगुबाई जणू समजदारपणे त्यांना म्हणायची.ईश्वराने मला अपंग म्हणून जन्माला घातले, आपण काय लग्नाचा विचार करायचा. मी ही लग्न करणार नाही, मी देखिल माझे वडीलाप्रमाणेच समाज प्रबोधनच करीन. तेंव्हा  कामावरच्या बाया खूप नाराज व्हायच्या, व शहाणी गं बाळ म्हणून तिला जवळ करायच्या. 

झिंगुबाईचे वडील फार चिंतेत होते. माझ्या झिंगुचे कसे होईल! याचीच त्यांना फिकीर लागलेली होती. तेंव्हा झिंगु बाबाला म्हणायची, ‘‘बाबा, तुम्ही माझी काहीही काळजी करू नका! मी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला आहे, मी भिक्षुणी होईन, सत्याच्या मार्गाने जाईन, बुद्ध धम्माचा प्रचार करीन समाज कार्य करीन’’ हे झिंगुचे शब्द ऐकल्यावर आई-बाबाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या.

धाकली गावात कार्यक्रमात झिंगुबाईने स्वत: लिहीलेले गाणे त्या सभेत सादर केले. लोकं म्हणायची नामदेव तायडेची पोरगी फार हुशार आहे, एवढ्या लोकांतही तिने न घाबरता  स्वरचित गित सादर केले. सर्वांनी टाळ्या वाजवून तिला प्रतिसाद दिला. त्याच सभेत श्रावण बोलके यांनी झिंगुबाईचे गित ऐकले. व त्याला माहीत पडले होते की, झिंगुबाई पायानं अपंग आहे म्हणून तिची सोयरीक होत नाही. श्रावण बोलके हा सुद्धा भजने म्हणायचा. त्याचे घरी पेटी, तबला होती. त्यांना दोन भावंडे. त्यांचेही घरची परिस्थिती जवळपास यांच्यासारखीच! परंतू गुणी पोरगी म्हणून श्रावण बोलके यांनी पसंद केली खरी परंतू त्याचे भाऊ त्याला म्हणत, ‘‘तू ही लंगडी बायको करू नको, तुला एकट्यालाच काम करू-करू मरावे लागेल, तिला तुला पोसावं लागेल!’’ असे म्हणून प्रचंड विरोध करीत होते. परंतू श्रावण बोलके यांनी कोणाचेच ऐकले नाही. टिटवा गावातील इतर समाजातील लोकही श्रावण बोलकेंना म्हणायची, ‘‘पाहुणे बुवा, पोरगी अगदी लाखात एक आहे, फार गुणवान आहे, दिसायलाही सुंदर आहे, या वयात स्वत: लिखाण करते व गाणेही म्हणते, परंतू फक्त ती अपंग आहे!’’ म्हणजे समाजातील सर्व लोक, व गावातील इतरही लोक झिंगुबाईची गॅरंटी घेणारे होते. सर्व गाव झिंगुबाईला आपली लेक मानत होते. झिंगुच्या मैत्रीणी तिला म्हणायच्या नवरदेव काहीच चांगला नाही, त्याच्या घरीही काहीच नाही, परंतू वडीलांच्या काळजीला बघून झिंगुबाईने श्रावण बोलके सोबत लग्न केले. वडीलांची परिस्थिती बिकट, त्यातच झिंगु पायाने दिव्यांग, जो-तो तिला  नापंसद करत होते, वडील खचून गेलेले होते. लहान -लहान मुलांचे शिक्षण सुरु होते. 
श्रावण बोलकेने आई व भावाचं ऐकलं नाही म्हणून  त्यांनीही त्यांना स्वीकारलं नाही, राहतं घर दुसर्‍याला विकून टाकलं. कुठेतरी झोपडी बांधून, इतरांच्या सहाय्याने राहून त्यांनी आपला संसार केला. जिथे काम मिळेल त्या गावाला जायचे, झोपडी बांधून राहायचे, परंतू या साजर्‍या दिसणार्‍या परंतू अपंग असणार्‍या झिंगुबाईला ही कठिण काम येत नव्हती परंतू तरीही तिने हार मानली नाही, धरणांवर पतीसोबत कामाला जायची. परंतू पायाने दिव्यांग असल्याने टोपले डोक्यावर घेऊन चालता यायचे नाही, अशाही परिस्थितीत त्यांनी दिवस काढलेच. 

झिंगुबाईची मावशी  व मामा निंभा (मोकळा) ता. मूर्तिजापूर येथे राहतात म्हणून  तिथे १९८५ गेली. परंतू जवळच्या नातेवाईकांनी ही सहारा दिला नाही, खूप हाल सोसावे लागले. झोपडीमध्ये त्यांनी दिवस काढले. दोघांनीही लोकांची मजूरी करायची, परंतू गरीबी जरी असली परंतू पंचशिलेचा मार्ग मात्र सोडला नाही. तिथे झिंगुबाई बोलके यांनी महिलां मंडळ स्थापन केले, लहान-सहान कार्यक्रम घेणे सुरु केले, बचत गट काढण्यास महिलांना प्रवृत्त केले. भजनी मंडळ सुरु केले. 


निंभा गावात दहा दिवसाचा कॅम्प आला, त्या कार्यक्रमाध्ये राजपुत सरांनी गावातील लोकांची विचारपूस केली. कोणी आमच्या कार्यक्रमामध्ये गित वगैरे सादर करेल का? तर बरेच लोकांनी सांगीतले की, झिंगुबाई बोलके ह्या स्वत: कवीयत्री आहेत, स्वत:च लिखाण करतात, त्या म्हणतील, त्यांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. पहिल्यांदाच  स्टेजवर जाण्यासाठी त्यांचेकडे चांगले लुगडे नव्हते. आया-बायांना त्यांनी लुगडे मागीतले परंतू कोणीच दिले नाही, फाटक्या लुगड्यात झिंगुबाईने सुंदर परंतू प्रबोधनात्मक गित सादर केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.आर.राजपुत साहेब खुप खुष झाले. छोट्याश्या खेड्यामध्ये  एवढे सुंदर विचार मांडणारी कवयीत्री आहे, म्हणून त्यांनी झिंगुबाईला विचारले, तुम्ही स्वत: लिहीता का? त्यावर झिंगुबाई म्हणाली, ‘‘सर माझ्या ५० कविता मुखपाठ आहेत.’’ राजपूत सरांना फार आनंद झाला., दुसरे दिवशी मंत्री बाबासाहेब धाबेकर येणार होते. त्यांचे साठी स्वागत गित स्वत: झिंगुबाईने लिहीले व म्हटले. धाबेकरही मनोमन खुष झाले. झिंगुबाईचे भाग्य उजळायला सुरुवात झाली. भल्या मणाचा माणूस प्रा. राजपूत सरांनी झिंगुबाईला अमरावतीला बोलावले, तुमच्या सर्व कविता लिहून पाठवा मी पुस्तक छापून देतो म्हणाले. 
येथून झिंगुबाईने मागे फिरून पाहलेच नाही, दोन मुलांचे शिक्षण सुरु. बी.डी.ओ. कार्यालयातून, तहसील कार्यालयातून तालुक्याभरासाठी साक्षरता अभियानाचे कार्यक्रम झिंगुबाई व तिच्या संचाला देण्यात आले. जिल्हाभर झिंगुबाई प्रबोधन करायला निघाली, महिलांनी शिकले पाहीजे, पती पेटीमास्ता, माणिकराव वानखडष, विनोदराव देशमुख, भाष्कर मोगरे, राजू भगत यांना सोबत घेवून जिल्हा पिंजू काढला. आकाशवाणीवर कार्यक्रम होऊ लागले. जिल्हाभर साक्षरता अभियान, दारूबंदी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, रमाई,जिजाऊ सावित्री यांचा विचार झिंगुबाईने पेरण्याचे काम केले. 
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय महिला परिषद दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली. देशभरातील हाय-फाय महिला तिथे असतांना परंतू वर्‍हाडातील ही नऊवारी साडीमधील झिंगुबाई या त्या कार्यक्रमाच्या आकर्षण ठरल्या होत्या. ते स्टेज देखिल त्यांनी आपल्या वर्‍हाडी भाषेमध्ये गाजवलं. आणि शासनाचे पुरस्कार झिंगुबाईला बोलके झाले. खेड्यातील महिला दिल्लीचं तक्त गाजवू लागली. महिला बचत गटाचे माध्यमातून शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार ३ जानेवारी २००२ रोजी विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांचे हस्ते प्राप्त झाला. 
मुख्यमंत्र्यांनी विदर्भ कन्येचे खूप कौतूक केले. सन २००३-०४ मध्ये शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त झाला. आणि झिंगुबाई सर्वांना महाराष्ट्रभर परिचीत झाल्या. ३ जानेवारी २००७ रोजी महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाला. 
आणि वर्‍हाडकन्येचा लाखा-मोलाचा समजला जाणारा ज्या माऊलीने किती हाल अपेष्टा सहन केल्या, खाण्यापिण्याची मारामार, अर्ध्या आयुष्यापर्यंत स्वत:चे राहायला घर नाही, अशा परिस्थितीत फाटक्या लुगड्यात दिवस काढलेल्या रमाई-भिमाच्या लेकीला देशातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते ८ मार्च २०१० ‘स्त्री शक्ती पुरस्कार’ रोजी देण्यात आला. तीन लाख रुपये नगदी, मोमेंटो, विमानाने जाण्या-येण्याची तिकीट, सोबतच्या सर्व लोकांची राहण्या-खाण्याची व्यवस्था! जवळच्यांनी छळले पण झिंगुबाईच्या कार्याने तिला गौरविले! झिंगुबाईचे कार्य गावापासून ते देशपातळीपर्यंत गेले. याचे श्रेय अमरावतीचे प्रिंसीपॉल डॉ. प्रा. राजपुत सरांना त्यांचे सहकारी व झिंगुबाईचा लहान भाऊ भाऊराव तायडे यांना जाते. 
२०१७ मध्ये झिंगुबाईच्या समाजसेवेच्या कार्याची दखल जिल्हा, राज्य, देशानंतर अमेरिकेने घेतली. फाटक्या लुगड्यातील, पायात चप्पल नसलेली, नऊ वारी साडीतील झिंगुबाईची फाऊंडेशन फॉर ह्युमन होरॉयझान या संस्थेचे अध्यक्ष दिलीप मस्के यांनी दखल घेऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी याच रमाई-भिमाच्या विदर्भाच्या लेकीचा, अनाथाच्या नाथ बनलेल्या झिंगुबाईचा सत्कार अमेरिकेमध्ये झाला. त्यांना विमानाने प्रवासासाठी प्रा. राजपुत सर, व इतर लोकांनी मदत करून त्यांनी अमेरिकेमध्ये त्यांचा सत्कार झाला. अशी ही झिंगुबाई जिल्हाभर अनाथाची नाथ बनून कार्यरत आहे.
.........

टिप्पण्या