f मुख्य सामग्रीवर वगळा

Nayadaur:पांगरी महादेव गावाचा सुरू झाला 'नयादौर'! Pangri Mahadev village

पांगरी महादेव गावाचा सुरू झाला 'नयादौर'!

कोरोनामुळे मुळगावी परतलेल्या      युवकांनी तयार केले गावात रस्ते


भारतीय अलंकार
वाशिम: सुपरस्टार दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला अभिनित सन १९५७ मध्ये प्रदर्शित चित्रपट 'नयादौर ' मधील एक गाणे 'साथी हाथ बढाना...' आजही ऐकलं की,त्यातील एकेका शब्दातून प्रेरणा मिळते.

''साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना 
 एक अकेला थक जाएगा मिल कर बोझ उठाना
हम मेहनतवालों ने जब भी मिलकर क़दम बढ़ाया

सागरने रस्ता छोड़ा पर्वतने शीश झुकाया
फ़ौलादी हैं सीने अपने फ़ौलादी हैं बाँहें
हम चाहें तो पैदा कर दें, चट्टानों में राहें,
साथी हाथ बढ़ाना
'' 

साहिर लुधीयानवी यांची ही गीतरचना... या गीतरचनेतील प्रत्येक ओळ सिद्ध करून दाखविली, ती  वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावातील  नागरिकांनी.

 कोरोनामुळे अनेक गावात स्मशान शांतता पसरली आहे. तर अनेक गाव पुन्हा पुनर्जीवित झाले आहे . पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जणांनी आपले गाव सोडले होते. मात्र, कोरोना संकटामुळे नाईलाजाने या कष्टकरी लोकांना आपल्या मूळगावी परतावे लागले. अशाच वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावात परतलेल्या नागरिकांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहेय . 

अकोला जिल्ह्यापासून वाशिम जिल्हा २००३ मध्ये विभाजित झाला. प्रत्येक गावाला ग्रामपंचायत , पंचायत समिती  ,जिल्हापरिषद मिळाली. मात्र, मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे गाव ग्रामपंचायत पासून वंचित राहिले. 

कोरोनामुळे आता लोकांना गावाची ओढ 
 
कामानिमित्त गाव सोडून गेलेले ग्रामस्थ आता गावाकडे परत येत आहे. कामाच्या शोधात पांगरी महादेव येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपूवी हे गाव सोडून गेले होते. त्यामुळे पुर्वी गावात असलेली किलबिल थांबून गेली होती. कोरोना महामारी सुरू झाली आणि वेगवेगळ्या शहरातून येथील नागरिक आपल्या गावी परतले. 
              सांडपाणी रस्त्यावर  

''येथे पंचायतराज अस्तित्वात नसल्याने गावात  कोणत्याही सुख सुविधा नाही. गावात सांडपाण्यामुळे मोठी अस्वच्छता होती. त्यामुळे गावात परतलेल्या युवकांना प्रश्न पडला, सांडपाण्याची व्यवस्था कोण करणार ? त्याला एकच पर्याय म्हणजे गावकऱ्यांनी पुढाकार घेवून यावर उपाय  शोधावा. अखेर गावी परतलेला युवकांनी पुढाकार घेवून सांडपाणी वाहणारे रस्ते दुरुस्त करण्याचा उपक्रम हाती घेतला. आता पर्यंत दुसऱ्यांसाठी राबलो, आता स्वतःच्या लोकांसाठी,आपल्या गावासाठी मेहनत का करू नये,असा विचार करून  लॉक डाउनचा पूर्ण उपयोग घेत महिन्याभरातच, गावी परतलेल्या नागरिकांनी अवघा रस्ताच तयार केला. गावातील काही लोकांनी रस्त्यासाठी आर्थिक मदत केली तर कोणी श्रमदान केले.यामुळे गावातील रस्ते आता फिरण्या सारखे झाले आहेत.'' 

अविनाश राठोड , 
परतलेला नागरिक 



"१७ वर्षापासून वेदना सहन करणार्‍या गावाला प्रशासनाने वार्‍या सोडल्याने शेवटी युवकांनाच पुढाकार घ्यावा लागला. ग्रामस्थ आता रस्ता दुरुस्ती करिता पुढाकार घेणाऱ्या या युवकांचा कौतुक करीत आहे तर फक्त मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव हे युवक करून देत आहे. "
सुशिला धोत्रे , 
ग्रामस्थ 


 अजब गावाची गजब कहाणी

 १)गावाची नोंद वाशिम जिल्ह्यात आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळेचा कारभार अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथून चालतो.

२) गाव वाशिम जिल्ह्यात आणि पोलीस स्टेशन अकोल्यात. पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत गाव येते.

३) महावितरण कार्यालयही अकोल्यातील पिंजर येथे.

अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हे गाव सापडलेले आहे.गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे . विकासा पासून हे गाव कोसो दूर आहे.कोरोना  महामारीच्या काळात तरी सरकारने ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष देवून त्या त्वरित सोडवाव्यात, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.  शासन,प्रशासन जरी पांगरी महादेव  गावाकडे दुर्लक्ष करीत असले तरी येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून स्वकष्टाने आणि स्वबळावर  गावातील सर्व रस्ते चांगले करून, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे,एवढे मात्र निश्चित. 
.......................





टिप्पण्या