Malaria: हिवतापाला हद्दपार करणे सहज शक्य- डॉ. विवेक पेंढारकर Malaria can be easily eradicated - Dr. Vivek Pendharkar

हिवतापाला हद्दपार करणे सहज शक्य
- डॉ. विवेक पेंढारकर 


 हिवताप प्रतिरोध महिना

अकोला: कीटकजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत संपूर्ण अकोला जिल्हयात जून २०२० हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागात ताप रुग्ण सर्वेक्षण, रक्तनमुने संकलन, दूषित पाणीसाठे रिकामे करणे, त्यामध्ये डास अळीनाशक औषध टाकणे, डासोत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पीमासे टाकणे, जनप्रबोधन करणे अशाप्रकारे विविध उपक्रम या संपूर्ण महिनाभरात राबविण्यात येत असून, हिवतापावर मात करण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सहकारी यंत्रणांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, आठवडयातून एक दिवस कोरडा पाळा आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया टाळा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विवेक पेंढारकर यांनी केले आहे.

काय आहेत लक्षणे

थंडी वाजून हुडहुडी भरणे, एक किंवा दोन दिवसाआड ताप येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, घाम येणे, थकवा जाणवणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास रूग्णांनी तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे सांगून डॉ. पेंढारकर म्हणाले, की या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो. हिवतापाचे लवकर निदान व त्वरित औषधोपचार करुन घ्यावेत, उपचार न केल्यास वारंवार ताप येऊन रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.

मागणी चार वर्षातील अकोला जिल्ह्याची हिवताप आजाराची परिस्थिती 

सन २०१६ मध्ये तपासलेले रक्तनमुने ३,५१,४९८, हिवताप दूषित आढळून आलेले रुग्ण ९२ (डेंग्यू दूषित रूग्ण २१). 

सन २०१७ मध्ये तपासलेले रक्तनमुने ३,२४,६८४, दूषित आढळून आलेले रुग्ण ५३ (डेंग्यू दूषित रूग्ण २८).
 
सन २०१८ मध्ये तपासलेले रक्तनमुने ३,३६, ५३८, दूषित आढळून आलेले रुग्ण ३६ (डेंग्यू दूषित रूग्ण ७२). 

सन २०१९ मध्ये तपासलेले रक्तनमुने ३,५८,२११, दूषित आढळून आलेले रुग्ण ११ (डेंग्यू दूषित रूग्ण ६१).


प्रतिबंधात्मक उपाययोजना 

आपल्या घराभोवती, इमारतीच्या गच्चीवर पाणी साचू देऊ नये.

 घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक दिवस निश्चित करुन रिकामे करावे. 

या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडे करुन वापरावेत. 

पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. 

अंगण व परिसरातील खड्डे बुजवावे. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. 

झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरुन घेवून झोपावे. 

खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. 

घराच्या छतावरील व परिसरातील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, शहाळे इ. ची वेळीच विल्हेवाट लावावी. 

संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. 

दर आठवड्याला नाल्यांमध्ये रॉकेल किंवा क्रूड आईल टाकावे. 

गुरांना, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेली भांडी नियमित स्वच्छ करावीत. 

कुलर, फ्रीज, फुलदाण्या यातील पाणी आठवड्यातून दोन वेळा बदलावे.
-----------------------------

टिप्पण्या