महाराष्ट्र सरकारने चीनी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची भाजपची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र शासन ,केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे तसेच योगी सरकारचे अभिनंदन
अकोला: चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर भारताने केला पाहिजे. भारतात १५ करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप तसेच इतर चीनी अॅपमुळे चीनला कोट्यावधींचा आर्थिक फायदा होतो. ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीनच्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे तसेच चिनी व्हिडीओ ऍप, टिकटॉक व इतर सर्व चीन उत्पादित उपकरणांवर भारतात बंदी घालावी. सर्व भारतीयांनी चिनी व्हिडियो ऍप टिकटॉक सोबतच सर्वच चीनी अॅपचा बहिष्कार करावा,असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर ,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांनी केले आहे.
शहिदांना श्रद्धांजली
चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध व विश्वास घातकी भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले त्यात २० भारतीय शूर जवान शहीद झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आम्ही करीत असून, धोकेबाज राष्ट्र असणाऱ्या चीनच्या निषेधार्थ राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून चीनचा राज्यात सर्वत्र निषेध नागरिक करीत आहे.
ग्रेट वॉल स्पोर्ट कार कंपनी सोबतच करार रद्द करावा
चीन विरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना, चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा विचार पुढे येत असताना, महाराष्ट्र्र राज्य सरकारने चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीशी पुण्यातील तळेगाव येथे स्पोर्ट कार बनविण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी ७ हजार ६०० कोटींचा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला आहे. हा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित रद्द करावा आणि चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार सावरकर, शर्मा, भारसाकळे, पिंपळे, अग्रवाल, महापौर अर्चना मसने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने तसेच केंद्रीय मंत्री नामदार रविशंकर प्रसाद व केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी बीएसएनएल या शासकीय मोबाईल कंपनीमध्ये चिनी वस्तूंचा वापर न करण्याचा निर्णय जाहीर करून या कंपनीशी केलेले करार तोडले आहे. तसेच रेल्वेमंत्री ना.पियुष गोयल यांनी सुद्धा साडेसातशे कोटी रुपयाचा करार चीन सोबत असलेला रद्द केला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपने स्वागत केले आहे. तसेच भाजपा गप्पांचा बाजार न करता कृतीशिलपणे कार्य करीत आहे.
जितेंद्र आव्हाड यांना आव्हान
महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चीन सोबत करण्यात आलेले करार आधी केंद्र सरकारने रद्द करावे ,अशी वल्गना केली होती. केंद्र शासनाने चीन सोबतचे करार रद्द करण्यास सुरुवात केली आहे. आता ना. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपल्या नेत्यांना सांगून महाराष्ट्र सरकारने चिनी कंपनीशी केलेला करार रद्द करण्यासाठी दबाव टाकून आपलं राजकीय कौशल्य दाखवावे. तसेच राष्ट्रीय एकता व राष्ट्राची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या राष्ट्रीयतेचा दाखला द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा वर टीका करण्याचे ऐवजी आपण स्वतः काचेच्या घरात राहता याचे भान ठेवावे, अशी टीका सुद्धा भाजपाने केली.
योगी सरकारचे अभिनंदन
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांनी पोलीस विभागाच्या प्रत्येक मोबाईल मधून चिनी ॲप काढून टाकण्याचा आदेश देवून त्याची कृती प्रत्यक्षपणे करून एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल सुद्धा अकोला भाजपाने योगी सरकारचे अभिनंदन केले आहे.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा