Friendship forever:व्यस्ततेतही जपले ना.टोपे यांनी मैत्रीचे नाते!

व्यस्ततेतही जपले ना.टोपे यांनी मैत्रीचे नाते!

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: मनाला मनाने दिलेली प्रेमाची आठवण म्हणजे मैत्री. हा धागा नीट जपला तर, मनाचे हे ऋणानुबंध कधीच तुटत नाही. आयुष्यात तुम्ही कितीही उच्च पदस्थ व्हा किंवा तुमची व्यस्त जीवनशैली असली तरी देखील, मैत्रीला कोणत्याही औपचारिकतेची गरज नसते. हेच आज अकोल्यात परत एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री ना राजेश टोपे आणि अकोल्यातील प्रवीण सावरकर यांच्यातील मैत्रीतून.

इतिहासात अनेकांच्या मैत्रीचे दाखले सापडतात. अनेक मित्रांच्या जोड्या अजरामर आहेत. आजही अशा मैत्रीचे किस्से ऐकायला मिळतात. मैत्रीतील भावना सर्वचीच सारखी असते.मात्र, प्रत्येक मैत्रीला एक वेगळी कहाणी असते.

नामदार राजेश टोपे आणि आमदार रणधीर सावरकर यांचे भाऊ प्रवीण सावरकर यांची महाविद्यालयीन जीवनपासून मैत्री आहे. ते एकाच कॉलेजमध्ये शिकले आहे.आज गुरुवारी अकोल्यात आगमन होण्याच्या आधी टोपे यांनी आपले मित्र प्रवीण सावरकर यांना फोन केला. 'मी अकोल्यात येत असून ,तुझ्याकडे चहा घेणार आहे.' यावर प्रवीण सावरकर म्हणाले, 'जेवण करायलाच ये.' टोपे यांनी आपल्या मित्राच्या प्रस्तावाला लगेच होकार दिला.  covid-19 मध्ये महाराष्ट्राच्या आरोग्याची चिंता असताना नामदार राजेंद्र टोपे आपले मित्र प्रवीण सावरकर यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देवून मित्रत्व भावना जोपासल्या. तीन महिन्यापासून ना टोपे यांना क्षणाचीही उसंत नाही आहे, अश्या परिस्थितीत जिवाभावाच्या मित्राची भेट होणे म्हणजे दीर्घकालीन आनंदाची साठवणच झाली. 

दरम्यान, ना टोपे यांनी अकोल्याचे आराध्यदैवत श्री राजराजेश्वरचे दर्शन घेतले असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य तसेच देश लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावा, अशी त्यांनी श्री राजेश्वराकडे प्रार्थना केली.

.........

टिप्पण्या