Environment day:गो टू प्लांटेशन, टूगेदर विथ चिर्ल्डेन ''!- वृक्षमित्र रूपसिंग बागडेंचे ब्रीदवाक्य

'' गो टू प्लांटेशन, टूगेदर विथ चिर्ल्डेन ''!
- वृक्षमित्र रूपसिंग बागडेंचे ब्रीदवाक्य
अकोला: वर्षा महोत्सव, जरा याद करो कुर्बानी यासारखे सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यासोबतच निसर्गाशी जुळलेली नाळ कायम ठेवीत, राष्ट्रीय स्तरावर वृक्षमित्र पुरस्कार विजेते मोरगाव भाकरे येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक रूपसिंग बागडे यांनी यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधीत '' गो टू प्लांटेशन, टूगेदर विथ चिर्ल्डेन'' हे ब्रीदवाक्य घेत वृक्षारोपणाची मुहूर्तमेढ रोवण्याचा संकल्प केला आहे.
 जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने रूपसिंग बागडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मागच्यावर्षी सिंधूताई सपकाळ यांच्या प्रेरणेतून मोरगाव भाकरे या संपूर्ण गावात वृक्षरोपणाची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. यावर्षी प्रामुख्याने गावासोबतच स्मशानभूमीतही ५ ते ६ फूट उंचीची मजबूत रोपटी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने घरातच बसून कंटाळलेल्या शाळकरी मुलांना सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवीत या उपक्रमात शंभर टक्के सहभागी करून घेण्यात येणार आहे. यावेळी या मुलांना वादळ, महापूर या नैसर्गिक आपत्तींची सविस्तर माहिती देवून त्यांच्यात पर्यावरणाप्रती जागृती तसेच आपल्या परिसरातील वृक्षांच्या विविध प्रजातींचे संगोपन आणि सुरक्षा करण्याबाबतही जागृती करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबतही मुलांना अवगत करण्यात येणार असल्याचे बागडे यांनी सांगितले. पर्यावरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यानेच दुष्काळ, महापूर, रोगराई, त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढगफुटी, पाण्याची पातळी खालावणे अशा नैसर्गिक संकटांना मानवाला सध्या सामोरे जावे लागत आहे. जगावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले असून, त्याचा सामना करण्यासाठी मानवाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरणाच्या असंतुलनामुळेच सध्या आपल्याला 'निसर्ग चक्रीवादळाचा' सामना करावा लागत आहे. स्वत:चा विकास साधण्याच्या प्रयत्नात मानव पर्यावरणाची हानी करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यासंदर्भातही मुलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वांनी मिळून संकल्प करायला हवा, की पर्यावरणाची हानी होणार नाही, असेही ते म्हणाले.
.........

टिप्पण्या