अकोट – तेल्हारा रस्ता आठ दिवसांत पूर्ण करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोट – तेल्हारा रस्ता आठ दिवसांत पूर्ण करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला,दि.९ - अकोट ते तेल्हारा या रस्त्याच्या कामास आतापर्यंत झालेल्या खर्चाचा विचार करता काम बरेचसे अपूर्ण आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देशराज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  आज येथे दिले.

जिल्ह्यातील  अकोट ते तेल्हारा, अकोट ते अकोला व शेगाव- देवरी या रस्त्यांच्या कामाचा आढावा आज आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख,  जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता  धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी-  कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी माहिती देण्यात आली की, अकोट ते तेल्हारा या २७ किमीच्या रस्त्याच्या कामावर आतापर्यंत १२  कोटी रुपयांचा खर्च झाला असून अद्याप केवळ मातीकामच झालेले दिसते. येत्या पावसाळ्यात या रस्त्यावरुन रहदारीस लोकांना त्रास होईल. तेव्हा आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हिशेब द्यावा व  उर्वरित काम हे येत्या आठ दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश ना. कडू यांनी यंत्रणेला दिले. तसेच अकोट ते अकोला व शेगाव ते देवरी या रस्त्यांच्या अनुक्रमे  ४०० मीटर व २०० मीटर  भागात रुंदीकरणाची हद्दी ही वन विभागात येत असल्याबाबत संबंधित विभागाची मंजूरी घ्यावी.  वन हद्द सोडून उर्वरित भागात काम वेगाने सुरु करावे, असेही त्यांनी निर्देशित केले. तर अकोला अकोट या रस्त्याची आधी एक बाजू पूर्ण करुन मग दुसरी बाजूचे काम करावे,  असे निर्देश ना. कडू यांनी दिले

टिप्पण्या